मुंबई बातम्या

मुंबईतील महामोर्चाला शरद पवार उपस्थित राहणार की नाहीत? महत्त्वाची माहिती समोर – Maharashtra Times

मुंबई : राज्याच्या राजधानीत आज महाविकास आघाडीकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध नोंदवण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांकडून मोर्चाच्या तयारीसाठी बैठकांचं सत्र सुरू होतं. महाविकास आघाडीतील सर्व महत्त्वाच्या नेत्यांसह राज्यभरातील कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीबाबत संभ्रम होता. मात्र हा संभ्रम आता दूर झाला असून शरद पवार हे या मोर्चाच्या समारोपाला होणाऱ्या सभेला हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार हे ११ वाजताच्या सुमारास यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पोहोचतील. त्यानंतर दुपारी साधारण साडेबारा वाजता ते महाविकास आघाडीचा मोर्चा टाईम्स ऑफ इंडिया कार्यालयापाशी पोहोचल्यानंतर या मोर्चाच्या समारोपावेळी आयोजित सभेस उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित करतील. दरम्यान, स्वत: पवार हे या मोर्चाला येणार असल्याने राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहामध्ये भर पडणार आहे.

‘आडवे याल तर…’; मोर्चाच्या काही तास आधी शिवसेना प्रचंड आक्रमक, शिंदे-फडणवीसांना थेट इशारा

‘मोर्चा सरकारला धडकी भरवणारा असेल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल मुंबईतील मोर्चाबाबत भूमिका स्पष्ट करत राज्य सरकारला इशारा दिला आहे. ‘महाराष्ट्रात बेरोजगारी प्रचंड वाढली असून, या प्रश्नावर मार्ग न काढता बेरोजगारांच्या फौजा वाढविण्याचे काम राज्यातील शिंदे टोळी आणि भाजप सरकार करत आहे,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महापुरुषांबाबत राज्यपाल व भाजपची मंडळी अनुद्गार काढून अपमान करत आहेत. मुंबईतील महाविकास आघाडीचा मोर्चा सरकारला धडकी भरविणारा असेल,’ असंही जयंत पाटील म्हणाले.

मोर्चाला पोलिसांकडून परवानगी, मात्र १४ अटी

महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी १४ अटींवर परवानगी दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीने खबरदारी घेण्यात आली.

– मोर्चा अतिशय शांततेत काढावा

– कोणीही प्रक्षोभक अथवा भावना दुखावतील, असे वक्तव्य करणार नाही, घोषणा देणार नाही

– शस्त्रे, लाठी, पुतळे वगैरे घेऊन मोर्चामध्ये जाण्यास मनाई

– मोर्चामध्ये प्राण्यांचा वापर नको

– कायदा व सुव्यवस्थेस बाधा येणार नाही, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी

– पोलिसांच्या सूचना, आदेशाचे पालन करावे

– फटाके वगैरे वाजविण्यास प्रतिबंध

– वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी

– मोर्चा दिलेल्या मार्गावरूनच न्यावा

– मोर्चा निघाल्यानंतर मार्गावर रेंगाळू नये

– मोर्चामध्ये वापरण्यात येणारी वाहने सुस्थितीत असावीत

– मोर्चादरम्यान महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंध घालण्यात आलेल्या बाबींचे पालन करावे

– मोर्चादरम्यान अश्लील हावभाव, अंगविक्षेप करू नये अथवा पादचाऱ्यांना, वाहनचालकांना त्रास होईल, असे कोणतेही कृत्य करू नये

– तत्कालीन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहून पदयात्रेचा परवाना रद्द करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत, याची नोंद घ्यावी

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMipAFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL25jcC1jaGllZi1zaGFyYWQtcGF3YXItd2lsbC1hdHRlbmQtdGhlLW1hcmNoLW9mLW1haGF2aWthcy1hZ2hhZGktaW4tbXVtYmFpLWFnYWluc3QtYmpwL2FydGljbGVzaG93Lzk2MjkzODc1LmNtc9IBqAFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL25jcC1jaGllZi1zaGFyYWQtcGF3YXItd2lsbC1hdHRlbmQtdGhlLW1hcmNoLW9mLW1haGF2aWthcy1hZ2hhZGktaW4tbXVtYmFpLWFnYWluc3QtYmpwL2FtcF9hcnRpY2xlc2hvdy85NjI5Mzg3NS5jbXM?oc=5