मुंबई बातम्या

मुंबईत राबवणार शहरी शेतीचा प्रयोग; ‘मिशन ग्रीन मुंबई’च्या उपक्रमातून १० लाख झाडांचे उद्दिष्ट – Maharashtra Times

मुंबई : ‘मिशन ग्रीन मुंबई’च्या माध्यमातून मुंबईत शहरी शेतीच्या माध्यमातून अन्नधान्य, फळे आणि भाज्या यासाठीचे परावलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने चळवळ राबवण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये १० लाख फळझाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. दसऱ्यापासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून आत्तापर्यंत ४०० रोपे लावण्यात आली आहेत.

मुंबई शहर अन्नधान्य, फळे आणि भाज्या यासाठी पूर्णपणे शहराबाहेरच्या स्रोतांवर अवलंबून आहे. अलीकडच्या काळात शहरी शेतीची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईमध्ये अनेक आदिवासी राहतात. जे उदरनिर्वाहासाठी शेती करतात. या शेतीला चालना देत शहरी शेतीच्या प्रयोगाचा विस्तार वाढवण्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून ही योजना आखण्यात आलेली आहे. यामध्ये १,८००हून अधिक आदिवासींचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचबरोबर मुंबईकरांना ताज्या भाज्या, फळे उपलब्ध व्हावीत, हा उद्देश आहे.

मुंबई परिसरामध्ये मनोरीसारख्या अनेक दुर्लक्षित जागा आहेत. या जागांचा वापर केल्यास वृक्षलागवडीच्या आधुनिक पद्धतीने मुंबईसाठी फळ उत्पादन घेण्यासाठी त्यांचा वापर करता येईल, अशी माहिती मिशन ग्रीन मुंबईचे शुभजीत मुखर्जी यांनी दिली. मढ-मनोरीमध्ये ६५०हून अधिक शेतकरी आहेत. आंबा, नारळ, लिंबू, सीताफळ, डाळिंब या फळझाडांच्या लागवडीमुळे त्यांनाही फायदा होऊ शकतो, तसेच मुंबईकरांसाठी फळे उपलब्ध होऊ शकतात. या रोपांचे दान करण्यासाठी आणि ती लावण्यासाठी विविध संस्था, नागरिक यांची मदत घेण्यात येत आहे. अशाप्रकारे विविध आदिवासी पाड्यांना या उपक्रमामध्ये सामवून घेतले तर याचा फायदा मुंबईकरांना होणार आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMikQFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL3RhcmdldC1vZi0xMC1sYWtoLWZydWl0LXRyZWVzLXVuZGVyLW1pc3Npb24tZ3JlZW4tbXVtYmFpLWluaXRpYXRpdmUvYXJ0aWNsZXNob3cvOTUzNzA1ODcuY21z0gEA?oc=5