मुंबई बातम्या

मुंबईतील मालाडध्ये सर्वाधिक १८ तलाव – Loksatta

मुंबई: मुंबईतील सर्वाधिक लोकसंख्या असलेला परिसर अशी मालाडची ख्याती असून मालाड परिसराला आणखी एका गोष्टीमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मालाड परिसरात एक, दोन नाही तर तब्बल १८ तलाव असून या तलावांच्या सुशोभिकरणासाठी आता मुंबई महानगरपालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य सरकारने हे तलाव महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावे अशी मागणी करणारे पत्र भाजपच्या माजी नगरसेवकाने उपनगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पाठविले आहे.

पश्चिम उपनगरातील मालाड मध्ये १८ तलाव असून त्याबाबत परिसरातील लोकांनाही फारसे माहीत नाही. हे तलाव राज्य सरकारच्या अखत्यारीत असून गेल्या काही वर्षात देखभालीअभावी या तलावांची दुरवस्था झाली आहे. या तलावस्थळी सोयी – सुविधा नसल्यामुळे नागरिकांना या तलावांच्या परिसराचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारने हे तलाव मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावे अशी मागणी मालाडमधील माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी उपनगराचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : मंगलप्रभात लोढांविरुद्ध संभाजी ब्रिगेड आक्रमक; वाचा राज्यभरातील घडामोडी एका क्लिकवर

मालाडमधील १८ तलावांपैकी दोन तलाव  मुंबई महानगरपालिकेला यापूर्वी हस्तांतरित करण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील शांताराम तलाव आणि कमल तलाव हे महानगरपालिकेकडे आहेत. तर उर्वरित १६ तलाव महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्यास त्याचे सुशोभिकरण करून लोकांना विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध करता येईल, असे मिश्रा यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच जिल्हा नियोजन निधीतून सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMijwFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpLzE4LWxha2VzLWluLW1hbGFkLW11bWJhaS1vZi1sYWtlcy1kZWNvcmF0aW9uLW11bWJhaS1tdW5pY2lwYWwtY29ycG9yYXRpb24tdHJ5LW11bWJhaS1wcmludC1uZXdzLXlzaC05NS0zMzEwMTgyL9IBlAFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpLzE4LWxha2VzLWluLW1hbGFkLW11bWJhaS1vZi1sYWtlcy1kZWNvcmF0aW9uLW11bWJhaS1tdW5pY2lwYWwtY29ycG9yYXRpb24tdHJ5LW11bWJhaS1wcmludC1uZXdzLXlzaC05NS0zMzEwMTgyL2xpdGUv?oc=5