मुंबई बातम्या

नवी मुंबई मेट्रोला आणखी ६ महिन्यांची प्रतीक्षा, सेंट्रल पार्क-बेलापूर ट्रायल रन यशस्वी – Lokmat

नवी मुंबई –  गेल्या ११ वर्षांपासून रखडलेल्या बेलापूर ते तळोजा या नवी मुंबईतील सिडकोचा पहिलावहिला मेट्रो मार्ग सुरू होण्यास आणखी सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शुक्रवारी या मेट्रो मार्गावरील टप्पा क्रमांक २ अर्थात सेंट्रल पार्क ते बेलापूरदरम्यानची ट्रायल रन घेण्यात आली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

या मेट्रो मार्गावर साडेतीन हजार कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. गेल्यावर्षी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांनी सेंट्रल पार्क ते पेंधर हा टप्पा क्रमांकाचा प्रवास केला होता. तेव्हा दोन महिन्यांत नवी मुंबई मेट्रो सुरू होईल, असे सांगितले होते. मात्र, आज एक वर्ष संपले तरी ती अजून सुरू झालेली नाही. आता पुन्हा सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील सेंट्रल पार्क ते पेंधर या मार्गास रेल्वे बोर्डने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. तसेच प्रकल्पाचा खर्च वाढल्याने सिडकोने आयसीसीआय बॅंकेकडून ५०० कोटींचे कर्ज घेण्यास गेल्याच महिन्यात मंजुरी दिली आहे.

नवी मुंबई मेट्रो मार्गावरील ११ स्थानके 

सीबीडी-बेलापूर, सेक्टर ७, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर ११, खारघर, सेक्टर १४, खारघर
सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर ३४, पाचनंद आणि पेंधर-तळोजा ही ११ स्थानके या मार्गावर आहेत.

नवी मुंबई मेट्रोचा फायदा कुणाला

नवी मुंबई मेट्रो ही बेलापूर ते तळोजा या मार्गावर धावणार आहे. हा संपूर्ण मार्ग नवी मुंबई शहरातील अंतर्गत भागातून जातो. या मार्गाचा खारघर नोडसह कळंबोली, रोडपाली आणि तळोजा परिसराला मोठा फायदा होणार आहे. तळोजा ही मोठी औद्योगिक वसाहत असून कळंबोलीचे स्टील मार्केट महामुंबईतील सर्वात मोठे स्टील मार्केट आहे. येथे राेज हजारो चाकरमानी ये-जा करतात. त्यांच्यासाठी एनएमएमटीची बससेवा आहे, ती अतिशय अपुरी आहे. यामुळे ही मेट्रो सुरू झाल्यास या प्रवाशांसह बेलापूर, तळोजा परिसरातील विद्यार्थी आणि स्थानिकांना त्याचा मोठा लाभ होईल.
 

Web Title: Another 6 months wait for Navi Mumbai Metro, Central Park-Belapur trial run successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMifmh0dHBzOi8vd3d3Lmxva21hdC5jb20vbmF2aS1tdW1iYWkvYW5vdGhlci02LW1vbnRocy13YWl0LWZvci1uYXZpLW11bWJhaS1tZXRyby1jZW50cmFsLXBhcmstYmVsYXB1ci10cmlhbC1ydW4tc3VjY2Vzc2Z1bC1hNTk3L9IBggFodHRwczovL3d3dy5sb2ttYXQuY29tL25hdmktbXVtYmFpL2Fub3RoZXItNi1tb250aHMtd2FpdC1mb3ItbmF2aS1tdW1iYWktbWV0cm8tY2VudHJhbC1wYXJrLWJlbGFwdXItdHJpYWwtcnVuLXN1Y2Nlc3NmdWwtYTU5Ny9hbXAv?oc=5