मुंबई बातम्या

मुंबई: सामान्यांसाठीही एसटीचा ‘स्मार्ट प्रवास’, प्रवासासाठी मिळणार इतकी सवलत… – Loksatta

मुंबई: एसटीशी प्रवाशाची बांधिलकी कायम राहावी यासाठी एसटी महामंडळाने सर्वसामान्यांसाठी ‘स्मार्ट कार्ड’ सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाने तसा प्रस्ताव तयार केला असून ‘स्मार्ट कार्ड’ खरेदी करणाऱ्या प्रवाशांना प्रवासासाठी १० टक्के सवलत मिळणार असल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

एसटी महामंडळाच्या वतीने विविध घटकांसाठी १ जून २०१९ पासून स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिक, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, विद्यार्थी, अंध व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, डायलिसिस  रुग्ण यासह अन्य काही घटकांना स्मार्ट कार्ड देण्यात येते. वयवर्षा ६५ ते ७५ वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, तर  विद्यार्थ्यांना ६६.६७ टक्के सवलत देण्यात येते. अन्य घटकांनाही  सवलतीचा फायदा मिळतो. त्यामुळे हा प्रवासी एसटीशी कायम जोडला गेला आहे. आतापर्यंत ३९ लाख ८४ हजार स्मार्ट कार्डची नोंदणी झाली असून ३३ लाख ७४ हजार ५६२ कार्डचे वितरण झाले आहे.

हेही वाचा >>> मुंबई: प्रकल्पातील तांत्रिक आणि अभियांत्रिकी बाबींसाठी दक्षिण कोरियातील तज्ज्ञ करणार मदत

एसटीमधून दररोज ३२ ते ३३ लाख प्रवासी प्रवास करीत असून १४ कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. करोनापूर्वी काळात प्रवासी संख्या ६० लाखांहून अधिक आणि २१ ते २२ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. मात्र संप आणि करोनामुळे एसटीला मोठा फटका बसला असून प्रवासी संख्या कमी झाली आहे. त्यामुळे एसटीबरोबर प्रवासी कायमचे जोडण्यासाठी महामंडळाने सामान्यांकरिता स्मार्ट कार्ड सेवा देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हे कार्ड घेणाऱ्यास प्रवासात दहा टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे प्रवासी आणि उत्पन्नही वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा >>> घाटकोपरमध्ये इमारतीला भीषण आग; शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय

स्मार्ट कार्डचे काम सध्या ठप्प

जुलै २०२२ पासून एसटीच्या नवीन स्मार्ट कार्डचे काम ठप्प झाले आहे. हे काम पाहणाऱ्या कंपनीकडून एसटी महामंडळाला कार्ड वितरित करण्यात येतात आणि  महामंडळतर्फे ते प्रवाशांना उपलब्ध करण्यात येतात. हे काम पाहणाऱ्या कंत्राटदाराची अंतिम मुदत संपल्याने राज्यातील स्मार्ट कार्डची सर्व कामे ठप्प आहेत. त्याच कंपनीने पुन्हा स्मार्ट कार्डचे काम पहावे यासाठी एसटी महामंडळ आणि संबंधित कंपनीत चर्चा सुरू आहे. यासाठी कंपनीने मोबदला वाढवण्याची मागणी केली आहे. त्यावर तोडगा निघालेला नाही. परिणामी, स्मार्टकार्डची कामे ठप्प झाली असून नवीन कार्ड वितरित होऊ शकलेले नाही.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMid2h0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvc3Qtc21hcnQtdHJhdmVsLWZvci1jb21tb24tcGVvcGxlLWRpc2NvdW50LWZvci10cmF2ZWwtbXVtYmFpLXByaW50LW5ld3MteXNoLTk1LTMzNDIxMzcv0gF8aHR0cHM6Ly93d3cubG9rc2F0dGEuY29tL211bWJhaS9zdC1zbWFydC10cmF2ZWwtZm9yLWNvbW1vbi1wZW9wbGUtZGlzY291bnQtZm9yLXRyYXZlbC1tdW1iYWktcHJpbnQtbmV3cy15c2gtOTUtMzM0MjEzNy9saXRlLw?oc=5