मुंबई बातम्या

Mumbai : स्वच्छ नवी मुंबईची हवा ‘प्रदूषित’ – Sakal

स्वच्छ नवी मुंबईची हवा ‘प्रदूषित’

मुंबई
sakal_logo

By

मुंबई : मुंबईत दरवर्षी फटाकेच नव्हे, तर दिवाळीच्या सुट्यांमुळे शिवाय वाहनांच्या संख्येमुळेही हवा प्रदूषित होते; परंतु मुंबईला लागूनच असलेल्या आणि केंद्र सरकारच्या स्वच्छता पुरस्कारात नुकताच तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या नवी मुंबईत हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीपर्यंत पोहोचल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. सोमवारी मुंबई, पुण्याच्या तुलनेत नवी मुंबईची हवा सर्वाधिक प्रदूषित श्रेणीत नोंदवण्यात आली. त्यासाठी सुटीच्या काळात शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे कारण ‘सफर’ या हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणाऱ्या संस्थेने नोंदवले आहे.

‘सफर’ हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणाऱ्या संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. गुफरान बेग यांनी सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवसांतील मुंबई आणि परिसराच्या वातावरणातील प्रदूषणाचा अंदाज आधीच वर्तवला आहे. या अंदाजानुसार सोमवारी नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत नोंदवण्यात आली. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ३०० होता, जो अत्यंत वाईट श्रेणीत येतो. या तुलनेत सोमवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुंबईतील हवेची गुणवत्ता १४५ एक्यूआयसह मध्यम श्रेणीत होती; तर पुण्याच्या हवेची गुणवत्ता ७५ एक्यूआयसह समाधानकारक श्रेणीत नोंदवली गेली. त्याच वेळी दिल्लीच्या हवेची गुणवत्ता ३२३ एक्यूआयसह अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली गेली.

नवी मुंबईतील हवा सर्वाधिक प्रदूषित होण्याचे कारण या भागातील वाढती वाहतूक असल्याचे सांगण्यात येत आहे. सफरचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. गुफरान बेग म्हणाले, की दिवाळी सणात नागरिक अनेकदा आपापल्या गावी व इतर ठिकाणी जातात. अशा परिस्थितीत मुंबईहून लोणावळा, खंडाळा आदी ठिकाणी जास्तीच्या वाहतुकीमुळे नवी मुंबईची हवा खराब झाली असल्याचे डॉ. बेग यांनी सांगितले.

प्रदूषणाचा आढावा
शहर  एक्यूआय
मुंबई १४५
पुणे ७५
नवी मुंबई ३००
दिल्ल ३२३
अहमदाबाद १२०

हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप
० ते ५० एक्यूआय : चांगले
५१ ते १०० एक्यूआय : समाधानकारक
१०१ ते २०० एक्यूआय : मध्यम
२०१ ते ३०० एक्यूआय : वाईट
३०१ ते ४०० एक्यूआय : अत्यंत वाईट
४०० च्या वर : गंभीर

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b09581 Txt Mumbai

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiXmh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbXVtYmFpL3RvZGF5cy1sYXRlc3QtbWFyYXRoaS1uZXdzLW1iaTIyYjA5NTgxLXR4dC1tdW1iYWktMjAyMjEwMjQwMjI5NDbSAQA?oc=5