देशाच्या किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी आता आणखी एक भारतीय बनावटीची ‘आयएनएस मारमुगाव’ नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. गोवा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून १८ डिसेंबर रोजी युद्धनौकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे.माझगाव येथील डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे जून २०१५ मध्ये ही युद्धनौका बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. सप्टेंबर २०१६ रोजी युद्धनौका बांधणीचे काम पूर्ण करण्यात आले. तर, नोव्हेंबर २०२२ मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. ‘प्रोजेक्ट १५ बी क्लास गाईडेड मिसाईल विनाशिका’ प्रकारातील ही दुसरी युद्धनौका असून यापूर्वी आयएनएस विशाखापट्टणम्ची बांधणी करण्यात आली आहे. आयएनएस मोरमुगावमध्ये ‘ब्रह्मोस’ आणि ‘बराक’ ही भारताची सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्रे बसवण्यात आली आहेत. शत्रूचे चहाच दिसताच या युद्धनौकेवरून विमानविरोधी क्षेपणास्त्रे डागणे शक्य आहे.
हेही वाचा >>>मुंबई: आयएनएस ‘विक्रांत’प्रकरणी सोमय्या यांनी अपहार केल्याचा पुरावा नाही
ही सुमारे सात हजार ४०० टन युद्धनौका १६३ मीटर लांब आणि १७ मीटर रुंद असून तिची कमाल गती ताशी ५६ किमी आहे. या युद्धनौकेवर ५० अधिकारी आणि २५० कर्मचारी असे एकूण ३०० जण राहू शकतात. या युद्धनौकेत गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयरमध्ये ३२ ॲन्टी-एअर बराक-८ क्षेपणास्त्रे तैनात आहेत. याशिवाय १६ ॲन्टीशिप ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात आहेत.सागरी युद्धात विविध कार्ये आणि मोहिमा यशस्वी करण्यात ही युद्धनौका सक्षम आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे ब्राम्होस क्षेपणास्त्र आणि जमिनीवरून हवेत मारा करणारे लांब पल्ल्याच्या ‘बराक८’ क्षेपणास्त्राने ही युद्धनौका सुसज्ज आहे.
हेही वाचा >>>मुंबई: अखेर तीन रेल्वे स्थानकांमधील विद्युत वाहन चार्जिंग सेवा बंद;अल्प प्रतिसाद आणि उदासिन कंत्राटदारामुळे निर्णय
‘फ्लोट’ आणि ‘मूव्ह’ श्रेणीतील असंख्य देशी उपकरणांसह अनेक प्रमुख स्वदेशी शस्त्रे यात आहेत. सुमारे ७५ टक्के स्वदेशी सामग्री या युद्धनौकेत वापरण्यात आली आहेत. मध्यम श्रेणीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, जमिनीवरून जमिनीवर मारा ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, स्वदेशी टॉर्पेडो ट्यूब लॉन्चर्स, पाणबुडीविरोधी स्वदेशी रॉकेट लॉन्चर्स, ७६ मिमी सुपर रॅपिड गन माउंट अशी भारतीय बनावटीची शस्त्रे यात समाविष्ट केली आहेत.
या युद्धनौकेवर दोन हेलिकॉप्टर आहेत. गीगाबाइट इथरनेट आधारित शिप डेटा नेटवर्क (जीईएसडीएन), युद्ध व्यवस्थापन प्रणाली (सीएमएस), ऑटोमॅटिक पॉवर मॅनेजमेंट सिस्टम (एपीएमएस) आणि इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम (आयपीएमएस) यासारख्या अत्याधुनिक डिजिटल नेटवर्कसह विनाशिकेत उच्च दर्जाची स्वयंचलित यंत्रणा आहे.
Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMib2h0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvaW5kaWFuLW1hZGUtaW5zLW1hcm11Z2Fvbi10by1iZS1sYXVuY2hlZC1zb29uLW11bWJhaS1wcmludC1uZXdzLWFteS05NS0zMzM2NDgxL9IBdGh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvaW5kaWFuLW1hZGUtaW5zLW1hcm11Z2Fvbi10by1iZS1sYXVuY2hlZC1zb29uLW11bWJhaS1wcmludC1uZXdzLWFteS05NS0zMzM2NDgxL2xpdGUv?oc=5