मुंबई बातम्या

दोन रेल्वे गाड्यांमधील टक्कर टळणार, मुंबई-दिल्ली आणि मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच कवच सुरक्षा प्रणाली – Loksatta

मुंबई : धोक्याचा सिग्नल ओलांडणाऱ्या रेल्वे गाड्यांना संरक्षण देणे आणि दोन गाड्यांमधील टक्कर टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने ‘मुंबई – दिल्ली’ आणि  ‘मुंबई – अहमदाबाद’ मार्गावर ‘कवच’ संरक्षण प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदारांना दोन कंत्राटे देण्यात आली आहेत. या प्रकल्पाचे सर्वेक्षण प्रगतीपथावर असून त्यासाठी एकूण ४६३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मार्च २०२४ पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य आहे.

रेल्वेच्या रिसर्च डिझाईन ॲण्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने (आरडीएसओ) विकसित केलेली कवच संरक्षण प्रणाली स्वदेशी असून यामध्ये लोको पायलट वेगमर्यादेनुसार मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर नियंत्रण ठेवू शकला नाही, तर कवच प्रणाली कार्यरत होऊन रेल्वे गाडीतील ब्रेक यंत्रणा सक्रिय होते आणि तात्काळ गाडी थांबते. यामुळे समोरासमोर येणाऱ्या किंवा मागून येणाऱ्या गाड्यांची टक्कर टळते. रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर थेट निरीक्षण ठेवणे, रेल्वे फाटकाजवळून जाताना स्वयंचालित शिटी वाजणे, आपत्कालिन परिस्थितीत संदेश देणे, लाल सिग्नल ओलांडण्यापासून रोखण्याचे काम ही कवच यंत्रणा करते. एखाद्या मार्गांवर, रेल्वे गाडीत, रूळ आणि सिग्नलमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येते.

हेही वाचा >>> मुंबई: सामान्यांसाठीही एसटीचा ‘स्मार्ट प्रवास’, प्रवासासाठी मिळणार इतकी सवलत…

मुंबई – दिल्ली आणि मुंबई – अहमदाबाद मार्गावर अनुक्रमे मुंबई ते नागदा (दिल्ली मार्ग) आणि वडोदरा ते अहमदाबाद (अहमदाबाद मार्ग) दरम्यान कवच यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पासाठी ४६३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून अनुक्रमे २१८  कोटी ५० लाख रुपये आणि २२३ कोटी रुपये खर्चाची दोन कंत्राटे कंत्राटदाराना देण्यात आल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पातील विरार – वडोदरा आणि वडोदरा – नागदादरम्यान सर्वेक्षणाचे कामही प्रगतीपथावर आहे. यासंदर्भातील आणखी दोन निविदा अंतिम टप्प्यात आहे. ‘कवच’ प्रणाली रेल्वे गाड्या, रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणेत बसविली जाते. यामध्ये उच्च क्षमतेच्या रेडिओ कम्युनिकेशनचा वापर करण्यात येतो. ही प्रणाली प्रतितास १६० किलोमीटर वेगापर्यंतच्या मार्गावर मंजूर आहे.

हेही वाचा >>> मुंबई: प्रकल्पातील तांत्रिक आणि अभियांत्रिकी बाबींसाठी दक्षिण कोरियातील तज्ज्ञ करणार मदत

चाचणी पूर्ण

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मार्च २०२२ मध्ये सिकंदराबाद येथे कवच कार्याप्रणालीची चाचणी करण्यात आली. चाचणी यशस्वी झाल्यानंतर कवच कार्यप्रणालीची भारतीय रेल्वेत अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मुंबई – दिल्ली आणि मुंबई – अहमदाबाद मार्गांवर कवच यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात  येणार आहे. हे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या दोन निविदा कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत.

– सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMimwFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL2NvbGxpc2lvbi10d28tcmFpbHdheS10cmFpbnMtcHJvdGVjdGl2ZS1zeXN0ZW0tb24tbXVtYmFpLWRlbGhpLWFuZC1tdW1iYWktYWhtZWRhYmFkLXJvdXRlLW11bWJhaS1wcmludC1uZXdzLXlzaC05NS0zMzQyMTU3L9IBoAFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL2NvbGxpc2lvbi10d28tcmFpbHdheS10cmFpbnMtcHJvdGVjdGl2ZS1zeXN0ZW0tb24tbXVtYmFpLWRlbGhpLWFuZC1tdW1iYWktYWhtZWRhYmFkLXJvdXRlLW11bWJhaS1wcmludC1uZXdzLXlzaC05NS0zMzQyMTU3L2xpdGUv?oc=5