मुंबई बातम्या

मुंबई: वरळी बंद; महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध – Loksatta

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांबाबत अपमानास्पद वक्तव्ये करण्यात येत असून त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापू लागले आहे. विरोधक सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरूषांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांच्या निषेधार्थ पुण्यापाठोपाठ गुरुवारी मुंबईतील वरळी परिसरात आंबेडकरवादी, बहुजन आणि इतर समविचारी संघटनांनी बंद पुकारला आहे.

हेही वाचा >>>लालबागमधील अविघ्न पार्कमध्ये पुन्हा एकदा आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

वरळी परिसरात गुरुवारी सकाळी ७ पासून बंद पाळण्यात येत आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, शातता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सकाळपासूनच वरळी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदला वरळीकरांनी प्रतिसाद दिला असून परिसरातील बहुतांश दुकाने बंद ठेऊन दुकानदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. वरळीमधील केवळ औषध आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी आहेत. वरळी परिसरात विविध कंपन्यांची कार्यालये असून कार्यालयात जाणाऱ्यांची वर्दळ रस्त्यावर दिसत आहे.

हेही वाचा >>>मुंबई: ऐन गर्दीच्या वेळी हार्बर, ट्रान्स हार्बर रेल्वे विस्कळीत

तीन दिवसांपूर्वीच वरळीतील आंबेडकरवादी, बहुजन आणि इतर समविचारी संघटनांनी ‘वरळी बंद’ची हाक दिली होती आणि वरळीत ठिकठिकाणी फलक लावून नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. तर या बंदचे फलक सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल केले गेले आहेत.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiqwFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL3dvcmxpLXdhcy1jbG9zZWQtaW4tcHJvdGVzdC1hZ2FpbnN0LXRoZS1kZXJvZ2F0b3J5LXN0YXRlbWVudHMtbWFkZS1ieS10aGUtYmpwLWxlYWRlcnMtYWJvdXQtdGhlLWdyZWF0LW1lbi1tdW1iYWktcHJpbnQtbmV3cy1hbXktOTUtMzMzNTk4MC_SAbABaHR0cHM6Ly93d3cubG9rc2F0dGEuY29tL211bWJhaS93b3JsaS13YXMtY2xvc2VkLWluLXByb3Rlc3QtYWdhaW5zdC10aGUtZGVyb2dhdG9yeS1zdGF0ZW1lbnRzLW1hZGUtYnktdGhlLWJqcC1sZWFkZXJzLWFib3V0LXRoZS1ncmVhdC1tZW4tbXVtYmFpLXByaW50LW5ld3MtYW15LTk1LTMzMzU5ODAvbGl0ZS8?oc=5