मुंबई बातम्या

मुंबई : आरेत मानवी वस्तीत मगर – Loksatta

आरेत बिबट्याचा वावर असताना आता मानवी वस्तीत मगर आढळली आहे. मंगळवारी दुपारी आरेतील युनिट क्रमांक ३१ मधील आंबवडी येथून वन विभागाने मगरीला ताब्यात घेतले. लवकरच या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.युनिट क्रमांक ३१, आंबवडी येथील एका आदिवासी शेतकऱ्याने शेतीला पाणी देण्यासाठी एक छोटासा खड्डा करून त्यात पाणीसाठा केला आहे. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास या खड्ड्यातील गाळ काढत असताना त्याला मासा आढळला. या माशाला पकडण्यासाठी त्याने जाळे टाकले. जाळ्यात अडकलेला मासा बाहेर काढण्यासाठी शेतकरी गेला तेव्हा त्याला तेथे मगर असल्याचे दिसले. त्याने तात्काळ वनविभागाला आणिवाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन, टेल्स ऑफ होप या सेवाभावी संस्थांना कळवले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि संस्थेच्या सदस्यांनी या मगरीला ताब्यात घेऊन ठाण्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. तिथे तिचे तपासणी करण्यात आली लवकरच या मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>मुंबईत पहिल्या दिवशी सीटबेल्ट न बांधणाऱ्या १८५ जणांवर कारवाई

वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनचे राज जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मादी मगर असून ३.३ फूटीच्या या मगरीचे वजन १.७ किलो आहे. तिचे वय दीड ते दोन वर्ष असे असण्याचा अंदाज आहे. आरेत मगर आढळलेल्या ठिकाणापासून बऱ्याच दूरवर कोणताही मोठा पाणीसाठा, तळे, तलाव नाही. अशावेळी ही मगर या खड्ड्यात कशी आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मगर एका पाणीसाठ्यातून दुसऱ्या पाणीसाठ्यात स्थलांतर करतात. मात्र मोठा प्रवास करून ही मगर येणे शक्य नाही. त्यामुळे मगर आली कशी हा मुख्य प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर पवई तलावात मासेमारी करताना आढळलेली मगर कोणी येथे आणून सोडली असावी असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiaWh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvY3JvY29kaWxlcy1pbi1odW1hbi1oYWJpdGF0aW9uLWluLWFhcmV5LW11bWJhaS1wcmludC1uZXdzLWFteS05NS0zMjMwMDI2L9IBbmh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvY3JvY29kaWxlcy1pbi1odW1hbi1oYWJpdGF0aW9uLWluLWFhcmV5LW11bWJhaS1wcmludC1uZXdzLWFteS05NS0zMjMwMDI2L2xpdGUv?oc=5