मुंबई बातम्या

मुंबईतून २० मिनिटांत नवी मुंबई गाठण्यासाठी थांबावं लागणार, ट्रान्सहार्बर लिंकला १३ महिने विलंब – Maharashtra Times

मुंबई : मुंबईला नवी मुंबईशी कमीत कमी वेळेत जोडणाऱ्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाला १३ महिने विलंब झाला आहे. विविध कारणांमुळे आत्तापर्यंत प्रकल्पाचे जवळपास ३८ हजार मनुष्यदिन वाया गेल्याचे एमएमआरडीएच्या या संदर्भातील अहवालात समोर आले आहे.

मुंबईहून नवी मुंबईला जाणारा सध्याचा रस्ता वाहतुकीच्या कोंडीने ग्रस्त आहे. या कोंडीपासून सुटका होण्यासाठी ७० टक्के समुद्रावरून जाणारा शिवडी ते न्हाव्हा-शेवा हा मार्ग मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए) उभारत आहे. मुंबईत शिवडीहून सुरू होणारा हा मार्ग नवी मुंबईत उरणजवळील चिर्लेपर्यंत २१.८० किलोमीटर लांबीचा आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) असे नाव असलेल्या या मार्गाचा सप्टेंबरअखेरपर्यंचा अहवाल एमएमआरडीएने तयार केला आहे. त्यानुसार मार्ग सुरू होण्यास १३ महिने विलंब झाल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणेकरांना मोठा शब्द, जाहीर कार्यक्रमातून दिली ग्वाही
९८ पानांच्या या अहवालात टप्पानिहाय प्रकल्पाची प्रगती मांडण्यात आली आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा अंतिम टप्पा सप्टेंबर २०२२ला पूर्ण होणार होता. त्यानंतर तत्काळ टोल आकारणीसह हा मार्ग सुरू होणे अपेक्षित होते. पण आता प्रकल्पाचा अखेरचा टप्पा ऑगस्ट २०२३मध्ये पूर्ण होऊन टोल आकारणीसह हा मार्ग ऑक्टोबर २०२३पासून सुरू होईल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

प्रत्येक प्रकल्पाचा त्रुटी जबाबदारी (डिफेक्ट लायबिलिटी) कालावधी असतो. एमटीएचएलच्या अखेरच्या टप्प्याचा हा कालावधी आधी ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२४ होता. पण आता मार्ग विलंबाने सुरू होत असल्याने हा कालावधी सप्टेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२५ असेल. तसेच मार्ग सुरू झाला की त्याच्या देखभालीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाते. मूळ वेळापत्रकानुसार ही नियुक्ती प्रक्रिया ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ दरम्यान राबवली जाणार होती. पण आता ती ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान राबवली जाणार आहे.

मुंबईकरांनो सावधान! बालकांप्रमाणे प्रौढांमध्येही गोवरची लागण, गंभीर आहेत लक्षणं…
या विलंबाची अनेक कारणे आहेत. या प्रकल्पाच्या संपूर्ण कालावधीत सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत ३८ हजार ६४ मनुष्यदिन व ३ लाख ४ हजार ४४० मनुष्यतास, इतका कामाचा वेळ वाया गेला आहे. यादरम्यान करोना कालावधी असताना लॉकडाउनमुळेदेखील कामाचा बराच कालावधी वाया गेल्याचे दिसून येत आहे.

टप्पानिहाय बांधकाम व विलंब

टप्पा मूळ वेळापत्रक सुधारित
एक व दोन मार्च २०१८-सप्टेंबर २०२२ मार्च २०१८-सप्टेंबर २०२३

तीन मार्च २०१८-सप्टेंबर २०२१ मार्च २०१८-मार्च २०२३

चार ऑक्टोबर २०२०-सप्टेंबर २०२२ जून २०२२-ऑगस्ट २०२३

टोल आकारणी सप्टेंबर २०२२ ऑक्टोबर २०२३

राज्यपालांच्या वक्तव्याने गोंधळ; विरोधकांचा हल्लाबोल, तर सत्ताधाऱ्यांकडून सारवासारव

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMisAFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL3RoZS10cmFuc2hhcmJvci1saW5rLXdpbGwtYmUtZGVsYXllZC1ieS0xMy1tb250aHMtcmVhY2gtbmF2aS1tdW1iYWktaW4tanVzdC0yMC1taW51dGVzLWZyb20tbXVtYmFpL2FydGljbGVzaG93Lzk1NjQ3NzA1LmNtc9IBAA?oc=5