मुंबई बातम्या

Mumbai : पोलिसांची दिवाळी गोड, सरकारनं घेतले 2 महत्त्वाचे निर्णय – News18 लोकमत

मुंबई, 25 ऑक्टोबर : शासन मान्यते अभावी गेल्या काही महिन्यांपासून मुंबई पोलिसांना वाहतूक भत्ता मिळाला नव्हता. त्यामुळे पोलिसांमध्ये नाराजीचा सूर होता. राज्यातील इतर पोलिसांप्रमाणे मुंबई पोलिसांना देखिल वाहतूक भत्ता मिळण्याबाबत मागणी वाढत असताना यावर्षी जून महिन्यांपासून वाहतूक भत्ता पगारात देण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र पोलिसांना हा भत्ता मिळाला नव्हता. या संदर्भात न्यूज 18 लोकमतने बातमी प्रकाशित केली होती. याच बातमी नंतर अखेर शासनाला जाग आली असून शासनाने आधीचा जी आर रद्द करून वाहतूक भत्ता पगारात जमा करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. ऐन दिवाळीत मिळालेल्या मंजुरीमुळे पोलिस दलामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुंबई पोलिस दलातील कर्मचारी आणि अधिकारी यांना मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. कर्तव्यावर हजर होताना, घरी जाताना किंवा अन्य काही कामासाठी बेस्टच्या बसमधून प्रवास करताना ओळखपत्र दाखवल्यानंतर तिकीट काढावे लागत नव्हते. यासाठी पोलिस प्रशासनामार्फत बेस्टला दरवर्षी सुमारे आठ कोटी रुपये भरणा केला जात होता. मात्र, 2 जून 2022 पासून मोफत प्रवासाची सुविधा बंद करण्याचा निर्णय तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी घेतला होता.

हेही वाचा : Mumbai : संपूर्ण मुंबई पालथी घातली तरी ‘असा वडापाव’ मिळणार नाही, पाहा Video

जुन महिन्यापासून हा वाहतूक भत्ता पगारात देण्याचे आदेश दिले होते. यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीने राज्य शासनाला पत्रव्यवहारही करण्यात आला. मात्र, वाहतूक भत्ता सुरु करण्यास मंजुरी देण्यात 1991 मध्ये राज्य शासनाने घेतलेला शासन निर्णय अडसर ठरत होता. तो आदेश रद्द झाल्याशिवाय भत्ता पगारात जमा करणे शक्य नव्हते. मात्र, आत्ता शासनाने याला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे पोलिसांना पगारात सुमारे 2700 रुपये वाहतूक भत्ता मिळणार आहे. 

वाहतूक भत्ता नियमित पणे सर्वांना दिला जाईल

शासनाने 21 ऑक्टोबर रोजी शासन निर्णय काढल्यानंतर आता सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची जून ते ऑक्टोबर या 5 महिन्याची वाहतूक भत्ता बिले लवकर कोषागारात सादर केली जातील आणि या पुढे मासिक वेतन सोबत हा वाहतूक भत्ता नियमितपणे सर्वांना दिला जाईल, असं पोलीस सहआयुक्त राजकुमार व्हटकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : Satara : दिवाळीसाठी गोंदवलेकर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट, पाहा Video

एका अंमलदाराने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, जून महीन्यात आदेश दिला होता. मात्र जुन, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यातील भत्ता वेळेत मिळणे गरजेचे होते. मात्र, शासनाने उशिरा का होईना ग्रीन सिग्नल दाखविल्याने आम्ही खुश आहोत.

दरम्यान, दिवाळी अ‍ॅडव्हान्स देण्यात यावा या संदर्भात सुद्धा न्यूज 18 लोकमतने एक बातमी केली होती. या बातमीची दखल घेत शासनाने पोलिसांच्या खात्यात दिवाळी अ‍ॅडव्हान्स देखिल जमा केले आहे. पोलिसांच्या पगारातून दरमहा 1250 रूपये वजा होतात. त्यामुळे पोलिसांना  दिवाळीपूर्वी  12 हजार 500 रूपये अ‍ॅडव्हान्स देण्यात येतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMihAFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS9pdC1oYXMtYmVlbi1kZWNpZGVkLXRvLWdpdmUtdHJhbnNwb3J0LWFsbG93YW5jZS10by1tdW1iYWktcG9saWNlLWhlbmNlZm9ydGgtNzc3OTMwLmh0bWzSAYgBaHR0cHM6Ly9sb2ttYXQubmV3czE4LmNvbS9hbXAvbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpL2l0LWhhcy1iZWVuLWRlY2lkZWQtdG8tZ2l2ZS10cmFuc3BvcnQtYWxsb3dhbmNlLXRvLW11bWJhaS1wb2xpY2UtaGVuY2Vmb3J0aC03Nzc5MzAuaHRtbA?oc=5