मुंबई बातम्या

कॅगचे अधिकारी मुंबई महापालिकेत थडकले, चौकशी सुरू; शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न – Maharashtra Times

‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेतील करोना काळातील १२ हजार कोटींच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी कॅगकडून (देशाचे महालेखा परीक्षक व नियंत्रक) सुरू झाली आहे. मंगळवारी कॅगचे सुमारे दहा ते बारा अधिकारी पालिका मुख्यालयात दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी विविध खात्यांमध्ये जाऊन संबंधित पालिका अधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती घेतली. पथकाने लेखापाल विभागात जाऊन काही कागदपत्रांची आणि एकूणच व्यवहाराची माहिती घेतली. यावेळी काही कागदपत्रे ताब्यात घेतली असल्याचे समजते.

करोना काळात निविदा प्रक्रिया न राबवता कोट्यवधी रुपयांची कंत्राटे देण्यात आली. आवश्यक ती वैद्यकीय व इतर वस्तूंची खरेदी करण्यात आली होती. या खरेदीसाठी स्थायी समितीने पालिका आयुक्तांना अधिकार दिले होते. पालिकेच्या जवळपास १० खात्यांमधून झालेले व्यवहार संशयाच्या फेऱ्यात असून, ते कॅगच्या रडारवर आहेत. २८ नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान झालेल्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून करण्यात येणार आहे. या व्यवहारांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता. विधिमंडळ अधिवेशनात त्यावरून रणकंदन झाले होते. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेच्या व्यवहाराची चौकशी कॅगमार्फत करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.

या चौकशीसाठी कॅगचे पथक मंगळवारी सकाळी ११ वाजता पालिका मुख्यालयात दाखल झाले. सुमारे दोन तास पथकाने पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कॅगच्या अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासोबत बैठकही घेतली. यावेळी मुंबई पालिकेचे वरिष्ठ अधिकारी व खाते प्रमुख उपस्थित होते. या बैठकीनंतर कॅगच्या पथकाने पालिकेच्या लेखापाल व इतर काही विभागांत जाऊन माहिती घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे. मंगळवारी प्राथमिक माहिती घेण्यात आली असून आज, बुधवारपासून सखोल चौकशीला सुरुवात होणार असल्याचे समजते. तसेच दररोज एक खाते याप्रमाणे पालिकेचे मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण, रुग्णालये प्रशासन, रस्ते, पूल, मलनि:सारण विभाग यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

पालिका निवडणुकीपूर्वीच भाजप व शिंदे गटाकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेली २५ वर्षे पालिकेत सत्ता ताब्यात ठेवलेल्या शिवसेनेला यंदा सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भाजपने नेटाने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पालिकेतील कंत्राटे, भ्रष्टाचार, अनियमितता बाहेर काढून सेनेला हैराण करण्याची एक ही संधी भाजप सोडत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या आधीच विविध मार्गांनी शिवसेनेला चितपट करण्याची रणनीती भाजपने आखली असल्याचे सांगितले जाते आहे.

राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात मोर्चेबांधणी? आदित्य ठाकरे घेणार तेजस्वी यादवांची भेट

हे व्यवहार कॅगच्या रडारवर (कोटींमध्ये)

करोनाकाळात विविध उपयोजना व खरेदीसाठी झालेला खर्च – ३,५४८.७३

तीन रुग्णालयांमध्ये करण्यात आलेली खरेदी – ९०४.८४

चार पुलांच्या बांधकामावरील खर्च – १४९६

दहिसर येथे अजमेरा बिल्डरच्या भूखंडाची खरेदी – ३३९.१४

तीन मलनि:सारण प्रक्रिया केंद्रासाठी खर्च – ११८७.३६

मुंबईतील ५६ रस्त्यांच्या दुरुस्तीचा खर्च – २२८६.२४

Bhagat Singh Koshyari: शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य; भगतसिंह कोश्यारींना दिल्लीतून तातडीचं बोलावणं

सहा सांडपाणी प्रकल्पांवर खर्च – १०८४.६१

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांवरील खर्च – १०२०.४८

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMilQFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL2NhZy1zdGFydC1pbnZlc3RpZ2F0aW9uLWNvcnJ1cHRpb24taW4tYm1jLWFmdGVyLXN0YXRlLWdvdmVybm1lbnQtb3JkZXJzL2FydGljbGVzaG93Lzk1Njk4MzMxLmNtc9IBAA?oc=5