मुंबई बातम्या

Tv9 Marathi Special Report : मुंबईतील महाविकास आघाडीच्या मोर्चामागील Inside Story काय? – TV9 Marathi

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि धाकटा मुलगा तेजस ठाकरे! पहिल्यांदाच ठाकरे कुटुंब एखाद्या मोर्चात सहभागी झालं.

मुंबई : नेते आणि राज्यपालांच्या विधानांविरोधात महाविकास आघाडीने मोर्चा काढला. या मोर्चातून आगामी मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुकल्याचं बोललं जातंय. मोर्चा जरी महाविकासआघाडीचा होता. तरी तो ठाकरे गटासाठी का महत्वाचा आहे? या मोर्चाची इनसाईड स्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि धाकटा मुलगा तेजस ठाकरे! पहिल्यांदाच ठाकरे कुटुंब एखाद्या मोर्चात सहभागी झालं. मोर्चा महाविकास आघाडीचा होता, मात्र मोर्चाची सर्वाधिक गरज ठाकरेंसाठी होती. त्यामागचं कारण आहे मुंबई महापालिका!

मोर्चाच्या माध्यमातून ठाकरेंनी मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकल्याचं बोललं जातंय! अंधेरी पोटनिवडणुकीतला विजय ठाकरेंसाठी दिलासा देणारा ठरला. पण शिवसेना फुटीनंतर ठाकरेंची सर्वात मोठी परीक्षा मुंबई महापालिकेवेळी होणाराय.

महागाई, सीमाप्रश्न आणि महापुरुषांबद्दलच्या विधानांचा निषेध म्हणून मविआनं मोर्चात रावणाची प्रतिकृती बनवली होती. पण या मोर्चाच्या निमित्तानं अनेक गोष्टी सत्तांतरानंतर पहिल्यांद्या घडल्या.

सत्तांतरानंतर मविआचं हे पहिलं शक्तिप्रदर्शन ठरलं. खासदार संजय राऊतांनी पहिल्यांदाच नवं सरकार कोसळण्याची तारीख दिली. संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात पायी चाललं. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेसोबत शेकाप, सपा, डावे आणि रिपाइंचे इतर गट मोर्चानिमित्त एकत्र आले.

कुठे संजय राऊत आणि सुप्रिया सुळे एकत्रित घोषणा देत होते. तर कुठे आदित्य ठाकरे सरकारचा निषेध करत होते. शरद पवारांनी काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांना बोलावून जवळ बसवून घेतलं.

सभेआधी सपाचे अबू आझमी आणि संजय राऊतांमध्ये मनमोकळ्या गप्पा झाल्या. आदित्य ठाकरेंनी स्टेजवर राऊतांसाठी जागा केली. आणि रस्त्यात मुस्लिमांनी मोर्चावर फुलांचा वर्षाव केला.

आगामी काळात मविआच्या तिन्ही पक्षांमध्ये या मोर्चाचा फायदा ठाकरे गटाला होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे अनेक जिल्ह्यातले सर्वच्या सर्व आमदार शिंदे गटात गेले आहेत.

अनेक महापालिकांमध्येही मोठा सुरुंग लागलाय. फक्त मुंबई महापालिकेत ठाकरे गटाच्या 97 पैकी फक्त दोनच नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. शिवाय मुंबईतला एकही शाखाप्रमुख अद्याप शिंदे गटात गेलेला नाही.

शिवसेना राज्यभरात असली तरी त्याची पाळंमुळं मुंबईतच आहेत. मुंबईतून तब्बल 36 आमदार जिंकून येतात. 2019 च्या निकालात 36 पैकी सर्वाधिक 16 आमदार भाजपनं जिंकले. 13 आमदार शिवसेनेचे, 5 काँग्रेसचे, आणि एके ठिकाणी राष्ट्रवादी विजयी झाली.

इतर जिल्ह्यातले असंख्य आमदार फुटले असले तरी मुंबईत शिंदे गटाहून ठाकरेंकडच्या आमदारांची संख्या जास्त आहे.

मुंबईतल्या शिवसेनेच्या 13 आमदारांपैकी मागाठाण्याचे प्रकाश सुर्वे, चांदिवलीचे दिलीप लांडे, कुर्ल्यातले मंगेश कुडाळकर,
माहिमचे सदा सरवणकर आणि भायखळ्याच्या यामिनी जाधव हे पाच आमदार शिंदे गटात गेले आहेत.

तर ठाकरे गटात चेंबुरचे प्रकाश फातर्पेकर, कलिनाचे संजय पोतनीस, विक्रोळीचे सुनील राऊत, जोगेश्वरी पूर्वचेरविंद्र वायकर, दिंडोशीचे सुनील प्रभू, अंधेरी पूर्वच्या ऋतुजा लटके, वरळीतून आदित्य ठाकरे, आणि शिवडीचे आमदार अजय चौधरी असे 8 आमदार ठाकरे गटात आहेत.

त्यामुळे आगामी काळात मुंबई हातून निसटू न देणं हे ठाकरेंपुढचं सर्वात मोठं आव्हान आहे.

मुंबई महापालिकेत नगरसेवकांचं बलाबल पाहिलं तर शिवसेनेचे 97, भाजपचे 82, काँग्रेसचे 29, राष्ट्रवादीचे 8, समाजवादीचे 8 आणि मनसेचा 1 नगरसेवक आहे.

[embedded content]

अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार न देता ठाकरे गटाला साथ दिली. तशीच साथ मुंबई महापालिकेत मिळावी,
यासाठी ठाकरे गट प्रयत्नशील आहे. कारण आतापर्यंत मुंबईतल्या मराठी मतदारांवर शिवसेनेची मोठी भिस्त राहिलीय.
पण यंदा शिंदे गट आणि मनसेमुळे मराठी मतांचं विभाजन होण्याची दाट शक्यता आहे.

एका संस्थेच्या आकडेवारीनुसार मुंबईत 31 टक्के मराठी मतदार, 26 टक्के उत्तर भारतीय, 13 टक्के गुजराती,
14 टक्के मुस्लिम आणि 12 टक्के इतर मतदार आहेत.

जर समजा शिंदे-भाजपला मनसेची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साथ लाभली तर त्याला उत्तर म्हणून ठाकरे काँग्रेसला सोबत घेऊ शकतात.

मुंबईतल्या मुस्लिम मतदारांवर 25 नगरसेवकांच्या जागा अवलंबून आहेत.

दुसरीकडे सायन, वडाळा, वांद्रे इस्ट, सांताक्रुज, विलेपार्ले, मालाड, आणि नागपाडा या भागातून काँग्रेस नगरसेवक चांगल्या प्रमाणात जिंकून आलेयत.

हे सुद्धा वाचा

म्हणून मुंबईत निघालेला हा मोर्चा मविआचा असला तरी तो ठाकरेंसाठी महत्वाचा होता. हाच मोर्चा भविष्यात मुंबईतल्या युती-आघाडींची गणितं ठरवू शकतो.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiemh0dHBzOi8vd3d3LnR2OW1hcmF0aGkuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS9tYWhhLXZpa2FzLWFnaGFkaS1tYWhhbW9yY2hhLWluc2lkZS1zdG9yeS1ibWMtZWxlY3Rpb24tMjAyMi1hdTE3LTg0MjU5OC5odG1s0gF-aHR0cHM6Ly93d3cudHY5bWFyYXRoaS5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpL21haGEtdmlrYXMtYWdoYWRpLW1haGFtb3JjaGEtaW5zaWRlLXN0b3J5LWJtYy1lbGVjdGlvbi0yMDIyLWF1MTctODQyNTk4Lmh0bWwvYW1w?oc=5