मुंबई बातम्या

मुंबई: ‘मेट्रो ३’साठी दुसरी गाडी मुंबईत दाखल – Loksatta

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेसाठी ३१ मेट्रो गाड्यांची गरज असून यापैकी दुसरी मेट्रो गाडी गुरुवारी मध्यरात्री मुंबईत दाखल झाली आहे. आठ डब्यांची ही गाडी आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथून मुंबईतील सारीपुत नगर येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये दाखल झाली आहे. येथे आठही डबे उतरविण्यात आले असून आता या डब्यांची जोडणी करून गाडीच्या चाचणीस सुरुवात करण्यात येणार आहे. नवे वर्ष सुरू होत असताना दुसरी गाडी दाखल झाल्याने मुंबईकरांसाठी नववर्षाची ही भेट ठरली आहे.

हेही वाचा >>>मुंबई: नायर दंत रुग्णालयात लवकरच अद्ययावत सुविधा; नवी इमारतीमधील कारभार महिनाभरात होणार सुरू होणार

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ३’ मार्गिकेचे काम सुरू आहे. दोन टप्पात हे काम करण्यात येत असून यापैकी बीकेसी ते सीप्झ हा टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये सुरू करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. त्यामुळेच या टप्प्याच्या आणि आरे कारशेडच्या कामाला वेग देण्यात आला आहे. तर दुसरीकडे या टप्प्यासाठी लागणाऱ्या मेट्रो गाड्या आंध्र प्रदेशातून मुंबईत आणून त्यांची चाचणी घेण्याच्या कामालाही प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळेच ऑगस्टमध्ये पहिली गाडी मुंबईत आणून तिची चाचणी सुरू केली आहे. तर आता दुसरी गाडीही मुंबईत आणण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्री आठ डब्यांची दुसरी मेट्रो गाडी मुंबईत आली आहे. सारीपूत नगरमधील तात्पुरत्या कारशेडमध्ये हे डबे उतरविण्यात आले आहेत. आता या डब्यांची जोडणी करून गाडीची चाचणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>तुनिषाच्या आत्महत्येनंतर शिझान मेकअप रुममध्ये कसा? रुग्णवाहिकेला उशीर का झाला? तुनिषाच्या आईने व्यक्त केला हत्येचा संशय

दरम्यान ‘मेट्रो ३’ मार्गिकेसाठी ३१ गाड्यांची बांधणी करण्याचे कंत्राट एमएमआरसीने श्रीसिटीतील एका कंपनीला २०१७-२०१८ मध्ये दिले होते. २५१६ कोटी रुपयांचे हे कंत्राट आहे. या कंत्राटानुसार श्रीसिटीत ‘मेट्रो ३’च्या गाड्यांची बांधणी सुरू आहे. श्रीसिटीतून पहिली गाडी यापूर्वीच मुंबईत आली असून आता दुसरी गाडीही दाखल झाली आहे. ‘मेट्रो ३’साठी ३१ गाड्यांची बांधणी करण्यात येत असली तरी पहिल्या टप्प्यातील बीकेसी – सीप्झसाठी ९ मेट्रो गाड्यांची गरज आहे. यापैकी दोन गाड्या मुंबईत दाखल झाल्या असून आता सात गाड्यांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आता उर्वरित सात गाड्या टप्प्याटप्प्याने मुंबईत आणण्याचा एमएमआरसीचा विचार आहे.

हेही वाचा >>>Heeraben Modi Passes Away: नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीला जन्म देणं हे हिराबेन यांचं मोठं योगदान; संजय राऊतांची श्रद्धांजली

मेट्रो गाडीचे वैशिष्ट्य
आठ डब्यांची गाडी
१८० मीटर लांब, ३.२ मीटर रुंद गाडी
एकूण प्रवासी क्षमता २४००
वेग ताशी ८५ किमी
स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आल्याने गाडी ३५ वर्षे टिकणार
रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे ३० टक्के विजेची बचत होईल आणि चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज कमी होईल
पूर्णतः वातानुकूलित गाडी
स्वयंचलित गाडी

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMicGh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvc2Vjb25kLXRyYWluLWZvci1tZXRyby0zLWhhcy1hcnJpdmVkLWluLW11bWJhaS1tdW1iYWktcHJpbnQtbmV3cy1hbXktOTUtMzM2NzE4OS_SAXVodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL3NlY29uZC10cmFpbi1mb3ItbWV0cm8tMy1oYXMtYXJyaXZlZC1pbi1tdW1iYWktbXVtYmFpLXByaW50LW5ld3MtYW15LTk1LTMzNjcxODkvbGl0ZS8?oc=5