मुंबई बातम्या

‘कॅग’कडून चौकशी सुरू; मुंबई पालिकेतील विविध घोटाळय़ांच्या आरोपाप्रकरणी – Loksatta

मुंबई : मुंबई महापालिकेने केलेल्या करोना केंद्र उभारणी, रस्ते बांधणी, जमीन खरेदी आदी सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या ७६ कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नियंत्रक व महालेखापरीक्षकांचे (कॅग) एक पथक मंगळवारी पालिका मुख्यालयात दाखल झाले. आठ जणांच्या पथकाने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांची भेट घेतली. या पथकाने विशेषत: आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे समजते. तसेच पालिकेच्या लेखा विभागातील काही कागदपत्रांची पडताळणी केल्याचे समजते.

हेही वाचा >>> पालिका निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये?; प्रभाग रचनेच्या कामास सुरूवात करण्याचे आयुक्तांना आदेश

मुंबई महापालिकेच्या विविध विकासकामांमध्ये विशेषत: करोनाकाळात करोना उपचार केंद्राच्या स्थापनेमध्ये मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप भाजपने केले होते. करोना व टाळेबंदीच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या करोना उपचार केंद्रांमध्ये चुकीच्या पद्धतीने तत्कालीन सत्ताधारी शिवसेनेने मर्जीतील कंत्राटदाराला कामे मिळवून दिल्याचा आरोप वारंवार भाजपतर्फे करण्यात आला होता. या चौकशीसाठी कॅगचे पथक मंगळवारी सकाळी महापालिका मुख्यालयात दाखल झाले. कॅगच्या अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासमवेत बैठक घेतली.

हेही वाचा >>> तेलशुद्धीकरण प्रकल्पविरोध मावळला!; बारसूमध्ये गुंतवणुकीसाठी ठाकरे गटासह बहुतांश स्थानिकांचा पाठिंबा : सामंत यांचा दावा

या बैठकीनंतर कॅगच्या पथकाने मुंबई महापालिकेच्या लेखापाल विभागात जाऊन काही कागदपत्रांची पाहणी केली व त्याची छायाचित्रे, काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते. विशेषत करोनाकाळातील खर्च, सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेला खर्च यांची पडताळणी होते आहे. येत्या काळात कॅगचे पथक पालिकेच्या काही रुग्णालयांत जाऊन चौकशी करणार असल्याचेही समजते.

या प्रकरणांची चौकशी

  • पालिकेत २८ नोव्हेंबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत विविध १० विभागांमध्ये करण्यात आलेल्या १२ हजार २३ कोटी ८८ लाख रुपये खर्चाच्या कामांचे विशेष लेखापरीक्षण करण्यात येणार आहे.
  • त्यात प्रामुख्याने करोनाकाळात विविध बाबींवर खर्च झालेले ३५३८. ७३ कोटी, दहिसर येथे अजमेरा यांच्या भूखंडाची ३३९.१४ कोटींना पालिकेने केलेले खरेदी, चार पुलांच्या बांधकामावर झालेला १४९६ कोटींचा खर्च,  करोनाकाळात तीन रुग्णालयांत  करण्यात आलेली ९०४.८४ कोटींची खरेदी,
  • शहरातील ५६ रस्त्यांच्या दुरुस्तीवरील २२८६.२४ कोटींचा खर्च, सहा सांडपाणी प्रकल्पांवरील १०८४.६१ कोटींचा खर्च, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांवरील १०२०.४८ कोटींचा खर्च, तीन मलनि:सारण प्रक्रिया केंद्रासाठी ११८७.३६ कोटींचा खर्च आदींचे लेखापरीक्षण करण्याची विनंती राज्य सरकारने ‘कॅग’ला केली होती.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMif2h0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvaW52ZXN0aWdhdGlvbi1zdGFydGVkLWJ5LWNhZy1jYXNlLWFsbGVnYXRpb25zLXZhcmlvdXMtc2NhbXMtbXVtYmFpLW11bmljaXBhbGl0eS15c2gtOTUtMzI4NjQ0OC_SAQA?oc=5