मुंबई बातम्या

Mumbai : सहा दशकानंतर प्रत्यक्षात येणार एमटीएचएल – Sakal

Published on : 27 October 2022, 4:44 am

मुंबई : मुंबई, नवी मुंबई आणि रायगडला जोडण्यासाठी सागरी पूल उभारण्याची शिफारस 60 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र राजकीय इच्छाशक्तीमुळे या प्रकल्पाचा विचार होऊ शकला नाही. अखेर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाचे नियोजन सुरु झाले आणि लवकरच हा प्रकल्प पुढील वर्षात सुमारे 60 वर्षांनी प्रत्यक्षात येणार आहे. हाच प्रकल्प भारतातील सर्वात लांब सागरी सेतू ठरणार असून पुढील दोन दशकात वाहनांची रहदारी वाढणार असल्याने 2042 पर्यंत सागरी सेतूवर आणखी दोन लेनची आवश्यता भासणार आहे.

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच मुंबई शहर आणि नवी मुंबई यामधील दळणवळण वाढण्याच्या दृष्टीने 2004 पासून मुंबई पारबंदर प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरीनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) 21.8 किमी लांबीचा सहा लेनच्या समुद्री मार्गाचे बांधकाम हाती घेतले आहे.

यात 16.5 किमीचा समुद्रातून जाणारा मार्ग आणि उर्वरित 5.3 किमीचा जमिनीवरील रस्ता यातून मुंबई आणि नवी मुंबई या शहरांना जोडले जाणार आहे. हा मार्ग मध्य मुंबईत शिवडी, मुंबईच्या खाडीवर शिवाजी नगर आणि नवी मुंबईत राष्ट्रीय महामार्ग 348 वर चिरले येथे जोडला जाणार आहे. सध्या या प्रकल्पाचे सुमारे 84 टक्के काम पूर्ण झाले असून या प्रकल्पाचे काम 2023 च्या अखेरीस पूर्ण होणार असून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात असल्यास हा सागरी सेतू भारतातील सेवेत लांब ठरणार आहे.

एमटीएचएल खुला होताच या मार्गावरून दरदिवशी सुमारे 70 हजार वाहने धावण्याचा अंदाज आहे. तसेच 2032 मध्ये या सेतूवरून 1 लाख 3 हजार 900 वाहने तर 2042 मध्ये 1 लाख 45 हजार वाहने दरदिवशी धावतील असा अंदाज एमटीएचएलच्या तिमाही प्रगती अहवालात वर्तविण्यात आला आहे.

शिवडी आणि शिवाजी नगर इंटरचेंज दरम्यान 2032 पर्यंत दररोज सुमारे 1 लाख 3 हजार 900 वाहने धावण्याचा अंदाज आहे. त्यामध्ये सर्वाधिक 66 हजार 400 कार, 14 हजार 100 टॅक्सी, 3 हजार 700 बस आणि त्याच प्रमाणात अवजड वाहने धावणार आहेत. तर 2042 मध्ये यामध्ये वाढ होऊन शिवडी आणि शिवाजी नगर इंटरचेंज दरम्यान 1 लाख 45 हजार 500 वाहने दररोज धावणार आहेत. यामध्ये 94 हजार 100 कार, 20 हजार 200 टॅक्सी, आणि 3 हजार 700 बसेस धावण्याचा अंदाज आहे.

तर शिवाजी नगर इंटरचेंज आणि चिर्ले इंटरचेंज दरम्यान 2032 मध्ये 29 हजार 600 वाहने धावण्याचा अंदाज असून 2042 मध्ये हि संख्या 55 हजारापर्यंत वाढणार आहे. या इंटरचेंज दरम्यान 2032 मध्ये 21 हजार 300 कार, 400 टॅक्सी, 3 हजार 700 बस असतील. तर 2042 मध्ये या इंटरचेंज दरम्यान 43 हजार 300 कर, 2 हजार 300 टॅक्सी आणि 3 हजार 700 बसेस धावतील असा अंदाज आहे.

एवढा असणार टोल

गाडीचा प्रकार शिवडी ते शिवाजी नगर शिवाजी नगर ते चिर्ले एकूण

(सुधारित टोल धोरणानुसार या टोलमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.)

असा आकारणार टोल

एमटीएचएलचा वापर करण्यासाठी वाहनांकरिता टोल आकारण्यात येणार आहे. त्यासाठी दोन प्रकारे टोल वसूल करण्याची व्यवस्था तयार करण्यात येईल. त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन आणि मॅन्युअल अर्थात रोख पैसे स्वीकारणे.

वाहतूक व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञाचा वापर

एमटीएचएलवरील वाहतूक वावस्थापनासाठी एमएमआरडीएने विविध तंत्रज्ञाचा आधार घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार एक किलोमीटरच्या अंतरावर तीन ठिकाणी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच अपघात किंवा इतर कोणती मदत हवी असल्यास वाहनचालकांची आपत्कालीन कॉल बॉक्स ची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच ऑटोमॅटिक ट्रॅफिक काउंटर, हवामान डेटा सिस्टम, विविध संदेशांचे बोर्ड असणार आहेत.

एमटीएचएल प्रकल्प 2023 मध्ये पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे लक्ष्य आहे. या प्रकल्पाचे 84 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा सेतू भारतातील सर्वात लांब सागरी पूल असेल.

– एस.व्ही.आर. श्रीनिवास, एमएमआरडीए आयुक्त

सागरी पुलाची शिफारस

मुंबई शहर, नवी मुंबई आणि रायगड ला जोडण्याबाबत अभ्यास करण्यासाठी १९६२ मध्ये ग्रेटर बॉम्बेने एका संस्थेची नेमणूक केली होती. या संस्थेने विस्तृत अभ्यासाअंती १८ महिन्यात आपला अहवाल सादर केला. या अहवालात मुंबई शहर, नवी मुंबई आणि रायगड यांना जोडण्यासाठी सागरी सेतू उभारण्याची शिफारस करण्यात आली होती. हा अहवाल १९६३ साली केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. मात्र राजकीय इच्छाशक्तीमुळे हा प्रकल्प रखडला होता. (संदर्भ विकिपीडिया)

…तर मुंबईचे वाटोळे टळले असते

मुंबई, रायगड या भागाला जोडण्यासाठी 55 ते 60 वर्षांपूर्वी सागरी पूल उभारण्याची चर्चा झाली. मात्र राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्याने हा सागरी सेतू उभा राहू शकला नव्हता. हा प्रकल्प त्या कालावधीत पूर्ण झाला असता तर आज मुंबईचे वाटोळे झालेले आपणास पाहण्यास मिळाले नसते. त्यासोबतच गोरगरिबांना कमी किमतीमध्ये नवी मुंबई परिसरात घरेही मिळाली असती. राजकीय लोक स्वतःच्या फायद्याचा विचार करतात, परंतु सर्वसामान्य नागरिकांना वाऱ्यावर सोडतात, हे याचे उदाहरण मानता येईल.

– अशोक दातार – वाहतूक तज्ञ

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiYmh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbXVtYmFpL210aGwtd2lsbC1iZWNvbWUtaW5kaWEtbG9uZ2VzdC1zZWEtYnJpZGdlLWxhbmUtdG9sbC1tdW1iYWktbmV3cy1vajA10gEA?oc=5