मुंबई बातम्या

मुंबई महानगरात सीएनजी, पीएनजी महागला ; नवे दर आजपासून लागू – Loksatta

मुंबई : मुंबई महानगरात पुन्हा एकदा ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’च्या दरात मोठी वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने मुंबई महानगरात सीएनजी आणि पीएनजीच्या प्रतिकिलो दरात अनुक्रमे तीन रुपये ५० पैसे आणि एका रुपया ५० पैसे वाढ केली असून ती आज, ५ नोव्हेंबरपासून लागू होईल. त्यामुळे सीएनजीचा नवा दर प्रतिकिलो ८९ रुपये ५० पैसे आणि पीएनजीचा ५४ रुपये एवढा झाला आहे.

हेही वाचा >>> आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे आणि मी…”

मुंबई महानगरात रिक्षा आणि टॅक्सी ‘सीएनजी’वरच धावतात. त्यांना या दरवाढीचा फटका बसणार आहे. घरगुती गॅस वापरणाऱ्यांच्याही खिशाला कात्री लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर नैसर्गिक वायूच्या दरात झालेली वाढ आणि केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२२ पासून केलेली ४० टक्के वाढ यामुळे ही किंमतवाढ करावी लागत असल्याचे ‘महानगर गॅस’ने म्हटले आहे.

हेही वाचा >>> मुंबई : जे.जे.रुग्णालयात सापडला भुयारी मार्ग

यापूर्वी १७ ऑगस्टला सीएनजीच्या दरात सहा रुपये आणि पीएनजीच्या दरात चार रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर ४ ऑक्टोबरला सीएनजीच्या दरात पुन्हा ६ रुपयांची आणि पीएनजीच्या दरात ४ रुपयांची वाढ केली गेली. परिणामी सीएनजीचा दर ८६ रुपये तर पीएनजीचा दर ५२ रुपये ५० पैसे झाला होता. आता पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली आहे. ती आज, ५ नोव्हेंबरपासून लागू होत आहे.

डिझेलशी स्पर्धा : गेल्या सात महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. मात्र सीएनजी आणि पीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आता मुंबईतील सीएनजीच्या दराने डिझेलच्या दराशी बरोबरी साधली आहे.

सध्याचा दर     नवा दर (प्रतिकिलो)

सीएनजी :      ८६     ८९.५० रु.

पीएनजी :      ५२.५०  ५४ रु.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMibWh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvY25nLXBuZy1wcmljZXMtaGlrZWQtaW4tbXVtYmFpLW5ldy1yYXRlcy1lZmZlY3RpdmUtZnJvbS10b2RheS16d3MtNzAtMzIzNTg5NC_SAQA?oc=5