मुंबई बातम्या

विश्लेषण: मुंबईत गोवरचा उद्रेक का? – Loksatta

-विनायक डिगे

सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात गोवरचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. मुंबईतील संशयित रुग्णांची संख्या तीन हजारांपार गेली असून, मृतांची संख्या ९ झाली आहे. यातील एक रुग्ण हा मुंबईबाहेरील आहे. मुंबईसारख्या महानगरात गोवर सारख्या साथीच्या आजाराचा उद्रेक होणे ही फारच गंभीर बाब आहे. मुंबईतील काही भागांत गोवरच्या साथीचा उद्रेक होत असताना त्याचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील असली तरी या साथीचा आजार उदभवू नये यासाठी आवश्यक असलेली लसीकरण मोहीम राबवण्यात किंवा सर्व बालकांना लस देण्यात महापालिका अपयशी ठरली असल्याचे दिसून येत आहे. गोवर काय आहे, मुंबईत त्याचा उद्रेक का झाला, सद्यःस्थिती काय याचा आढावा

गोवर काय आहे? 

जगभरातील मुलांमध्ये मृत्यूच्या मुख्य कारणांपैकी गोवर हे एक कारण आहे. गोवर हा विषाणूमुळे होणार संसर्गजन्य आजार आहे. गोवरची लागण झालेल्या व्यक्तीच्या शिंकण्यातून, खोकण्यातून हवेमार्फत हा विषाणू सहज पसरतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या सर्वच बालकांना प्रादुर्भाव होऊ शकतो. याचे विषाणू हवेत दोन तास सक्रिय राहतात. हा आजार सामान्यत: लहान मुलांना होतो. एखाद्या लहान मुलाचे लसीकरण झाले नसल्यास त्याला गोवरची लागण होण्याची शक्यता अधिक असते. गोवरची लागण झाल्याने शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकते. मात्र लागण झालेले बालक कुपोषित किंवा अशक्त असेल तर हा आजार त्याच्या जिवावर बेतण्याची शक्यता असते. 

गोवरची लक्षणे काय?

गाेवरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये विशेषत: ताप, खोकला, वाहणारे नाक आणि डोळ्यांची जळजळ असा त्रास होतो. लक्षणे सुरू झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी लहान मुलांच्या तोंडात लहान पांढरे डाग येतात. त्यानंतर तीन ते पाच दिवसांनंतर चेहऱ्यावर व उर्वरित शरीरावर लाल पुरळ येण्यास सुरुवात होते. त्याचप्रमाणे अतिसार, न्यूमोनिया, कानातून पू येणे अशी लक्षणेही दिसू लागतात. 

गोवरचा उद्रेक होण्यामागची कारणे काय?

गाेवरचा प्रतिबंध रोखण्यासाठी एमआर १ आणि एमएमआर या दोन लशी दिल्या जातात. मात्र मुंबईतील २० हजार बालकांचे पुरेसे लसीकरण झालेले नाही. कोविड काळात संपूर्ण आराेग्य विभागाचे लक्ष हे कोरोनाबाधित रुग्णांवर केंद्रित होते. त्यामुळे या काळात अन्य साथीच्या आजारांकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळेच कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये अन्य साथीच्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. कोरोना काळात गोवरची लस देण्यासाठीच्या लसीकरण मोहिमा काही अंशी कमी झाल्या होत्या. त्यामुळे नऊ महिने ते दोन वर्षे या वयोगटातील अनेक मुले लसीकरणापासून वंचित राहिली. त्यातच मुंबईतील ज्या आठ विभागांमध्ये गाेवरचा उद्रेक झाला आहे. त्या आठ विभागात काही समाजातील नागरिकांकडून बालकांना लस देण्यास नकार देण्यात येतो. अंगणवाडी सेविकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तेथून हाकलून देण्याचे प्रकार घडले हाेते. त्यामुळे लसीकरणापासून वंचित राहणाऱ्या या मुलांना मोठ्या प्रमाणात गोवरची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. गोवंडी, मानखुर्द, कुर्ला या भागात दाट वस्ती असल्याने या साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. 

मुंबईत सद्यःस्थिती काय? 

मुंबईत सध्या १८४ रुग्णांना गोवरची लागण झाली असून, त्यातील ७३ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, ६२ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, तर ९ रुग्णांना प्राणवायू द्यावा लागत आहे. तर २ रुग्णांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. तसेच मुंबईत ३०३६ संशयित रुग्ण असून, त्यांच्यावर पालिकेकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहेत. ताप व पुरळ आलेल्या संशयित रुग्णांना पालिकेकडून २४ तासांच्या फरकाने अ जीवनसत्त्वाच्या दोन मात्रा दिल्या जात आहेत.

चार वर्षांत राज्यातील स्थिती कशी होती? 

मागील चार वर्षांतील राज्यातील गोवरच्या रुग्णांच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. २०१९ मध्ये १३३७ संशयित रुग्ण तर १५३ निश्चित रुग्णांचे निदान झाले होते. त्यानंतर २०२०मध्ये राज्यामध्ये २१५० संशयित रुग्ण तर १९३ निश्चित रुग्ण आढळले होते. तसेच २०२१मध्ये ३६६८ संशयित रुग्ण तर ९२ निश्चित रुग्ण सापडले होते. मात्र दरवर्षी गोवरच्या संशयित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत असून, यंदान अद्यापपर्यंत राज्यात ६४२१ संशयित तर ५०३ निश्चित रुग्ण आढळले आहेत. 

मुंबईतील लसीकरणाची सध्याची स्थिती काय?

गोवरचा उद्रेक झाल्यानंतर मुंबई महापालिकेने लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवण्यास सुरुवात केली. मुंबईत १ ऑक्टोबरपासून ८८४ अतिरिक्त लसीकरण शिबिरे घेण्यात आली. यामध्ये एम आर १ ची ८१९९ बालकांना तर एमएमआर ही लस ६८१० बालकांना अवघ्या दीड महिन्यांत देण्यात आली आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiXWh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9leHBsYWluZWQvd2h5LWRpZC1tZWFzbGVzLWhpdC1tdW1iYWktaGFyZC1wcmludC1leHAtc2NzZy05MS0zMjg2ODM2L9IBAA?oc=5