मुंबई बातम्या

मुंबई: गोवरबाबत रॅपरच्या माध्यमातून जनजागृती; सामाजिक संस्थांचा मदतीचा हात – Loksatta

गोवर आणि लसीकरणासंदर्भात महापालिकेकडून विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. आता गोवर आणि लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिका रॅपरची मदत घेणार आहे. हे रॅपर गाण्यांच्या माध्यातून लोकांना गोवरची लस घेण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच गोवरच्या साथीची माहिती देणार आहेत.

हेही वाचा- मुंबई: औषधाचा साठा परत बोलाविण्याची अन्न व औषध प्रशासनाची प्रक्रिया संदिग्ध!

गोवरच्या रुग्णांची वाढती संख्या आणि प्रभागांमध्ये हाेणारा उद्रेक यामुळे गोवरच्या साथीचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. गोवंडी, मानखुर्द, कुर्ला या भागामध्ये सुरू केलेल्या जनजागृतीला यश मिळत आहे. अनेक पालक मुलांचे लसीकरण करून घेण्यास पुढाकार घेत आहेत. मात्र गोवरचा वाढता उद्रेक पाहता मुंबई महापालिका जनजागृतीसाठी विविध उपाय योजत आहे. आता ‘पाथ’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गोवरची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी महापालिका रॅपरची मदत घेणार आहे. ‘पाथ’ या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक गोवरची लक्षणे आणि उपाययोजना, लसीकरणाचे फायदे अशी विविध माहिती देणारी रॅप प्रकारातली गाणी तयार करणार आहेत. रॅपर्सच्या चित्रफिती गोवरचा उद्रेक असलेल्या प्रभागामध्ये दाखवण्यात येणार आहेत. तसेच प्रसार माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकार अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

हेही वाचा- “…अन् त्या बदलाची प्रेरणा असेल शिवछत्रपतींचं एक धोरणी वाक्य!”, राज ठाकरेंच्या सभेआधी मनसेकडून टीझर रिलीज

गोवरला प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. महापालिकेच्या मदतीसाठी काही संस्थाही पुढे सरसावल्या आहेत. गोवंडी, चेंबूर आणि मानखुर्द या भागामध्ये लहान मुलांना गोवरची लस देण्यासाठी तसेच पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अंगणवाडी सेविकांबरोबर अपनालय, स्नेह आणि सेव्ह द चिल्ड्रेन या संस्थांचे स्वयंसेवक कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे युनियन बँकने गोवंडीतील गोवर बाधित बालकांच्या उपचारासाठी, औषध खरेदीसाठी १० लाखांची आर्थिक मदत केली असल्याची माहिती डॉ. गोमारे यांनी दिली.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiowFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL211bWJhaS1tdW5pY2lwYWwtY29ycG9yYXRpb24td2lsbC1zcHJlYWQtYXdhcmVuZXNzLWFib3V0LW1lYXNsZXMtYW5kLXZhY2NpbmF0aW9uLXRocm91Z2gtd3JhcHBlcnMtbXVtYmFpLXByaW50LW5ld3MtZHBqLTkxLTMzMDEzMzYv0gEA?oc=5