मुंबई बातम्या

मुंबईत आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार! जाहीर सभेतून कुणाला करणार लक्ष्य? – Loksatta

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील राजकीय वातावरम तापू लागलं आहे. पालिका निवडणुकांच्या तारखा जरी अद्याप जाहीर झाल्या नसल्या, तरी सगळ्यांनाच आता या निवडणुकांचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून मुंबई महानगर पालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील अनेक समस्यांवर राजकीय पक्ष जोरकसपणे भूमिका मांडताना दिसत आहेत. मनसेकडूनही मुंबईतील समस्यांबाबत आवाज उठवला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुंबईत जाहीर सभा होणार आहे. मनसे नेते संदीप देशपांडेंनी यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली आहे. राज ठाकरेंच्या या सभेमध्ये पालिका निवडणुकांसोबतच गेल्या काही दिवसांत राज्यात वाद सुरू असलेल्या राजकीय मुद्द्यांवरूनही टोलेबाजी होण्याची शक्यता आहे.

कुठे होणार सभा?

संदीप देशपांडेंनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी सात वाजता ही सभा होणार आहे. दादरमधील केशवराव दाते मैदानावर ही सभा होणार असून या सभेमध्ये राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरेही सहभागी होणार असल्याचं संदीप देशपांडेंनी शेअर केलेल्या बॅनरवरून दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमके कुणाला लक्ष्य करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सम्मेद शिखरस्थळाबाबत भूमिका

दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी सम्मेद शिखर स्थळाबाबत चालू असलेल्या वादावर भूमिका मांडली होती. झारखंड सरकारने हे शिखरस्थळ पर्यटन स्थळ करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर आक्षेप घेत तो मागे घेण्याची मागणी राज ठाकरेंनी केली होती. मुंबईतही यासंदर्भात मोर्चे काढण्यात आले होते. यावर राज ठाकरे आजच्या सभेत सविस्तर भूमिका मांडण्याची शक्यता आहे.

१२ जानेवारीला न्यायालयात हजेरी!

दरम्यान, २००८ सालच्या एका प्रकरणात राज ठाकरेंना येत्या १२ जानेवारीला परळी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तेव्हा राज ठाकरेंना एका प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यावर तीव्र पडसाद उमटले होते. काही ठिकाणी तोडफोडीचेही प्रकार घडले होते. त्यावरही राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे १२ जानेवारीला परळी न्यायालयात राहणार हजर, जाणून घ्या काय आहे कारण

राज्यातील सत्ताकरण

या सर्व मुद्द्यांसोबतच राज्यात सध्या महापुरुषांचा अवमान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेतेमंडळींकडून केली जाणारी विधानं आणि त्यावरून होणारं राजकारण यावरून राज ठाकरे आजच्या सभेत भूमिका मांडण्याची शक्यता आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMibGh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvbW5zLWNoaWVmLXJhai10aGFja2VyYXktc3BlZWNoLXJhbGx5LWluLW11bWJhaS1wb2xpdGljcy1uZXdzLXBtdy04OC0zMzgzMDg3L9IBcWh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvbW5zLWNoaWVmLXJhai10aGFja2VyYXktc3BlZWNoLXJhbGx5LWluLW11bWJhaS1wb2xpdGljcy1uZXdzLXBtdy04OC0zMzgzMDg3L2xpdGUv?oc=5