मुंबई बातम्या

मुंबई: लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात घुसखोरी करणाऱ्या ७८ हजार ९९४ जणांवर मध्य रेल्वेची कारवाई – Loksatta

लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात सामान्य डब्यात प्रवाशांकडून मोठया प्रमाणात घुसखोरी होत आहे. त्यामुळे प्रथम श्रेणीचा पास किंवा तिकीट काढूनही या प्रवाशांना बसण्यासाठी आसन किंवा उभे राहण्यासाठी जागाही उपलब्ध होत नाही. अशा ७८ हजार ९९४ घुसखोर प्रवाशांवर मध्य रेल्वे तिकीट तपासनिसांकडून जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ मध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर धावत असलेल्या बारा डबा लोकल गाड्यांना प्रथम श्रेणीचे तीन डबे असतात. यात एक डबा पूर्णपणे पुरुष प्रवाशांसाठी तर, दोन डब्यांत प्रत्येकी अर्धा डबा महिला आणि पुरुष प्रवाशांमध्ये विभागला आहे. प्रथम श्रेणीच्या डब्यातील आसनव्यवस्था ही द्वितीय श्रेणीच्या डब्यातील आसनव्यवस्थेपेक्षा वेगळी आहे. या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक असते. त्यामुळे काहीवेळा गर्दीला तोंड देताना या डब्यातील पास किंवा तिकीटधारकांना उभ्यानेही प्रवास करावा लागतो.

हेही वाचा: पांढऱ्या रंगाची कपडे का आणि दाढी का ठेवता? चिमुकल्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्र्यांचं खुमासदार उत्तर; म्हणाले…

मात्र ही गर्दी अधिकच वाढली असून सामान्य डब्यातील घुसखोर प्रवाशांमुळे प्रथम श्रेणीच्या नियमित प्रवाशांना डब्यात प्रवेश मिळत नाही. तसेच अनेकदा उभ्याने प्रवास करावा लागतो. यामध्ये महिला आणि पुरुष प्रवाशांमध्ये प्रथम श्रेणी डबा विभागून असल्याने गर्दी होऊन आणखीच अडचण होते. प्रथम श्रेणी प्रवाशांनी द्वितीय श्रेणीचे तिकीट किंवा पास असलेल्या प्रवाशांकडे विचारणा केल्यास अनेकदा वादही होतात. त्याविरोधात मध्य रेल्वे प्रशासनाकडे तक्रारीही आल्या आहेत. तिकीट तपासनिसांकडून नियमितपणे कारवाईही होते. मात्र त्यानंतरही घुसखोरी कमी होत नाही. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २०२१मध्ये प्रथम श्रेणी डब्यात प्रवेश करणाऱ्या १६ हजार ६८१ घुसखोर प्रवाशांवर कारवाई केली होती. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून ६१ लाख ९० हजार १०० रुपये दंड वसूल केला. कारवाईत २०२२ मध्ये वाढ झाली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ मध्ये ७८ हजार ९९४ जणांवर कारवाई केली असून २ कोटी ०९ लाख ३३ हजार रुपये दंड वसूल केल्याचे रेल्वेेने सांगितले.

हेही वाचा: जितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेल्या गुन्ह्यावरून अजित पवारांची शिंदे सरकारवर टीका; म्हणाले, “मुख्यमंत्री गाडीत असताना…”

मी प्रथम श्रेणी पासधारक आहे. मात्र सकाळी सीएसएमटी दिशेने किंवा रात्री नऊ दहा नंतर डोंबिवली दिशेने प्रवास करताना अनेकदा बसण्यासाठी जागा मिळत नाही. डब्यात द्वितीय श्रेणीचेही प्रवासी सर्रासपणे प्रवास करतात. तिकीट तपासल्यावर प्रवाशांनी घुसखोरी केल्याचे समोर येते. मात्र अशा प्रवाशांनी एकतर प्रथम श्रेणीचा पास काढून प्रवास करावा किंवा घुसखोरी करू नये त्यामुळे प्रथम श्रेणी प्रवासी आणि रेल्वे प्रशासनालाही त्रास होणार नाही. – मयूर साळुंके, डोंबिवली रहिवासी

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiiQFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL2NlbnRyYWwtcmFpbHdheS1hY3Rpb24tYWdhaW5zdC10cmVzcGFzc2Vycy1pbi1sb2NhbC1maXJzdC1jbGFzcy1jb2FjaGVzLW11bWJhaS1wcmludC1uZXdzLXRtYi0wMS0zMjYyNzc1L9IBAA?oc=5