राणीबागेत दिवसभरात ३१ हजार पर्यटक
Published on : 30 October 2022, 8:16 pm
मुंबई : मुंबई महापालिकेच्या भायखळास्थित वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाला (राणी बाग) आज रविवारी (ता. ३०) एकाच दिवशी तब्बल ३१ हजार २३२ पर्यटकांनी भेट दिली. या विक्रमी संख्येमुळे यापूर्वीचा २९ मे २०२२ रोजीचा विक्रम मागे टाकून या प्राणिसंग्रहालयाने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. राणीबाग नूतनीकरण करून या ठिकाणी विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले आहेत. त्यासोबतच पेंग्विन प्रदर्शनीदेखील निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय फक्त मुंबईतीलच नव्हे, तर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचे विशेषतः लहान मुलांचे आकर्षण केंद्र ठरले आहे. कोविड कालावधीनंतर पर्यटकांचा ओघ वाढला असून आठवड्याच्या अखेरीस म्हणजे शनिवार-रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या कालावधीत या उद्यान व प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ होते.
११ लाख महसुली उत्पन्न
यापूर्वी २९ मे रोजी या एकाच दिवशी ३० हजार ३७९ पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन विक्रमी संख्येची नोंद केली होती. त्या दिवशी सुमारे १० लाख ८४ हजार ७४५ रुपयांचे महसुली उत्पन्न महापालिकेच्या तिजोरी जमा झाले होते. हा विक्रम आज (ता. ३०) रोजी मोडीत निघाला आहे. आज एकाच दिवसात तब्बल ३१ हजार २३२ पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. त्यातून सुमारे ११ लाख पाच हजार ९२५ रुपयांचे महसुली उत्पन्न प्राप्त झाले.
शनिवारी २७ हजार…
शनिवारी (ता. २९) २७ हजार ३९२ पर्यटकांनी भेट दिली होती. त्यातूनही नऊ लाख ८८ हजार २५ रुपये उत्पन्नाची भर पडली. याचाच अर्थ या दोन दिवसांत ५८ हजार ६२४ पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद झाली असून त्यातून एकूण २० लाख ९३ हजार ९५० रुपये इतके विक्रमी महसुली उत्पन्नदेखील प्राप्त झाले आहे.
राणीबागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने गैरसोय होऊ नये म्हणून महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच अतिरिक्त १५ सुरक्षा रक्षक नेमून गर्दीचे योग्य रीतीने नियंत्रण करण्यात आले. तसेच पर्यटकांचे व्यवस्थापन करताना काळजी म्हणून दोनदा मुख्य प्रवेशद्वार तात्पुरते बंद करून नियोजन करण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात आजपर्यंत सुमारे अडीच लाख पर्यटकांनी उद्यानाला भेट दिल्याची नोंद झाली असून त्यातून तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे.
– डॉ. संजय त्रिपाठी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b09677 Txt Mumbai
Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiXmh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbXVtYmFpL3RvZGF5cy1sYXRlc3QtbWFyYXRoaS1uZXdzLW1iaTIyYjA5Njc3LXR4dC1tdW1iYWktMjAyMjEwMzAwMjQ3MTTSAQA?oc=5