मुंबई बातम्या

मुंबई : खार येथील क्रीडांगणासाठी आरक्षित जागा विकासकाने बळकावली ; वास्तुविशारदाचा उच्च न्यायालयात अहवाल – Loksatta

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने स्थगिती देऊनही खार येथे क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या एकूण सहा हजार चौरस मीटरपैकी ७८५ चौरस मीटर भूखंडावर विकासकाने अतिक्रमण केल्याचा अहवाल वास्तुविशारदाने उच्च न्यायालयात सादर केला. न्यायालयाच्या आदेशानुसार, या जागेची पाहणी करून वास्तुविशारदाने हा अहवाल न्यायालयात सादर केला.

हेही वाचा >>>मुंबई : गोरेगाव मध्ये रिक्षाचालकाकडून तरुणाचा खून

क्रीडांगणासाठी आरक्षित भूखंडाशेजारील विकासकाच्या बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाने १९९५ मध्ये स्थगिती दिली होती. त्यानंतरही आदेशाचे उल्लंघन करून विकासकाने बांधकाम सुरू ठेवल्याचा आरोप जनहित याचिकेद्वारे करण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) इंटिग्रेटेड रिअल्टीला या जागेवर प्रकल्प राबवण्यास परवानगी दिल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने या याचिकेची गंभीर दखल घेऊन विकासकाला फटकारले होते. त्याचवेळी आरक्षित भूखंडावर अतिक्रमण झाले आहे का ? असेल तर किती प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे ? अशी विचारणा करून शेटगिरी ॲण्ड असोसिएट्सचे स्वतंत्र वास्तुविशारद अमोल शेटगिरी यांना न्यायालयाने बांधकाम सुरू असलेली जागा वगळून किती मोकळी जागा उपलब्ध आहे याची पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. याचिकेवर अंतिम निर्णय देण्यासाठी वास्तुविशारदातर्फे ही पाहणी करणे आवश्यक असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली होती.

हेही वाचा >>>मुंबई : ७५० चौरस फुटांच्या घरासाठी धारावीकरांचे आंदोलन ; धारावी सेक्टर १ मधील चाळकऱ्यांची मागणी

या प्रकरणी नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी शेटगिरी यांनी पाहणी अहवाल सादर केला. भूखंड विचित्र प्रकारे पसरलेला असल्याने त्याची केवळ प्रत्यक्ष पाहणीच शक्य होती, असे शेटगिरी यांनी अहवालात म्हटले आहे. तसेच क्रीडांगणासाठी आरक्षित सहा हजार चौरस मीटर भूखंडापैकी ७८४.८२ चौरस मीटर जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे, असे नमूद करताना अहवालात अतिक्रमण केलेल्या जागेवरील बांधकामाचे स्वरूपही विशद करण्यात आले आहे. त्यापेकी ६०३.७७ चौरस मीटर जागेवर पुनर्वसित इमारतीचे बांधकाम असून उर्वरित अतिक्रमण केलेल्या १८१.०५ चौरस मीटर जागेवर भूगर्भातील पाण्याची टाकी आणि संरक्षक भिंत असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र या संरक्षक भिंतीचे काम अद्याप सुरू झालेले नाही, असेही अहवालात म्हटले आहे.

याशिवाय क्रीडागंणाच्या १३७.७९ चौरस मीटर जागेवर बांधकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खोल्या बांधण्यात आल्या आहेत. तथापि, पाहणीच्या वेळी विकासकाकडून याबाबत माहिती मागवण्यात आली असता त्याने या खोल्यांचे बांधकाम तात्पुरत्या स्वरूपाचे असून बांधकाम पूर्ण झाल्यावर ते तोडण्यात येतील, असे सांगितल्याचे अहवालात म्हटले आहे. रिकाम्या जागेच्या शिल्लक क्षेत्रावर सध्या चाळी आणि झोपडपट्ट्या आहेत, असेही शेटगिरी यांनी नमूद केले आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiiwFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL3RoZS1sYW5kLXJlc2VydmVkLWZvci10aGUtcGxheWdyb3VuZC1hdC1raGFyLXdhcy1ncmFiYmVkLWJ5LXRoZS1kZXZlbG9wZXItbXVtYmFpLXByaW50LW5ld3MtYW15LTk1LTMyMTc0MzIv0gEA?oc=5