Published on : 18 December 2022, 3:17 pm
इगतपुरी शहर (जि. नाशिक) : नाशिक ते मुंबई सहापदरी महामार्ग काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून हे काम करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. तसेच सूरत-चेन्नई ग्रीन एक्सप्रेस या सोळाशे किलोमीटर अंतराच्या ८० हजार कोटी रुपयांचे काम सुरु होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशातील प्रथम क्रमांकाचा निर्यात जिल्हा नाशिकला बनवत असताना अपघातमुक्त नाशिक केले जाईल, असेही श्री. गडकरी यांनी अश्वस्त केले.
हेही वाचा: Samruddhi Highway Ride : समृद्धी महामार्गावरून निघालात? अशी घ्या टायरची काळजी
राष्ट्रीय महामार्गाच्या २२६ किलोमीटर लांबीच्या १ हजार ८३० कोटींच्या प्रकल्पांचा लोकार्पण आणि कोनशिला अनावरण सोहळा ऑनलाइन रिमोटद्वारे श्री. गडकरी यांच्या हस्ते गार्डन व्ह्युमध्ये झाला. यावेळी श्री. गडकरी म्हणाले, की मुंबई-नाशिक महामार्गाच्या निर्मितीनंतर तो समृद्धी महामार्गास पिंप्रीसदो इथे मिळणार असल्याने मुंबई ते नाशिक हा प्रवास सुखकर होईल. गोंदे ते पिंप्रीसदो फाटा या सहापदरी मार्गासाठी केंद्राने ८६६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याचे भूमीपूजन होत आहे.
त्याचप्रमाणे नांदगाव ते मनमाडमध्ये २५३ कोटींचे काम झाले असून सूरत-नागपूर महामार्गाला जोडणारा हा रस्ता आहे. त्यातून नाशिक ते जळगावचा संपर्क सुधारणार आहे. इंधन डेपो शहरांना जोडले जाणार आहेत. याशिवाय १ हजार ५७७ कोटींच्या ७ कामांचे भूमीपूजन होत आहे. समृद्धी महामार्ग, मुंबई-दिल्ली एक्सप्रेस महामार्ग होत आहे. त्यामुळे नाशिकमधून निर्यातक्षम माल थेट जवाहरलाल नेहरु पोर्टमध्ये जाणार आहे. वडपेहून थेट मुंबई-दिल्ली महामार्गावरुन जाता येईल. एक लाख कोटींच्या महामार्गाचे काम होत आले आहे. त्यामुळे दिल्लीला दहा ते अकरा तासात जाता येईल.
हेही वाचा: Nitin Gadkari : 2024 पर्यंत भारत ‘या’ गोष्टीत अमेरिकेच्या बरोबरीनं असेल; नितीन गडकरींचा मोठा दावा
४० ऐवजी १० तासात चेन्नई
सूरत-चेन्नई ग्रीन एक्सप्रेसमुळे १ हजार २९० किलोमीटरपैकी ३५० किलोमीटर अंतर कमी होणार असून चेन्नईला चाळीस ऐवजी १० तासात जाता येईल, असे सांगून श्री. गडकरी म्हणाले, की उत्तराखंड, काश्मिर, राजस्थान, हरियाना, पंजाब, दिल्लीकरांना सुरतहून थेट दक्षिणेत जाता येईल. हा महामार्ग नाशिक, नगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर अशा पाच जिल्ह्यातून जाणार आहे. या महामार्गासाठी ४ हजार २०० हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार असून त्यापैकी नाशिक जिल्ह्यात १० हजार कोटींचे भूसंपादन केले जाईल.
नाशिक जिल्ह्यातील ९९५ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत केले जाणार असून ५१३ हेक्टरचे निवाडे प्रगतीपथावर आहेत. महाराष्ट्रातील ४८२ किलोमीटरपैकी १२२ किलोमीटर अंतर नाशिक जिल्ह्यातील असेल. या महामार्गामुळे पुणे, मुंबईतील वाहतुकीवरील ताण कमी होत प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. लोकप्रतिनिधींनी या महामार्गालगत इंडस्ट्रीअल क्लष्टर, लॉजिस्टीक पार्क होण्यासाठी प्रयत्न करावेत.
श्री. गडकरी यांनी भगतवाडी (ता. इगतपुरी) येथील वृद्धाश्रमाला भेट देऊन पाहणी केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५ या ३७ किलोमीटर लांबीच्या सटाणा ते मंगरूळचे रुंदीकरण-दर्जोन्नती करणाच्या ४२१ कोटींचे काम, दहावा मैल जऊळके-दिंडोरी व आंबेबहुला राष्ट्रीय महामार्ग ४.३ किलोमीटरच्या २११ कोटी रुपयांचा भुयारी व उड्डाणपूल, खंबाळे ते पहिने व शतगाव ते अंबोली या ३० किलोमीटर लांबीच्या ३८ कोटींच्या निधीतून मजबुतीकरण, नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर रेवाडी फाटा ते सिन्नर या नऊ किलोमीटर मार्गाच्या मजबुती करणाच्या कामाचे भूमिपूजन झाले.
वाहनांच्या लागल्या लांब-लांबच रांगा
दरम्यान, घोटी टोलनाक्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नाशिकहून अनेकांना कार्यक्रमस्थळी पोचणे कठीण झाले. त्याचबरोबर कार्यक्रम संपण्याच्या अगोदर मुंबईहून नाशिकडे येणाऱ्या महामार्गाच्या सुरक्षा पोलिसांनी महामार्गावर वाहतूक रोखून धरली होती.
हेही वाचा: Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला शेतकऱ्यांचा विरोध का? वाचा सविस्तर
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड्. माणिकराव कोकाटे, मौलाना मुफ्ती इस्माइल, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, ॲड्. राहुल ढिकले, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., प्रातांधिकारी तेजस चव्हाण, मुंबईचे मुख्याधिकारी अंशुमली श्रीवास्तव, नवी मुंबईचे संतोष शेलार, नाशिकचे अधिकारी बी. एस. साळुंके, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्षा आहिरे, बी. आर. पाटील, प्रशांत खोडस्कर आदी उपस्थित होते.
२०२३ मध्ये दिवसाला ६८ किलोमीटर
देशात २०१४ मध्ये महामार्गाचे बांधकाम दिवसाला २ किलोमीटर व्हायचे. श्री. गडकरी यांनी मंत्रीपदाची सूत्रे स्विकारल्यावर सुरवातीला हे काम दिवसाला साडेसोळा किलोमीटर झाले. पुढे २१ किलोमीटरवरुन ४० किलोमीटर झाले असून २०२३ मध्ये महामार्गाचे दिवसाला काम ६८ किलोमीटरपर्यंत नेण्याचा मानस श्री. गडकरी यांचा असल्याचे निवेदनात सांगताच, उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
हेही वाचा: Nitin Gadkari : संध्याकाळ झाली की नितीन गडकरींना पडतो ‘हा’ गहन प्रश्न; म्हणाले, मला…
भुजबळांच्या वक्त्यावर राजकारण नाही
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक-मुंबई महामार्गाच्या सहा पदरी काँक्रिटीकरणाविषयी सतत केली आहे. हा धागा पकडून श्री. गडकरी यांनी मी भुजबळांना दोष देत नाही आणि मला राजकारण करायचे नाही, असे स्पष्ट केले. श्री. गडकरी म्हणाले, की श्री. भुजबळ हे बांधकाममंत्री असताना राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी करायला हवा होता. पण त्यात अडचणी जाणवल्या असतील. २०२६ पर्यंतचे काम असल्याने त्याची ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. याही अडचणी दूर केल्या जातील. शिवाय वार्षिक आराखड्यात महामार्गाचे काम घेण्याच्या सूचना दिल्या असल्याने सिन्नर महामार्गावरील अपघाताची समस्या दूर होण्यास मदत होईल.
Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMifWh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vdXR0YXItbWFoYXJhc2h0cmEvbmFzaGlrL25pdGluLWdhZGthcmktc2F5cy1jb25jcmV0aW5nLW9mLXNpeC1sYW5lLWhpZ2h3YXktZnJvbS1uYXNoaWstdG8tbXVtYmFpLXBwajk30gGBAWh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vYW1wL3V0dGFyLW1haGFyYXNodHJhL25hc2hpay9uaXRpbi1nYWRrYXJpLXNheXMtY29uY3JldGluZy1vZi1zaXgtbGFuZS1oaWdod2F5LWZyb20tbmFzaGlrLXRvLW11bWJhaS1wcGo5Nw?oc=5