मुंबई बातम्या

प्रवाशांनो, विमान उड्डाणाच्या साडेतीन तास आधी विमानतळावर पोहोचा; मुंबई एअरपोर्टच्या सूचना – News18 लोकमत

मुंबई, 09 डिसेंबर : विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून नव्या गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. यात प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवास करताना विमानतळावर साडेतीन तास अगोदर तर देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांना अडीच तास आधी पोहोचावं लागणार आहे. विमान प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीमुळे मुंबई विमानतळाकडून असा निर्णय घेतला गेला आहे. विमानतळावर होत असलेली गर्दी आणि हवाई वाहतुकीची गर्दी याचा आढावा हवाई उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतला होता. त्यानतंर प्रवाशांसाठी या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

विमानतळांचा आढावा घेतल्यानंतर मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बैठक घेतली होती. त्यावेळी देशातील सर्व प्रमुख विमानतळांवर सुरक्षा तपासणीसाठी असलेल्या क्षमतेनुसार महत्त्वाच्या उड्डाणकाळांचे नियोजन करणारा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याशिवाय सामानाची तपासणी करणाऱ्या मशिनबाबत आढावा घ्यायला सांगितलं होतं.

हेही वाचा : सरकारचा मोठा निर्णय! येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात पदवी शिक्षण चार वर्षांचं होणार

वर्षा अखेरीस सुट्ट्यांमुळे आधीच मुंबईत विमानतळांवर प्रवाशांची गर्दी वाढलीय. तर येत्या काही आठवड्यात या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ ठेवावा असं सांगितलं आहे. विमानतळांवर खोळंबा होऊ नये, विमान वाहतुकीची कोंडी अन् गर्दी टाळण्यासाठी नियोजन करावं अशा सुचनासुद्धा केंद्राकडून विमान वाहतुकीशी संबंधित असलेल्या सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी… शिवाजी महाराजांबाबत तरुणानं रक्तानं लिहिलं राष्ट्रपतींना पत्र

ज्योतिरादित्य शिंदे यांनी विमान वाहतूक आणि विमानतळांवरील समस्यांबाबत गुरुवारी लोकसभेत माहिती दिली. इमिग्रेशन, विमानतळ सुरक्षा पाहणारे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि इतर यंत्रणांशी चर्चा केली. त्यानतंर विमानांचे आगमन आणि उड्डाणांचे बारकाईनं नियोजन करायच्या सूचना दिल्याची माहिती ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMikAFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1haXJwb3J0LWludGVybmF0aW9uYWwtdHJhdmVsbGVyLWhhdmUtdG8tcmVhY2gtYXQtbGVhc3QtdGhyZWUtYW5kLWhhbGYtaG91cnMtYmVmb3JlLW1oc3ktNzk3NDIxLmh0bWzSAZQBaHR0cHM6Ly9sb2ttYXQubmV3czE4LmNvbS9hbXAvbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpLWFpcnBvcnQtaW50ZXJuYXRpb25hbC10cmF2ZWxsZXItaGF2ZS10by1yZWFjaC1hdC1sZWFzdC10aHJlZS1hbmQtaGFsZi1ob3Vycy1iZWZvcmUtbWhzeS03OTc0MjEuaHRtbA?oc=5