मुंबई बातम्या

रेल्वेवर रोज सात मृत्यू; मुंबई उपनगरीय मार्गावर सर्वाधिक अपघात रुळ ओलांडण्यामुळेच – Maharashtra Times

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवास करताना रोज सुमारे सात प्रवाशांना प्राण गमवावा लागत आहे. रेल्वे अपघातांमध्ये निम्याहून अधिक प्राणांतिक अपघात रेल्वे रूळ ओलांडण्यामुळे होत असल्याचे वास्तव मुंबई लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपी) दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे. करोनापूर्व काळात रोज १० ते ११ प्रवाशांचा मृत्यू होत होता. मात्र, सध्या लोकल प्रवासी घटल्याने अपघाती मृत्यूमध्येही घट झाल्याचे दिसून येते.

रेल्वे रूळ ओलांडणे, धावत्या लोकलमधून पडणे, रूळांजवळील ओएचईला आधार देणारे खांब लागणे, फलाट आणि लोकलमधील अंतरामध्ये पडणे, लोकल छतावर प्रवास करताना विजेचा धक्का लागणे ही रेल्वे अपघातांची प्रमुख कारणे आहेत. प्रवाशांनी रूळ ओलांडू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केले जात असतानाही स्थानकाच्या एका फलाटावरून दुसऱ्यावर जाण्यासाठी पुलांचा, सरकत्या जिन्यांचा वापर न करता प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात. गाडीच्या वेगाचा अंदाज न आल्याने यात जीवघेणा अपघात होतो.

यंदाच्या वर्षात ५७९ प्रवाशांचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. हे अपघात रोखण्यासाठी वातानुकूलित लोकल मुंबई रेल्वेत दाखल झाली. साध्या लोकल फेऱ्यांच्या तुलनेत या लोकलच्या फेऱ्या खूपच कमी आहेत. यामुळे त्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

सन २०१७मध्ये मुंबई लोकलमधील रोजची सरासरी प्रवासी संख्या ८० लाख होती. सध्या ती ६५ लाखांवर आली आहे. यामुळे सहा वर्षांतील रूळ ओलांडताना होणाऱ्या मृत्यूचा आलेखदेखील उतरता असल्याचे दिसते. दुसरीकडे करोनाकाळात अनेकांचे रोजगार बुडाले. काहींना आर्थिक तंगीला तोंड द्यावे लागले. नैराश्यामुळे २०२१ आणि २०२२मध्ये एकूण १३० आत्महत्या नोंदवल्या आहेत. करोनापूर्व काळाच्या तुलनेत २०२२मधील १० महिन्यांत आत्महत्यांमध्ये मात्र दुपटीने वाढ झाली आहे. या आत्महत्यांमुळे लोकल वेळापत्रकावर परिणाम होऊन इतर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

अपघातांचा तपशील

वर्ष- रूळओलांडणी-लोकलमधून पडणे-खांब लागणे-फलाट अपघात-विजेचा धक्का-आजारी-अन्य

२०२२ – ९३३-५७९-८-२-११-७६-४३६-१६

२०२१ – १११४-२७७-६-२-५-५४-२५८-२१

२०२० – ९३३-१७७-२-१-४-२७-१६७-६

२०१९ – १४५५-६११-९-४-१६-२८-५३३-२१

२०१८ – १६१९-७११-१९-६-२२-३५-५२२-२९

२०१७ – १६५१-६५४-१२-१८-२८-३६-५५६-३३

इतके प्रवासी दगावले

वर्ष – मृत्यू

२०२२-२०७८

२०२१-१७५२

२०२०-१११६

२०१९-२६९१

२०१८-२९८१

२०१७-३०१४

आत्महत्यांमध्ये वाढ

वर्ष-आत्महत्या-पुरुष-महिला

२०२२ -७६-६०-१६

२०२१ -५४-४५-९

२०२० -२७-२४-३

२०१९ -२८-२३-५

२०१८ -३५-३०-५

२०१७ -३६-३०-६

(२०२२-ऑक्टोबरपर्यंत)

रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटनांमध्ये अनेक प्रवाशांच्या कानात हेडफोन असतात. यामुळे लोकलचा हॉर्न त्यांना ऐकू येत नाही. मुंबईत दर तीन मिनिटांनी धीम्या-जलद अप-डाऊन मार्गावर लोकल धावते. एक रूळ ओलांडला तरी अन्य रूळांवरून येणाऱ्या गाडीमुळे अपघात होतो. अपघात रोखण्यासाठी समाजप्रबोधनासह शक्य त्या ठिकाणी पादचारी पूल, रुळांखाली बोगदा व भिंत उभारण्याबाबत उपायदेखील करणे आवश्यक आहे.– कैसर खालिद, आयुक्त, मुंबई लोहमार्ग पोलिस

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiiwFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL21vc3Qtb2YtYWNjaWRlbnRzLW9uLW11bWJhaS1yYWlsd2F5LWFyZS1kdWUtdG8tdHJhY2stY3Jvc3NpbmcvYXJ0aWNsZXNob3cvOTU4OTg2MzUuY21z0gGPAWh0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpLW5ld3MvbW9zdC1vZi1hY2NpZGVudHMtb24tbXVtYmFpLXJhaWx3YXktYXJlLWR1ZS10by10cmFjay1jcm9zc2luZy9hbXBfYXJ0aWNsZXNob3cvOTU4OTg2MzUuY21z?oc=5