मुंबई बातम्या

मुंबईच्या संघात एकत्र खेळणार खान ब्रदर्स, सरफराजच्या लहान भावाचे रणजीत पदार्पण – News18 लोकमत

मुंबई, 24 डिसेंबर : घरेलू क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघाची ताकद आता वाढत आहे. आतापर्यंत सरफराज खानने विरोधी संघांची झोप उडवली होती. आता त्याचा लहान भाऊ मुशीर खानही प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरू शकतो. रणजी ट्रॉफीत मुंबईने सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात सरफराजचा लहान भाऊ मुशीरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. त्याने रणजीत पदार्पण केलं आहे. या सामन्यात खान बंधूंची जोडी मैदानात उतरली आहे.

सरफराजप्रमाणेच मुशीरसुद्धा चांगला फलंदाज आहे. 17 वर्षांचा असलेला मुशीर उजव्या हाताने फलंदाजी करतो. तसंच फिरकी गोलंदाजीही करतो. त्याच्या प्रथम श्रेणीतील क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात झाली आहे. सरफराज आणि मुशीर हे दोघे काय कमाल करतात हे पाहावं लागेल. याआधी जेव्हा सरफराजला मुंबईकडून संधी मिळाली होती तेव्हा त्याने या संधीचं सोनं केलं होतं.

हेही वाचा : VIDEO : रोनाल्डोला गर्लफ्रेंडने दिली कोट्यवधींची आलिशान कार, सरप्राइज पाहताच झाला अवाक्

मुंबईच्या अंडर 19 संघासाठी चांगली कामगिरी केल्यानतंर मुशीरला यंदा रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीसाठी निवडण्यात आलेल्या मुंबईच्या संघात घेतलं होतं. मुंबई रणजी संघाची निवड होण्याआधी मुशीरने अंडर 19 संघाला कूचबिहार ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटने गौरवण्यात आलं होतं. मुशीरने स्पर्धेत 679 धावा केल्या होत्या. याशिवायच 32 विकेटही काढल्या होत्या. 17 वर्षाच्या मुशीरने मुंबईच्या अंडर 25 संघाकडूनही तीन सामने खेळले आहेत. तीन सामन्यात त्याने 401 धावा केल्या होत्या. यात मणिपूरविरुद्ध पदार्पणातच 267 धावांची खेळी केली होती.

सरफराजला आपल्या लहान भावाच्या कामगिरीनंतर असा विश्वास होता की मुशीर मुंबईच्या संघात नक्की निवडला जाईल. त्यामुळे सरफराजने मुशीरसाठी मुंबई संघाची कॅप आपल्या किटबॅगमध्ये ठेवली होती. लहान भावाची मुंबईच्या वरिष्ठ संघात निवड झाल्यानंतर सांगितलं होतं की, मी मुंबई संघाच्या व्यवस्थापकांकडून डॉन ब्रॅडमन स्टाइल दोन पनामा कॅप किटबॅगमध्ये ठेवल्या होत्या. मुशीरची फलंदाजी पाहून मला विश्वास होता की या हंगामात त्याची मुंबईच्या संघात निवड नक्की होईल. एक दिवस कुणीतरी कॅप मागितली होती पण मुशीरसाठी मी ती ठेवली असल्याचं सांगत कॅप द्यायला नकार दिला होता. आता हे स्वप्न पूर्ण झालं आहे.

हेही वाचा : बॉक्सिंग डे कसोटीत वॉर्नरचं वादळ, द्विशतक झळकावत केले अनेक विक्रम

सरफराजने आतापर्यंत 33 प्रथम श्रेणी सामन्यात 11 शतके आणि 8 अर्धशतकांसह 3 हजारहून जास्त धावा केल्या आहेत. सरफराजने हैदराबादविरुद्धही शतक करत नाबाद 126 धावांची खेळी केली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सरफराजची सरासरी 78.97 इतकी आहे. मुशीरने पदार्पण केलं असलं तरी त्याला फलंदाजीला अद्याप वेळ आहे. सौराष्ट्रच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMifmh0dHBzOi8vbG9rbWF0Lm5ld3MxOC5jb20vc3BvcnQvc2FyZmFyYXota2hhbi15b3VuZ2VyLWJyb3RoZXItbXVzaGVlci1raGFuLW1hZGUtcmFuamktdHJvcGh5LWRlYnV0LWZvci1tdW1iYWktbWhzeS04MDYwOTAuaHRtbNIBggFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL2FtcC9zcG9ydC9zYXJmYXJhei1raGFuLXlvdW5nZXItYnJvdGhlci1tdXNoZWVyLWtoYW4tbWFkZS1yYW5qaS10cm9waHktZGVidXQtZm9yLW11bWJhaS1taHN5LTgwNjA5MC5odG1s?oc=5