नागपूर, 21 डिसेंबर : महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारीही गोंधळ पाहायला मिळाला. पुरवणी मागण्यांवेळी छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप आमदार चांगलेच आक्रमक झाले. छगन भुजबळ यांनी मुंबईचा उल्लेख सोन्याचं अंड देणारी कोंबडी असा केला, तसंच त्यांनी भाजप आमदार मनिषा चौधरी यांचा एकेरी उल्लेखही केला. यानंतर भाजप आमदार मनिषा चौधरी आक्रमक झाल्या. वाद वाढल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली, तसंच छगन भुजबळ यांनीही त्यांचे शब्द मागे घेतले.
काय झाला वाद?
छगन भुजबळ यांनी मुंबईचा उल्लेख सोन्याचं अंड देणारी कोंबडी, असा केल्यानंतर मनिषा चौधरी यांनी आक्षेप घेतला. यावर छगन भुजबळ मनिषा चौधरी यांना उद्देशून ए बस खाली, बस खाली, असं म्हणाल्याचा आरोप भाजप आमदार योगेश सागर यांनी केला.
‘तुम्ही सरस्वती, सावरकर, साधू संतांचा अपमान करणार. अपमानाची मोनोपोली आहे का? मुंबईने तुम्हाला महापौर, आमदार केलं, ओळख मिळवून दिली, त्याच्याबद्दल असं बोलता. हा फक्त मनिषा चौधरी नाही तर महिलांचा अपमान आहे, त्यामुळे भुजबळांनी माफी मागितली पाहिजे,’ असं योगेश सागर म्हणाले.
हा वाद वाढल्यानंतर अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलं. ‘भुजबळ खाली बसा म्हणाले. मुंबई सर्वांची आहे, मुंबईबाबत कुणीही असं वक्तव्य करू शकत नाही,’ असं अजितदादा म्हणाले, त्यानंतरही सत्ताधारी आमदारांकडून गोंधळ घालण्यात आला. अखेर अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली.
‘महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला, हे आरक्षण 50 टक्क्यांपर्यंतही आम्हीच नेलं. महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी, अशी आमची भूमिका आहे. पण काहींच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,’ असं अजित पवार म्हणाले.
भुजबळांचं स्पष्टीकरण
‘पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू गोती. 9 हजार कोटी शहरांसाठी घेतले आहेत. मुलभूत सुविधा नीट केल्या पाहिजेत. 6 महिने झाले तरी कशाचाच पत्ता नाही. मुंबईचं प्रदुषण 330 वर गेलं आहे. प्रदुषण कमी केलं पाहिजे. मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी हा वाकप्रचार आहे. यावर महिला आमदारांनी आक्षेप घेतले आणि वाद घातला, त्यानंतर मी शब्द मागे घेतले. त्यांना सभागृह चालू द्यायचं नाहीये,’ असं स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMioAFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL21haGFyYXNodHJhL25hZ3B1ci9tYWhhcmFzaHRyYS1hc2VtYmx5LXdpbnRlci1zZXNzaW9uLWNvbnRyb3ZlcnN5LW92ZXItY2hhZ2FuLWJodWpiYWwtc3RhdGVtZW50LW9uLW11bWJhaS13YXRjaC12aWRlby1taHNkLTgwMzE0Mi5odG1s0gGkAWh0dHBzOi8vbG9rbWF0Lm5ld3MxOC5jb20vYW1wL21haGFyYXNodHJhL25hZ3B1ci9tYWhhcmFzaHRyYS1hc2VtYmx5LXdpbnRlci1zZXNzaW9uLWNvbnRyb3ZlcnN5LW92ZXItY2hhZ2FuLWJodWpiYWwtc3RhdGVtZW50LW9uLW11bWJhaS13YXRjaC12aWRlby1taHNkLTgwMzE0Mi5odG1s?oc=5