मुंबई बातम्या

मुंबई : गोखले पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पाच कंपन्या इच्छुक; ८४ कोटी ७२ लाख रुपये खर्च; आठ महिन्यांचा कालावधी – Loksatta

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या रेल्वेच्या हद्दीतील भागाची पुनर्बांधणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मागवलेल्या निविदांना पाच कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता या पाच कंपन्यांमधून कोणाची निवड होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या कामासाठी अंदाजित ८४ कोटी ७२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

गोखले पूलाची पुनर्बांधणी करताना रेल्वेच्या हद्दीतील बांधकामही महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने तयार केलेल्या संकल्प आराखड्यावर आयआयटीने शिक्कामोर्तब केल्यानंतर महानगरपालिकेच्या पूल विभागाने या कामासाठी नुकत्याच निविदा मागवल्या होत्या. या निविदा शुक्रवारी उघडण्यात आल्या. त्यानुसार पाच कंपन्या पुढे आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

हेही वाचा >>> मुंबई : नायगाव बीडीडीतील ४४२ पात्र रहिवाशांनामिळणार पुनर्वसित इमारतीतील घराची हमी; सोमवारी सोडत

या पूलाचे बांधकाम करण्यासाठी महानगरपालिकेने आधीच पूलाच्या उताराच्या भागासाठी निविदा मागवून ८७ कोटी रुपयांच्या कामासाठी कंत्राटदार नेमले होते. पहिल्यांदाच पूलाचा अर्धा अर्धा भाग तोडून त्याची पुनर्बांधणी करण्याचा प्रयोग करण्यात आला होता. आता रेल्वेच्या हद्दीतील पुलाचे बांधकाम करण्यासाठी महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे. रेल्वे हद्दीत नवीन पूल बसवण्यासाठी एकूण आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. एक महिना निविदा प्रक्रिया, तुळईचे भाग तयार करण्यासाठी तीन चार महिने, प्रत्यक्ष पूल बसवण्यासाठी तीन महिने असा एकूण सात महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे पूल वेळेत पाडून झाल्यास उशीरात उशीरा जून २०२३ पर्यंत पूलाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

तुळई बाहेर तयार करून जागेवर जोडणार रेल्वे हद्दीतील पुलाच्या तुळईचे (गर्डर) काम अन्यत्र करण्यात येणार आहे. तुळईचे भाग तयार करून ते जागेवर आणून जोडले जाणार आहेत. त्यानंतर त्यावर सिमेंट काँक्रिटची जोडणी करण्यात येणार आहे. या कामासाठी चार महिने लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही तुळई आणून प्रत्यक्ष ठिकाणी बसवली जाणार आहे. मात्र या चार महिन्यांमध्ये पूल पाडण्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMikAFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL2ZpdmUtY29tcGFuaWVzLWFyZS1pbnRlcmVzdGVkLWZvci10aGUtcmVjb25zdHJ1Y3Rpb24tb2YtYW5kaGVyaS1nb2toYWxlLWJyaWRnZS1tdW1iYWktcHJpbnQtbmV3cy16d3MtNzAtMzI5NzM3Ny_SAQA?oc=5