मुंबई बातम्या

ठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच – Loksatta

मंगल हनवते

मुंबई : मुंबईची उपनगरे असलेल्या ठाणे, नवी मुंबई, वसई-विरारसह कोकणातील वेंगुल्र्यात २ हजार ४६ घरांची सोडत म्हाडा कोकण मंडळाकडून लवकरच काढण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या १० दिवसांत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी १ हजार १, अल्प उत्पन्न गटासाठी १ हजार २३, मध्यम उत्पन्न गटासाठी १८ तर उच्च उत्पन्न गटासाठी चार घरांचा समावेश आहे.

मुंबईच्या आसपास वसई-विरार, ठाणे आणि नवी मुंबईत परवडणाऱ्या दरात घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळत असल्याने म्हाडा मुंबई आणि कोकण मंडळाच्या सोडतीची इच्छुकांना प्रतीक्षा असते. मात्र सोडतीच्या निकषातील बदल आणि त्यासाठी नवीन संगणकीय प्रणाली तयार करण्यासाठी सोडत लांबणीवर पडली होती. आता नवीन प्रणाली तयार झाली असून तिच्या चाचण्याही यशस्वी झाल्या असून सोडतीच्या निकषांतील बदलही अंतिम झाले आहे. त्यामुळे सोडतीचा मार्ग मोकळा झाला असून म्हाडाच्या कोकण मंडळाने घरांची अंतिम आकडेवारी (टेनामेंट मास्टर) निश्चित केली आहे.

येत्या दहा दिवसांत कोकण, पुणे आणि औरंगाबाद मंडळांतील घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल, अशी माहिती म्हाडा उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. कोकण मंडळातील २ हजार ४६, औरंगाबादमधील अंदाजे ८००, तर पुण्यातील ४ हजार ६७८ घरांसाठी एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नव्या प्रणालीनुसार सोडतपूर्व आणि सोडतीनंतरची सर्व प्रक्रिया १०० टक्के ऑनलाइन असणार आहे. इच्छुकांना अर्जाबरोबरच आवश्यक ती कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे सोडतीआधीच पात्रता निश्चित होणार असून पात्र अर्जदारच सोडतीत सहभागी होणार आहेत.

ठाणे, नवी मुंबईतील २० टक्क्यांतील घरांना अधिक मागणी आहे. २०२१च्या सोडतीतील २० टक्क्यांतील ८१२ घरांचा समावेश होता. या ८१२ घरांसाठी तब्बल दोन लाख सात हजार अर्ज सादर झाले होते. त्यानुसार यंदा २० टक्क्यांतील घरांची संख्या वाढली आहे. यंदाच्या सोडतीत २० टक्क्यातील १२३५ घरांचा समावेश आहेत.

कोष्टक १

घरांची आकडेवारी 

अनुक्रमांक – योजना – अत्यल्प गट – अल्प गट – मध्यम गट – उच्च गट – एकूण 

१-पंतप्रधान आवास योजना-४५६-०-०-०-४५६

२-२० टक्क्यांतील घरे-३४१-८८३-११-०-१२३५

३-म्हाडा गृहप्रकल्प-४-१४०-७-४-१५५

कोष्टक २

कुणाला किती घरे?

अत्यल्प उत्पन्न गट – १००१

अल्प उत्पन्न गट – १०२३

मध्यम उत्पन्न गट -१८

उच्च उत्पन्न गट -४ (वेंगुर्ला)

तयारीला लागा..

पत्रकार, कलाकार, माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिकांसह अन्य गटांसाठी सोडतीत घरे आरक्षित असतात. नव्या बदलानुसार आता प्रमाणपत्रे सोडतीआधीच सादर करावी लागणार आहेत.  या प्रमाणपत्राची छाननीही सोडतीआधी होणार असून केवळ पात्र अर्जाचाच सोडतीत समावेश होईल.  ऑनलाइन छाननीमध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी प्रमाणपत्राचा एक निश्चित नमुना प्रसिद्ध केला जाणार आहे. या नमुन्याप्रमाणेच प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वीच इच्छुकांना कागदपत्रांची जमवाजमव करावी लागणार आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiiQFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL3R3by10aG91c2FuZC1taGFkYS1ob3VzZXMtdGhhbmUtbmF2aS1tdW1iYWktdmlyYXItYWR2ZXJ0aXNlbWVudC1uZXh0LTEwLWRheXMtcmVsZWFzZS1zb29uLXlzaC05NS0zMzI2MDc5L9IBjgFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL3R3by10aG91c2FuZC1taGFkYS1ob3VzZXMtdGhhbmUtbmF2aS1tdW1iYWktdmlyYXItYWR2ZXJ0aXNlbWVudC1uZXh0LTEwLWRheXMtcmVsZWFzZS1zb29uLXlzaC05NS0zMzI2MDc5L2xpdGUv?oc=5