मुंबई बातम्या

स्वच्छता संदेशाची नवी मुंबई हाफ मॅरेथॉन यशस्वी; हजारो नागरिकांनी घेतली स्वच्छतेसाठी धाव – Loksatta

नवी मुंबई : नवी मुंबई शहर देशातील स्वच्छ शहरांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे शहर असून नवी मुंबई आणि आरोग्य या परस्परपूरक गोष्टी असून धावणे हा आरोग्यासाठी अत्यंत उत्तम व्यायाम मानला जातो. त्यामुळे धावण्याच्या माध्यमातून आरोग्य संवर्धनासह शहर स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या मान्यतेने, लेट्स सेलिब्रेट फिटनेस या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’ मध्ये शहर स्वच्छता आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ४ हजाराहून अधिक नागरिक स्वयंस्फुर्तीने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

पाम बीच मार्गावर सकाळी ५.३० वाजता सानपाडा मोराज सर्कल येथे स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनचा शुभारंभ २१ किमी गटापासून करण्यात आला. त्यानंतर अर्ध्या तासाने १० किमी व अर्ध्या तासाने ५ किमी गटातील धावपटू धावले. याप्रसंगी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ १ चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार,वाहतुक विभागाचे सहा. पोलीस आयुक्त राहुल गायकवाड, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव अन्य अधिकारी व माजी खासदार डॉ. संजीव नाईक उपस्थित होते.

हेही वाचा: नवी मुंबई: कासाडी नदीत प्रदूषण करणाऱ्या टँकरवर कारवाई

लेट्स सेलिब्रेट फिटनेस सारखी सेवाभावी संस्था स्वत: पुढाकार घेऊन शहर स्वच्छतेच्या संदेश प्रसारणासाठी हाफ मॅरेथॉनसारखा उपक्रम आयोजित करते व नवी मुंबई शहराप्रती असलेले प्रेम अभिव्यक्त करते ही कौतुक करण्यासारखी व प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने अनुकरणीय करावी अशी बाब असून त्याबद्दल संस्थेच्या प्रमुख रिचा समित यांचा याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला. २१ किमी अंतराच्या स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये १४ ते २९ वयाच्या पुरूष गटातील बबन शिंदे यांनी१ तास ११ मि. ३७ सेकंद सर्वोत्तम कामगिरी केली. महिलांमध्ये ३० ते ४४ वयोगटातील जयलक्ष्मी बालकृष्णन यांनी १ तास ४४ मि. २२ सेकंदात २१ किमी अंतर पार करून प्रथम पारितोषिक पटकावले. विविध वयोगटातील प्रथम तीन क्रमांकाच्या महिला व पुरूष विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.

हेही वाचा: नवी मुंबई: एपीएमसीत नाशिक स्ट्रॉबेरीचा पर्याय ही उपलब्ध; आवक देखील वाढली

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान लाभलेला असून यामध्ये समस्त नवी मुंबई नागरिकांच्या सक्रिय योगदानाचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ ला सामोरे जात असताना लेट्स सेलिब्रेट फिटनेस सारखी स्वयंसेवी संस्था हाफ मॅरेथॉ़नसारखा भव्य उपक्रम आयोजित करते आणि त्यामधून स्वच्छतेच्या संदेश प्रसाराचे कार्य करते व त्यामध्ये नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होतात हे नवी मुंबईकरांच्या स्वच्छतेविषयी कृतीशीलतेचे व सजगतेचे प्रतिक आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMilgFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbmF2aW11bWJhaS9jbGVhbmxpbmVzcy1tZWVzYWdlLW5hdmktbXVtYmFpLWhhbGYtbWFyYXRob24tc3VjY2Vzc2Z1bC10aG91c2FuZHMtb2YtY2l0aXplbnMtcmFuLWZvci1jbGVhbmxpbmVzcy10bWItMDEtMzM0MjIxNi_SAZsBaHR0cHM6Ly93d3cubG9rc2F0dGEuY29tL25hdmltdW1iYWkvY2xlYW5saW5lc3MtbWVlc2FnZS1uYXZpLW11bWJhaS1oYWxmLW1hcmF0aG9uLXN1Y2Nlc3NmdWwtdGhvdXNhbmRzLW9mLWNpdGl6ZW5zLXJhbi1mb3ItY2xlYW5saW5lc3MtdG1iLTAxLTMzNDIyMTYvbGl0ZS8?oc=5