मुंबई बातम्या

मुंबईत गोवरबळींची संख्या १४; अंधेरीतील एक वर्षांच्या मुलीचा मृत्यू – Loksatta

मुंबई : मुंबईमध्ये सोमवारी आणखी एका एक वर्षांच्या मुलीचा गोवरने मृत्यू झाला. हा मृत्यू संशयित असला तरी आतापर्यंत गोवरने मृत्यू झालेल्या बालकांची संख्या १४ झाली आहे. यामध्ये मुंबईतील गोवरने मृत्यू झालेल्या बालकांची संख्या ११ असून, त्यातील तीन मृत्यू संशयित आहेत. तर मुंबईबाहेरील तीन बालकांचा गोवरने मृत्यू झाला आहे.

अंधेरी येथे राहणाऱ्या एक वर्षांच्या मुलीला २६ नोव्हेंबर रोजी ताप आणि पुरळ येऊन श्वसनाचा त्रास झाल्याने महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर सर्व उपचार करूनही तिची प्रकृती खालावत जाऊन २८ नोव्हेंबरला दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या मुलीला गोवरची लस देण्यात आली नव्हती. त्यातच तिला जन्मजात हृदयविकाराचा त्रास असल्याने तिच्यावर महिनाभर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र सोमवारी तिचा गोवरने संशयित मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील गोवरने मृत्यू झालेल्या संशयित रुग्णांची संख्या तीन झाली आहे. दरम्यान, सोमवारी मुंबईमध्ये गोवरचे ११ रुग्ण आढळले असून, गोवरच्या रुग्णांची संख्या ३०३ इतकी झाली आहे. तसेच ११५ संशयित रुग्ण आढळले असून, संशयित रुग्णांची संख्या ४ हजार ६२ इतकी झाली आहे. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये सोमवारी ७८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून ४९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. गोवरला प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून नियमित तसेच अतिरिक्त लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत. आतापर्यंत नियमित सत्रातून ८८११ तर अतिरिक्त लसीकरण सत्रातून १३ हजार १८ जणांचे लसीकरण झाले आहे.

१ डिसेंबरपासून विशेष लसीकरण

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार १ डिसेंबरपासून गोवर-रुबेलाच्या विशेष लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. यामध्ये ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील ३३ आरोग्य केंद्रांतील १ लाख ३४ हजार ८३३ बालकांना गोवर-रुबेला लशीची विशेष मात्रा देण्यात येणार आहे. तसेच ६ महिने ते ९ महिने वयोगटातील १३ आरोग्य केंद्रांतील ३ हजार ४९६ बालकांना गोवर-रुबेला लशीची विशेष मात्रा देण्यात येणार आहे.

प्रभागांमध्ये वाढ..

सुरुवातीच्या काळामध्ये अवघ्या आठ प्रभागांमध्ये गोवरचा उद्रके झाला होता. काही दिवसांपूर्वी हा आकडा ११ वर आला तर सोमवारी मुंबईतील गोवरचा उद्रेक असलेल्या प्रभागांची संख्या १५ झाली आहे. यामध्ये शहरी भागात चर्चगेट, ताडदेव, भायखळा, परळ, प्रभादेवी, दादर पश्चिम तसेच पश्चिम उपनगरांमध्ये सांताक्रूझ, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, मालाड आणि कांदिवली हे प्रभाग आहेत. तर पूर्व उपनगरांमध्ये कुर्ला, गोवंडी, चेंबूर आणि भांडुप या प्रभागांमध्ये गोवरचा उद्रेक झाला आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiW2h0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvbWVhc2xlcy1kZWF0aC10b2xsLWNsaW1icy10by0xNHRoLWluLW11bWJhaS16d3MtNzAtMzMwNTA2MS_SAQA?oc=5