मुंबई बातम्या

मुंबई: वांद्रे येथे तरुणाचे अपघाती निधन, दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल – Loksatta

भरधाव वेगात धावणारी दुचाकी वांद्रे येथे पदपथावर धडकून झालेल्या अपघातात मुद्दसीर रबाब खान (१७) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दुचाकीस्वार इम्रान अकबर खान (२१) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. इम्रान मुद्दसीरचा चुलत भाऊ आहे. या अपघातात इम्रान हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>>मुंबई : मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आमिष दाखवून वैज्ञानिकाची फसवणूक

वांद्रे येथील कलानगर परिसरातील बीकेसी-वांद्रे पुलावर शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास हा अपघात झाला. इम्रान कुर्ला येथील नेहरू नगर येथील रहिवासी असून तो बांधकाम व्यवसायिक आहे. मुद्दसीर हा त्याचा चुलत भाऊ असून तो नालासोपारा येथील प्रगतीनगर, शिव आश्रम अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होता. सध्या तो शिक्षण घेत होता. शनिवारी ते दोघेही इम्रानच्या दुचाकीवरुन कुर्ला येथून माहीमच्या दिशेने जात होते. भरधाव वेगात दुचाकी चालविण्याच्या प्रयत्नात इमानचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची दुचाकी पदपथावर धडकली. या अपघातात ते दोघेही गंभीररीत्या जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच खेरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुद्दसीर आणि इम्रानला तातडीने वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मुद्दसीरला मृत घोषित केले, तर इम्रानवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा भोसले यांच्या तक्रारीवरून खेरवाडी पोलिसांनी इम्रानविरुद्ध गुन्हा नोंदविला. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiZWh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvYWNjaWRlbnRhbC1kZWF0aC1vZi15b3V0aC1pbi1iYW5kcmEtbXVtYmFpLXByaW50LW5ld3MtYW15LTk1LTMyNDU3NDkv0gEA?oc=5