मुंबई बातम्या

मुंबई: केंद्र सरकारच्या मिश्र पॅथीला विरोध करण्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनचा इशारा – Loksatta

आरोग्य मंत्रालयाने देशामध्ये एकात्मिक औषध प्रणाली (मिश्र पॅथी) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्याचा सध्याच्या वैद्यक शास्त्रावर परिणाम होईल. इतकेच नव्हे तर आयुर्वेद नष्ट होण्याची शक्यता आहे. सर्व पॅथींच्या अवैज्ञानिक मिश्रणामुळे आरोग्य सेवेचा ऱ्हास होऊन देशातील आरोग्य सेवा एका शतकाने मागे जाईल. याचा परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागेल. त्यामुळे मिश्र पॅथी ही लोकांविरोधी असून, मिक्ष पॅथीला तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिला आहे.

हेही वाचा >>>Video: रोज गांजा घ्या.. मुंबईत रस्त्यावर झळकले पोस्टर; मुख्यमंत्री शिंदेंना नेटकरी म्हणतात, “तुम्ही आता..”

डॉक्टरांची कमतरता हे कारण पुढे करीत केंद्र सरकारने देशातील सर्व पॅथी एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहेत. मिश्र पॅथी राष्ट्रीय धोरण म्हणून स्वीकारण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च नियोजन संस्था असलेल्या नीती-आयोगाकडे मिश्र पॅथीमध्ये वैद्यकीय शिक्षण, क्लिनिकल प्रॅक्टिस, संशोधन तसेच सार्वजनिक आरोग्य आणि प्रशासनात विविध औषध प्रणालींचे मिश्रण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वैद्यकिय शिक्षणाच्या दृष्टीने ही गल्लत करण्यात येत आहे. सध्या देशातील ६५० वैद्यकीय महाविद्यालयांमधून दरवर्षी ९९ हजार ६३ एमबीबीएस डॉक्टर बाहेर पडत आहेत. त्यामुळे डॉक्टरांची कमतरता असल्याचे कारण योग्य नाही, असे आयएमएचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>>मुंबई: तिकीट दर कपात पथ्यावर; लोकलच्या प्रथम श्रेणी डब्याला वाढती प्रतिसाद

लसीकरणामुळे भारत स्मॉल पॉक्स आणि पोलिओपासून मुक्त झाला, एचआयव्ही, क्षयरोग आणि हिवतापाव्यतिरिक्त गोवर, गालगुंड आणि धनुर्वाताचे आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे जवळजवळ निर्मूलन करण्यात आले आहे. माता मृत्युचे प्रमाण आणि बालमृत्यू दर घसरले आहे. करोनालाही लसीमुळे आटोक्यात आणणे शक्य झाले, हे आधुनिक वैद्यकशास्त्रामुळेच शक्य झाल्याचा दावा आयएमएकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा >>>‘मुंबई सुशोभिकरण प्रकल्प’:कामाचा दर्जा आणि नियोजित वेळांवर देखरेख ठेवण्यासाठी दक्षता समिती स्थापन करणार

भारतातील डॉक्टर कुशल आहेत. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि आखाती देशांतील आरोग्य सुविधेचा भार भारतीय डॉक्टर समर्थपणे सांभाळत आहेत. सध्या एकात्मिक औषधाचा सराव फक्त चीनमध्येच केला जातो. मात्र या एकीकरणामुळे चिनी पारंपरिक औषध नष्ट झाली आहेत. आयुर्वेदाची शुद्धता आणि वारसा जपल्याने आपले पारंपरिक औषध समृद्ध होईल. मात्र या प्रणालीचे मिश्रण आयुर्वेदाचे अस्तित्त्व नष्ट करेल. या अवैज्ञानिक मिश्रणामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था कमकुवत होण्याची शक्यता आयएमएकडून वर्तवण्यात आली. मिश्रपॅथी धोरण लोकविरोधी असून, अद्याप नागरिकांना त्याचे दुष्परिणाम समजलेले नाहीत. मात्र नागरिकांना हे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आयएमएचे महासचिव जयेश लेले यांनी सांगितले.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMigwFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL2luZGlhbi1tZWRpY2FsLWFzc29jaWF0aW9uLXdhcm5zLWFnYWluc3QtY2VudHJhbC1nb3Z0LW1peGVkLXBhdGh5LW11bWJhaS1wcmludC1uZXdzLWFteS05NS0zMzQ4MjAyL9IBiAFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL2luZGlhbi1tZWRpY2FsLWFzc29jaWF0aW9uLXdhcm5zLWFnYWluc3QtY2VudHJhbC1nb3Z0LW1peGVkLXBhdGh5LW11bWJhaS1wcmludC1uZXdzLWFteS05NS0zMzQ4MjAyL2xpdGUv?oc=5