मुंबई बातम्या

मुंबई: चंदनवाडी स्मशानभूमीतही लवकरच गॅस दाहिनी – Loksatta

मरिन लाईन्स परिसरात असणा-या चंदनवाडी या जुन्या स्मशानभूमीतही यापुढे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गॅस दाहिनी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या स्मशानभूमीतील ‘विद्युत दाहिनी’ ही ‘गॅस दाहिनी’मध्ये रुपांतरित करण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी ५ ते ७ डिसेंबर या दरम्यान चंदनवाडी विद्युत दाहिनी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

पालिकेच्या स्मशानभूमीमधील सगळ्या विद्युतदाहिनी यापुढे पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) दाहिनीमध्ये परार्वितत करण्यात येणार आहे. तसेच सर्व स्मशानभूमीमध्ये पीएनजी दाहिनी बसवण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून हे काम सुरू असून त्याअंतर्गत चंदनवाडी येथील स्मशानभूमीतही गॅस दाहिनी मुंबई महापालिकेतर्फे बसवण्यात येणार आहे. विद्युत दाहिनीमध्ये विदयुतप्रवाह सुरु केल्यावर ती पूर्ण क्षमतेने चालू होण्यास साधारणपणे दीड ते दोन तासांचा वेळ लागतो. म्हणून विद्युतदाहिनी दिवस-रात्र बहुतांश वेळ सुरु ठेवावी लागते. त्यामुळे विद्युत खर्च वाढण्यासोबतच परिरक्षण खर्च देखील वाढतो. तसेच परिरक्षणासाठी वा दुरुस्तीसाठी विद्युतदाहिनी अनेकवेळा बंद देखील ठेवावी लागते.

हेही वाचा: नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे काम बाकी, तरी उदघाटनाचा घाट; मात्र तरीही समृद्धीवरून थेट प्रवास

विद्युतदाहिनीवर होणारा विद्युत खर्च, दुरुस्ती खर्च तसेच नागरिकांची होणारी संभाव्य गैरसोय या बाबी टाळण्यासाठी महापालिका क्षेत्रातील विद्युतदाहिनी आता विजेऐवजी ‘पीएनजी’ (पाईप्ड नॅचरल गॅस) आधारित करण्याचा निर्णय महापालिकेने काही वर्षांपूर्वी घेतला होता. मुंबई महापालिकेद्वारे ४६ ठिकाणी पारंपारिक स्मशानभूमींसह विद्युत वा गॅस दाहिनी असणा-या स्मशानभूमी आहेत. पारंपारिक पद्धतीने दहन संस्कार करण्यासाठी ४६ ठिकाणी २१९ चिता – स्थाने आहेत. तर ११ ठिकाणी विद्युत वा गॅस दाहिनी असून तिथे १८ शवदाहिनी (चिता) आहेत.

हेही वाचा: धारावी पुनर्विकास प्रकल्प हे धारावीकरांसाठी स्वप्न नव्हे, मृगजळच!

एका विद्युत वा गॅस दाहिनींमध्ये २४ तासात साधारणपणे ८ मृतदेहांवर अंत्य संस्कार होऊ शकतात. या प्रकारची १८ चितास्थाने महापालिका क्षेत्रात आहेत. विद्युत वा गॅस दाहिनीमध्ये चोवीस तासात साधारणपणे १४४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येऊ शकतात.मुंबईतील सर्व स्मशानभूमीत एकूण २३७ चिता-स्थाने असून यांची एकत्रित कमाल क्षमता २४ तासात १ हजार ४५८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMidGh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvZ2FzLWNyZW1hdGlvbi1pbi1jaGFuZGFud2FkaS1jcmVtYXRvcml1bS1hbHNvLXNvb24tbXVtYmFpLXByaW50LW5ld3MtdG1iLTAxLTMzMTYwODAv0gF5aHR0cHM6Ly93d3cubG9rc2F0dGEuY29tL211bWJhaS9nYXMtY3JlbWF0aW9uLWluLWNoYW5kYW53YWRpLWNyZW1hdG9yaXVtLWFsc28tc29vbi1tdW1iYWktcHJpbnQtbmV3cy10bWItMDEtMzMxNjA4MC9saXRlLw?oc=5