मुंबई बातम्या

मुंबईच्या हवेचा दर्जा खालावल्याचा केंद्राकडून इशारा; पुढील 2 दिवस वातावरण ‘जैसे थे’च – My Mahanagar

मुंबई मधील हवेचा दर्जा खालावला असल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईमध्ये (mumbai) सोमवारी रात्रीपासूनच हवेचा दर्जा खालावला आहे. तशी जाणीव सुद्धा मुंबईकरांनाही झाली. मंगळवारी 8 नोव्हेंबर रोजी दिवसभर हवेचा दर्जा घसरलेलाच होता. हवेची गुणवत्ता नोंदविणाऱ्या ‘सफर’ या प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या नोंदणीमध्ये हवेची गुणवत्ता खालावली असल्याचे समोर आले. तर पुढील दोन दिवस वातावरण असेच राहील असा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आला आहे.

‘सफर’ने नोंदविल्याप्रमाणे हवेचा गुणवत्ता निर्देशांक 245 होता. तर माझगाव आणि नवी मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता अतिवाईट स्वरूपाची होती अशी नोंद करण्यात आली. माझगावमध्ये पीएम 2.5 चा निर्देशांक 300 पेक्षा अधिक होता, तर पीएम 10 चा निर्देशांक मात्र मध्यम श्रेणीतील होता. कुलाबा, वांद्रे-कुर्ला संकुल, चेंबूर, अंधेरी, मालाड या केंद्रांवरही मंगळवारी दिवसभरात हवेची गुणवत्ता वाईट नोंदविली गेली. कुलाबा (colaba) येथेही पीएम 2.5 प्रदूषके अधिक होती, तर वांद्रे-कुर्ला संकुल केंद्रावर पीएम 2.5 आणि नायट्रोजन डाय ऑक्साइड या दोन्ही प्रदूषकांची श्रेणी वाईट नोंदविण्यात आली.

अंधेरी (andheri) आणि मालाड (malad) केंद्रावरही पीएम 2.5 ची पातळी खालावली होती. या केंद्रांवर पीएम 10 ची पातळी मध्यम श्रेणीतील नोंदविली गेली. त्याचसोबत मुंबईमधील वरळी (worli) , भांडुप, बोरिवली या केंद्रांवर मध्यम स्वरूपाची हवेची गुणवत्ता होती. सध्या हवेचा वेग मंदावला असल्याने वातावरणात प्रदूषके साचून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर पुढील दोन दिवस हवेची स्थिती अशीच राहणार असल्याची शक्यता आहे. बुधवारी आणि गुरुवारीसुद्धा मुंबईतील हवेत प्रदूषण जाणवेल असा अंदाज सुद्धा ‘सफर’ तर्फे वर्तविण्यात आला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार कुर्ला येथे सोमवारी आणि मंगळवारी रात्रीच्या वेळी पीएम 10 या प्रदूषकाची पातळी अतिवाईट होती. माझगाव विभागात तासांच्या नोंदींमध्ये पीएम 2.5 च्या दर्जा रात्रीच्या सुमारास अतिवाईट तर दुपारी धोकादायक झाल्याचेही समोर आले. तर देवनार मध्येही रात्री काही तास हवेचा दर्जा अतिवाईट नोंदविण्यात आला, तर दिवसभरात दुपारी 12 पर्यंत हवेची गुणवत्ता वाईट होती. अंधेरीमधील चकाला येथे पीएम 2.5 मुळे हवा वाईट आणि अतिवाईट असल्याचे नोंदविण्यात आले. वांद्रे – कुर्ला संकुल येथेही रात्रीपासून सकाळी 9 पर्यंत हवेची गुणवत्ता अतिवाईट होती. दुपारनंतर हवेची गुणवत्ता काही प्रमाणात सुधारल्याचे दिसले.


हे ही वाचा – मुंबईत गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्ण संख्येत दरमहा वाढ

ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड करा

nidhi pednekar

मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiRGh0dHBzOi8vd3d3Lm15bWFoYW5hZ2FyLmNvbS9tdW1iYWkvYmFkLWFpci1xdWFsaXR5LWluLW11bWJhaS81MDMwMzEv0gFIaHR0cHM6Ly93d3cubXltYWhhbmFnYXIuY29tL211bWJhaS9iYWQtYWlyLXF1YWxpdHktaW4tbXVtYmFpLzUwMzAzMS9hbXAv?oc=5