मुंबई बातम्या

हरित जागांची माहिती देण्यासाठी लवकरच अद्ययावत फलक; मुंबई महानगरपालिकेतर्फे कृती आराखडा – Loksatta

मुंबई : सिमेंट कॉंक्रीटचे जंगल बनलेल्या मुंबईतील हरित जागा वाढवण्यासाठी पालिकेतर्फे येत्या काळात कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिकांसह जैवविविधता क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. तसेच यापुढे मुंबईतील हिरवळीच्या जागांची माहिती देणारे अद्ययावत फलक (डॅशबोर्ड) तयार करण्यात येणार आहेत.

मुंबईतील हरित जागांची अधिकाधिक चांगली जपणूक व्हावी आणि मुंबईचे पर्यावरण सातत्याने समृद्ध व्हावे, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने दोनदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. १४ व १५ डिसेंबर रोजी भायखळा परिसरातील ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय’ परिसरात झालेल्या या कार्यशाळेत देशभरातील विविध संस्था आणि ६० पेक्षा अधिक तज्ज्ञ सहभागी झाले होते.

कार्यशाळेत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीमुळे मुंबईतील हरित क्षेत्रे वाढवण्यासाठीची धोरणे आणि भविष्यातील कृती आराखडा तयार करण्यात मदत होणार असल्याचे मत उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी व्यक्त केले.

या कार्यशाळेत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन आणि उद्यान खात्यांचा समावेश होता. त्याचबरोबर राज्य सरकारच्या अखत्यारितील कांदळवन कक्ष, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. या कार्यशाळेदरम्यान विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून हरित जागांच्या संबंधातील नानाविध कंगोऱ्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत ‘सेंटर फॉर अर्बन अँड रिजनल एक्सलन्स’ (क्युअर), स्त्री मुक्ती संघटना, चेन्नई रेझिलियन्स सेंटर यांच्यासह विविध संघटनांच्या वतीनेही मते व्यक्त करण्यात आली.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMibmh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvYm1jLXByZXBhcmVkLWFjdGlvbi1wbGFuLXRvLWluY3JlYXNlLXRoZS1ncmVlbi1zcGFjZS1pbi1tdW1iYWktendzLTcwLTMzNDE2MTMv0gFzaHR0cHM6Ly93d3cubG9rc2F0dGEuY29tL211bWJhaS9ibWMtcHJlcGFyZWQtYWN0aW9uLXBsYW4tdG8taW5jcmVhc2UtdGhlLWdyZWVuLXNwYWNlLWluLW11bWJhaS16d3MtNzAtMzM0MTYxMy9saXRlLw?oc=5