मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावरील नागपूर – शिर्डी टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या या मार्गावर अवघ्या काही तासांतच अपघात झाला. वायफळ टोलनाका येथे सोमवारी एका मोटारगाडीने दुसऱ्या मोटारगाडीला धडक दिली. सुदैवाने या अवघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र दोन्ही मोटारगाड्यांचे नुकसान झाले.
हेही वाचा >>>महाविकास आघाडी नेत्यांच्या ताफ्यात निर्भया निधीतील वाहने; चित्रा वाघ यांचा आरोप
समृद्ध महामार्गावरील ५२० किमीचा टप्पा रविवारपासून सेवेत दाखल झाला असून सोमवारी दुपारी नागपूर येथील वायफळ टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या मोटारगाडीवर मागून भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, मात्र दोन्ही मोटारगाड्यांचे नुकसान झाले. टोलनाक्यावर भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीचा वेग तशी १०० ते १२० किमी इतका होता. टोलनाक्यावर इतक्या वेगात गाडी आणणे ही वाहनचालकाची चूक असून यामुळेच हा अपघात झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील (एमएसआरडीसी) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर वाहनचालकांना नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांना शिस्त लावण्यासाठी लवकरच आवश्यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर काम सुरू असताना अनेक छोटे-मोठे अपघात झाले असून यात जीवितहानीही झाली आहे. मात्र लोकार्पणानंतर झालेला हा पहिला अपघात असल्याने आता समृद्धी महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMihwFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL2FuLWFjY2lkZW50LW9uLXRoZS1zYW1yaWRkaGktaGlnaHdheS13aXRoaW4taG91cnMtb2YtdGhlLWluYXVndXJhdGlvbi1tdW1iYWktcHJpbnQtbmV3cy1hbXktOTUtMzMzMzkyNS_SAYwBaHR0cHM6Ly93d3cubG9rc2F0dGEuY29tL211bWJhaS9hbi1hY2NpZGVudC1vbi10aGUtc2FtcmlkZGhpLWhpZ2h3YXktd2l0aGluLWhvdXJzLW9mLXRoZS1pbmF1Z3VyYXRpb24tbXVtYmFpLXByaW50LW5ld3MtYW15LTk1LTMzMzM5MjUvbGl0ZS8?oc=5