मुंबई बातम्या

मुंबई: चीनमधील करोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय साधने द्या; औषध वितरक संघटनेची मागणी – Loksatta

चीनमध्ये झालेला करोनाचा उद्रेक त्याचबरोबर अन्य देशांमध्येही वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने करोनाला तोंड देण्यासाठी आवश्यक असणारे हातमोजे, मुखपट्टी, पीपीई किट यांसारखी वैद्यकीय साधने आणि आवश्यक औषधांचा साठा सज्ज ठेवावा, अशी मागणी राज्यातील औषध वितरकांकडून अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. करोनाविरोधातील लढ्यात आवश्यक असलेले वैद्यकीय साहित्य, उपकरणे आणि औषधे सज्ज ठेवल्यास आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांचा काळाबाजार रोखणे आणि नागरिकांची होणारी फसवणूक रोखणे शक्य होईल. असेही म्हटले आहे.

हेही वाचा >>> मुंबई: उर्फी जावेदला धमकी देणारा आरोपी अटकेत

चीनमध्ये करोनाचा उद्रेक होण्याबरोबरच जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील यांसारख्या देशांमध्ये करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जगभरात करोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी तातडीने बैठका घेऊन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने करोनाविरोधी लढ्यात महत्त्वाची ठरलेली उपकरणे, साधने आणि औषधांचा साठा तयार ठेवावा, जेणेकरून आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तोंड देणे शक्य होईल, अशी विनंती ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये, दवाखाने आणि वैद्यकीय दुकानांमध्ये करोनाला तोंड देण्यासाठी आवश्यक उपकरणे, साधने आणि औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत का याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पाण्डेय यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiowFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL2RydWctZGlzdHJpYnV0b3JzLWFzc29jaWF0aW9uLWRlbWFuZC10by1wcm92aWRlLW1lZGljYWwtZXF1aXBtZW50LWR1ZS10by1jb3JvbmEtb3V0YnJlYWstaW4tY2hpbmEtbXVtYmFpLXByaW50LW5ld3MtendzLTcwLTMzNDk0MTUv0gGoAWh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvZHJ1Zy1kaXN0cmlidXRvcnMtYXNzb2NpYXRpb24tZGVtYW5kLXRvLXByb3ZpZGUtbWVkaWNhbC1lcXVpcG1lbnQtZHVlLXRvLWNvcm9uYS1vdXRicmVhay1pbi1jaGluYS1tdW1iYWktcHJpbnQtbmV3cy16d3MtNzAtMzM0OTQxNS9saXRlLw?oc=5