मुंबई बातम्या

वाढती घुसमट! महामुंबईतली हवा खराब; कठोर उपाय हवेत – Maharashtra Times

पाऊस संपला आणि मुंबईसह विस्तारित मुंबईतही हवेचे प्रदूषण वाढले. मग खोकला, घसा खवखवणे, सर्दी यालाही तोंड द्यावे लागले. श्वसनरुग्णांना हा त्रास अधिक झाला. वाढत्या वाहनांमुळे, बांधकामांमुळे आणि तसेच वातावरण बदलामुळेही वायुप्रदूषण वाढेल, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. या घुसमटणाऱ्या शहरांसाठी कायमस्वरुपी उपायांची गरज आहे.

प्रदूषणाची कारणे

•वाहतूक क्षेत्र – ३० टक्के

उद्योगधंदे – १८ टक्के

जैवइंधन किंवा निवासी क्षेत्रातील – उत्सर्जन २० टक्के

हवेतून पसरणारी धूळ – १५ टक्के

हवामान संदर्भातील घटक (समुद्री मिठासह) उर्वरित क्षेत्र

(‘सफर’च्या नोंदींनुसार)

मुंबई आणि पश्चिम भारतात नोव्हेंबर, डिसेंबरात हवेचे प्रदूषण वाढते. मुंबईला तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले असल्यामुळे हवेतील प्रदूषणकारी घटक जलद विखरून जाण्याची खात्री असतानाही मुंबईची हवा वाईट किंवा अतिवाईट स्तरापर्यंत पोहोचते. यंदा ही हवा दीर्घकाळ वाईट असल्याची नोंद झाली. यासाठी वाऱ्यांचा मंदावलेला वेग तर कारणीभूत होताच. यासोबतच बांधकामांमध्ये झालेली वाढही कारणीभूत होती. मुंबईत जमिनीवरून समुद्राकडे आणि समुद्रावरून जमिनीवर वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव दिसतो. हे वारे साधारण तीन ते चार दिवसांच्या अंतराळाने वाहतात, अशी माहिती ‘सफर’चे संस्थापक संचालक गुरफान बेग यांनी दिली. वारे जेव्हा जमिनीपासून दूर वाहत नाहीत तेव्हा प्रदूषके साचून राहतात. वाऱ्यांची दिशा बदलल्यावर ही प्रदूषके दूर जाऊन हवा स्वच्छ होते. हे चक्र नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधी अत्यंत संथ गतीने सुरू होते. तीन ते चार दिवसांऐवजी दहा दिवसांनी वाऱ्यांची दिशा बदलत होती. परिणामी मुंबईकरांना हवेत साचून राहिलेल्या प्रदूषकांचा अधिक त्रास झाला. वाऱ्यांची दिशा बदलली तरी कधी वाऱ्यांना वेग नसल्यानेही शहरावरील प्रदूषके वाहून नेली गेली नाहीत. यावर ला ‘निना’ या दोन्हीचा परिणामही होत असल्याचे सांगण्यात येते.

किनारपट्टीच्या शहरामध्ये प्रदूषके वाहून नेण्यासाठी जशी मदत होते, तसाच किनारपट्टीवरील शहर म्हणून काही तोटेही असतात. किनारपट्टीवरील आर्द्रता आणि मीठ यांच्या परिणामाने या प्रदूषकांची घातकताही वाढते. मुंबईकरांना नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या काळात हवेमध्ये उग्र वास जाणवला. वाहतूक कोंडीमध्ये हा वास अधिकच जाणवतो. सिग्नलला अनेकदा गाडी सुरूच ठेवली जाते. त्यामुळे किंवा वाहतूक कोंडीत हवेत घातक प्रदूषके मिसळत राहतात. दिल्लीच्या तुलनेत मुंबईच्या हवेत घातक प्रदूषके अधिक असतात.

बांधकामांचाही परिणाम

जी २० साठी मुंबईतील बांधकामांवर नियंत्रण आले. यामुळे, सध्या मुंबईतील हवेची गुणवत्ता गेल्या आठवड्यापेक्षा सुधारली. मात्र मुंबईमध्ये प्रदूषणासाठी केवळ बांधकाम किंवा केवळ वाहतूक कोंडी असे घटक स्वतंत्रपणे कार्यरत नसून दोन्हींचा एकत्रित परिणाम दिसतो. हवेमध्ये अतिसूक्ष्म प्रदूषकांसोबत तुलनेने मोठ्या आकाराची प्रदूषकेही होती. प्रदूषणाच्या नोंदींच्या माध्यमातून पीएम २.५ सोबतच पीएम १०चे प्रमाणही वाढलेले दिसले.

कचरा जाळण्याचा त्रास

इमारतीच्या आवारातील खाली पडलेल्या सुक्या पाचोळ्यापासून जुन्या लाकडी सामानाच्या अवशेषांपर्यंत कचरा जाळला जातो. रात्री शेकोटी पेटवली जाते. तीत कागदापासून सगळ्या गोष्टींचा वापर होतो. हा कचरा जाळला गेल्याने कचऱ्याचे प्रमाण कमी होत असेल मात्र हवेत प्रदूषकांचे प्रमाण वाढते. ज्येष्ठ नागरिक घुसमट होत असल्याचे सांगतात. तरीही ती तक्रार गांभीर्याने घेतली जात नाही.

समन्वित धोरण हवे

आता राज्य सरकार आणि स्थानिक महापालिका यंत्रणांनी ‘ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याची गरज आहे. हा आराखडा हवा प्रदूषणाच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्यासाठी केलेला उपाय असतो. तसेच, अशा परिस्थितीत मुंबईकरांना योग्य तो आरोग्य सल्ला देण्याची गरज आहे. बांधकाम क्षेत्र, वाहतुकीत अनियंत्रित आणि वेगाने वाढणारी खासगी वाहने आणि औद्योगिक उत्सर्जन या सर्व क्षेत्रांचे कठोर मानके आणि अचूक यंत्रणेद्वारे नियमन होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संपूर्ण प्रदेशातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठीच्या धोरणामध्ये ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि उर्वरित मुंबई महानगर प्रदेशाचा समावेश करावयास हवा.

– भगवान केसभट, संस्थापक, वातावरण फाऊंडेशन

कठोर उपाय हवेत

आरोग्य विभागाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या आरोग्य जपणे हे बृहन्मुंबई महानगर पालिकेचे मुख्य काम आहे. हवेची गुणवत्ता बिघडल्याने नागरिकांना आरोग्याबाबत योग्य तो सल्ला समाज माध्यमे आणि अन्य माध्यमांद्वारे तातडीने द्यावा, अशी मागणी करणारे पत्र फेब्रुवारीत महापालिकेस लिहूनही याबाबत हालचाल झाली नाही. असा आरोग्यविषयक सल्ला आधीच दिला तर नागरिकांना आधीपासूनच हवा प्रदूषणाच्या परिणामांची माहिती होऊन त्यानुसार ते आरोग्याची काळजी घेऊ शकतील. मात्र, हवा प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त असताना एकदाही आरोग्य सल्ला दिला गेला नाही. बांधकाम क्षेत्रासाठी महानगरपालिका ही सर्वांत मोठी नियंत्रक आणि नियोजनकार असल्यामुळे धुळीमुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी, पालिकेकडून कठोर उपाय आखण्याची गरज आहे. धुळीमुळे होणारे प्रदूषण हवा प्रदूषण वाढविण्यास थेट कारणीभूत आहेत.

सुमयरा अब्दुलली, संयोजक, आवाज फाऊंडेशन
…………………………………………………..

महामुंबईतली हवा खराब

मुंबईतून ठाणे, नवी मुंबईकडे सकाळी बाहेर पडले की या दिवसांत पूर्वी धुक्याची छान दुलई असायची. डोंगरांच्या सान्निध्यात स्वच्छ, ताजी हवा भरभरून घेता यायची. नवी मुंबईपासून नागला बंदरापर्यंतचा ठाणे खाडीचा परिसर, उल्हास खोऱ्यामध्ये असलेल्या मलंगगड परिसरातील सह्याद्रीच्या डोंगररांगा, येऊर आणि सभोवतीचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर या अशा निसर्गसान्निध्यामुळे ठाणे, नवी मुंबई, वसईविरारपर्यंतचा प्रदेश पूर्वी प्रदूषणमुक्त असायचा. आता मात्र या सर्व परिसरातही धुक्याऐवजी धुरक्याचा पडदा असतो. खाडी, खारफुटी तर प्रदूषित असतेच, परंतु हवेतही धूलिकणांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. अंबरनाथ-बदलापूरमध्ये तर कित्येकदा प्रदूषित हवेने डोळे झोंबून लोकांना आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. वायुप्रदूषणापासून महामुंबई परिसरही आता दूर नाही.

ठाण्याची हवा अतिप्रदूषित!

ठाणे शहरामध्ये वाढणारी वाहतूक, रस्त्यांचा विकास, मेट्रोची कामे, इमारतींचे बांधकाम यामुळे हवा प्रदूषणाचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. ठाणे महापालिकेच्या नोंदीनुसार डिसेंबरच्या मध्यावर ठाणे शहराची हवेतील प्रदूषित गुणवत्ता निर्देशांक १०३ टक्क्यांपर्यंत वाढल्याने शहराची हवा अतिप्रदूषित झाली. शहरातील तीन हात नाक्यावरील हवा सर्वाधिक प्रदूषित आढळली तेथील हवेच्या प्रदूषणाचा गुणवत्तेचा निर्देशांक १६५ टक्के इतका अधिक असून हा भाग शहरातील अतिप्रदूषित भाग म्हणून नोंदवण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या संकेतस्थळावरच हे दिसते. तीन हात नाका येथील धूलिकणांचे प्रमाण ३३३.२ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर असून येथील हवा प्रदूषणाचा गुणवत्ता निर्देशांक १६३.१५ टक्के आहे. कोपरी प्रभाग समिती परिसरात धूलिकणांचे प्रमाण १६७ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर होते, तर तेथे हवा प्रदूषण गुणवत्ता निर्देशांक १००.६७ टक्के होता. रॅप्टक्रॉप्स कंपनी परिसरात धूलिकण ९२ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर आढळले असून तेथील हवा गुणवत्ता निर्देशांक ६९.८३ टक्के इतका नोंदवला आहे. नौपाडा प्रभाग कार्यालयाच्या व्यावसायिक केंद्राच्या परिसरात धूलिकणाचे प्रमाण १३४ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर असून येथील हवा गुणवत्ता प्रदूषण निर्देशांक सर्वाधिक ८०.९२ टक्के इतका आढळला आहे.

वाहने, विकास कामे आणि बांधकामे

ठाण्यात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे त्यातील धुरांतून हवेतील धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. शहरात सुरू असलेली इमारतींची बांधकामे, रस्त्यांची कामे, रस्त्यावरील खड्ड्यांमधील मातीमुळेही धुलिकणांचे प्रमाण वाढते. त्यामुळे दम्याचे रुग्ण वाढताहेत.

कल्याण-डोंबिवलीत केवळ वल्गना

कल्याण-डोंबिवलीतही बांधकामांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण मोठे आहे. स्वच्छ हवा मिशन व स्वच्छता अभियान राबवले जात असले, तरी वायुप्रदूषणाची समस्या गंभीर आहे. अनेक भागात रस्ते उखडलेले असल्याने समोरचे वाहन जाताना रस्त्यावर धूळ उडते आणि पाठीमागच्या वाहनांना काहीच दिसत नाही. विद्यार्थ्यांना सर्दीपडशाच्या त्रासाला कायम सामोरे जावे लागते. पालिका प्रशासन आणि यंत्रणांकडून प्रदूषणाला केवळ उद्योगांना जबाबदार धरले जाते. बेसुमार बांधकाम व मोठ्या प्रमाणात उडणारी धूळ यामुळे हवेची गुणवत्ता घसरल्याचे दिसत आहे. गुलाबी रस्ते, हिरवा पाऊस असे चित्रविचित्र प्रकार प्रदूषणामुळे येथे घडले असले, तरी प्रत्यक्षात त्यावर काही तोडगा सापडलेला नाही.

अंबरनाथ-बदलापूरचे डोंगरही विळख्यात

पूर्वी अंबरनाथ, बदलापूर या शहरांच्या वेशीवर तेथील डोंगरसान्निध्यामुळे हवा ताजीतवानी असायची. आता मात्र हे डोंगरही प्रदूषित धुरक्यामध्ये गडप होतात. बेजबाबदार रासायनिक कंपन्यांमुळे बारमाही उग्र दर्पाचा वायू शहरभर असतो. रासायनिक प्रदूषणात उल्हासनगर, अंबरनाथ पालिकांच्या सातत्याने धगधगणाऱ्या डम्पिंग ग्राऊन्डवरील दुर्गंधीयुक्त धुराची भर पडत असते. अंबरनाथ पूर्वेतील सूर्योदय या मोठ्या निवासी संकुलात शेकडोंच्या संख्येने इमारतींच्या पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. जुन्या इमारतींच्या पाडकामामुळे रहिवासी भागात धूळ पसरते आहे. उल्हासनगरमध्येही हीच स्थिती आहे. दुसरीकडे पावसाळ्यानंतर खड्डे पडलेले रस्ते पूर्ववत करण्याचा पालिका व इतर प्राधिकरणांना विसर पडतो. बहुतांश भागात भूमिगत नागरी सुविधांचे खोदकाम सुरू असते. या तिन्ही शहरांमधून दोन राज्य महामार्ग जातात व तेथे अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. यात क्षमता संपलेली वाहने तसेच रिक्षा असतात. त्यातून वायू प्रदूषणात भरच पडते.

मिरा-भाईंदरमध्ये रेडिमिक्सचा धोका

मिरा-भाईंदर महापालिका हद्दीत गृहप्रकल्पांना रेडिमिक्स पुरवण्याचे अनेक प्लान्ट टाकण्यात आले आहेत. ते रहिवासी क्षेत्रातच असल्याने त्यातून पसरणाऱ्या धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. घोडबंदर व काशिमीरा परिसरात ही समस्या अधिक उग्र आहे. काही प्लॅन्ट बेकायदा सुरू असल्याच्याही तक्रारी आहेत. भाईंदरच्या उत्तन येथील डम्पिंग ग्राऊन्डवर अनेकदा आगी लागतात. या दुर्गंधीयुक्त धुराचे लोट नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा घोडबंदर रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर दहिसर चेक नाका येथे कमालीची वाहतूक कोंडी होते व त्यातूनही वाहनांच्या धुराचे प्रदूषण पसरते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून भाईंदर पश्चिमेला वायुप्रदूषणाची माहिती देणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र त्याची माहिती नागरिक व मनपा प्रशासनाला मिळत नसल्याने ती कुचकामीच ठरत असल्याचे बोलले जात आहे.

पनवेलमध्ये मोजमापच बंद

महाराष्ट्रातील प्रमुख एमआयडीसीपैकी एक असलेल्या तळोजात वायूप्रदूषणाचा सामना दररोज करावा लागतो आहे. एमआयडीसीबरोबरच पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर वसाहतीपर्यंत वायूप्रदूषण पोहचले आहे. मात्र महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने लावलेला एमआयडीसीच्या आवारातील हवेच्या गुणवत्तेचे मूल्यमापन सांगणारा फलक अनेकदा बंदच असतो. माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी तळोजा एमआयडीसीच्या प्रदूषणाची तक्रार केलेली आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या सुनावणीत इथल्या कारखानदारांना दंड करून कासाडी नदीच्या संरक्षणासाठी कामे केली जाणार आहेत. मात्र उघड्या डोळ्यांनी न दिसणारे वायुप्रदूषण होतेच आहे. तळोजातील बड्या नामांकित रसायन कंपन्यांमधून अनेकदा प्रदूषण होते. ढोंगऱ्याचा पाडा, देवीचा पाडा परिसरातील मत्स्यप्रक्रिया कंपन्यांमधील वायूगळतीचा नागरिकांना त्रास होतो. खारघर सेक्टर १० तसेच. तळोजा फेज वन, रोडपाली, कळंबोली आणि खांदा कॉलनी, पनवेलपर्यंत वायुयप्रदूषण त्रासदायक ठरते. सामाजिक कार्यकर्ते राजीव सिन्हा यांनी ही तक्रार लोकायुक्तांकडे केली. नंतर तहसीलदार विजय तळेकर यांनी पहाणी केली. लोकायुक्तांकडे सुनावणी झाल्यानंतर मागील दोन महिन्यात यंत्रणा थोडी हलली, एमपीसीबीकडून कारवाई झाली. परंतु, प्रदूषण पूर्णपणे थांबलेले नाही. पहाटेच्या धुक्याचा फायदा घेऊन घातक वायू हवेत सोडले जातात.

वसईत वाहने व डम्पिंगचा धुरळा

किनारपट्टीला लागून असलेल्या वसई-विरार पट्ट्यात वाढत्या नागरिकरणाचे परिणाम हवेवर जाणवू लागले आहेत. पालिकेच्या कचराभूमीवर लागणाऱ्या आगी, औद्योगिक संकुले व अन्य ठिकाणच्या कारखान्यांमधून निघणारा धूर, वाहतक कोंडी, रस्त्यावरचे धुळीचे साम्राज्य आणि बेसुमार बांधकामे यामुळे वायुप्रदूषणात भरच पडते आहे. हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक १५१ च्या घरात नोंदविण्यात येत आहे. वसई पूर्व येथे असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये सद्यस्थितीत हजारो कारखाने, कंपन्या आहेत. या ठिकाणी असलेल्या यंत्रांमधून निघणारा धूर हवेत सोडला जातो. दुसरीकडे भोयदापाडा येथे पालिकेची एकमेव कचराभूमी आहे. या कचराभूमीमध्ये शहरातील ओला आणि सुका कचरा एकत्र टाकण्यात येतो. त्यामुळे या ठिकाणी वारंवार आगी लागतात. बाराही महिने धुराचे लोट निघत असतात. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना श्वसनाचे विकार जडतात. कित्येकांनी आपली घरे रिकामी केली आहेत. केंद्र शासनाच्या योजनेत पालिकेला मिळालेल्या निधीतून वसईविरार महापालिका वायू प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहे. विजेवरील बस, मियावाकी उद्यान, वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली असे उपाय सुरू आहेत.

वाहने, बांधकामांचे नवी मुंबईत प्रदूषण

ठाणे खाडीचा परिसर, रायगड जिल्ह्याचे सान्निध्य, अरबी समुद्राला जोडून असलेली खारफुटी आणि अनेक हरित पट्टे, मोकळ्या जागा असे नवी मुंबईला लाभूनही इथल्या हवेची गुणवत्ता मात्र घसरत असते. शहरातील वाढती वाहनसंख्या, बेसुमार बांधकामे आणि कारखान्यांची बेशिस्त याचा परिणाम हवेवर होताना दिसतो. नवी मुंबईतील दगडखाणी बंद झाल्याने त्या प्रदूषणातून मुक्ती मिळाली. मात्र जेएनपीटी बंदराकडे अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने तसेच गोवा व पुण्याचे महामार्ग याच शहरातून जात असल्याने वाहनांचे प्रदूषण भरपूर होते. जुन्या इमारतींची पुनर्बांधणी व मोकळ्या भूखंडांवरचे आलिशान टोलेजंग इमारतींचे प्रकल्प तसेच विविध नागरी सुविधांचे प्रकल्प यामुळे बांधकामांच्या प्रदूषणात सातत्याने भर पडत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाचनंतर शहरात धुरक्याचे साम्राज्य पसरते. एमआयडीसी संकुलांमधून सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमधूनही दुर्गंधीयुक्त वायूची प्रदूषणात भर पडते.

(वार्तांकन : श्रीकांत सावंत, राजलक्ष्मी पुजारे, शरद पवार, वैष्णवी राऊत, मनीषा ठाकूर-जगताप, कुणाल लोंढे, भाविक पाटील.)

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMifGh0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vZWRpdG9yaWFsL3Jhdml2YXItbWF0YS9tdW1iYWlzLWFpci1wb2xsdXRpb24tbmVlZHMtcGVybWFuZW50LXNvbHV0aW9ucy9hcnRpY2xlc2hvdy85NjMxMjMzMi5jbXPSAYABaHR0cHM6Ly9tYWhhcmFzaHRyYXRpbWVzLmNvbS9lZGl0b3JpYWwvcmF2aXZhci1tYXRhL211bWJhaXMtYWlyLXBvbGx1dGlvbi1uZWVkcy1wZXJtYW5lbnQtc29sdXRpb25zL2FtcF9hcnRpY2xlc2hvdy85NjMxMjMzMi5jbXM?oc=5