मुंबई बातम्या

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी बेस्ट सेवा कोलमडली; कंत्राटी चालक-वाहकांचे चार आगारांमध्ये काम बंद आंदोलन – Loksatta

मुंबई : दर महिन्याचे वेळेवर वेतन वेळेवर, दिवाळीचा बोनस द्यावा यासह विविध मागण्यांसाठी सलग दुसऱ्या दिवशी बेस्ट उपक्रमाच्या चार आगारातील कंत्राटी चालक – वाहकांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवले होते. त्यामुळे बेस्टच्या या आगारातून एकही बस बाहेर पडू शकली नाही. परिणामी, ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल झाले. शनिवारी एका आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. त्याची व्याप्ती रविवारी वाढली.

सांताक्रूझ, जोगेश्वरी येथील मजास आगार, प्रतीक्षा नगर, धारावी या चार आगारांमध्ये मातेश्वरी अर्बन सोल्युशन लिमिटेड या खासगी कंपनीकडून भाडेतत्वावर वातानुकूलित बसचा पुरवठा करण्यात येत आहे. याच कंपनीने कंत्राटी चालक आणि वाहकांचीही नियुक्ती केली आहे. या सर्व आगारातील ५०० हून अधिक कंत्राटी चालक-वाहकांनी समान काम समान मोबदला, वेतन वेळेवर मिळावे, बोनस द्यावा आदी विविध मागण्यांसाठी रविवारी सकाळपासून आंदोलन पुकारले. अनेक कर्मचाऱ्यांनी आगाराच्या प्रवेशद्वारात उभे राहून घोषणाही दिल्या. कंत्राटदार नियुक्तीपत्रही देत नसल्याचा आरोप कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला.

हेही वाचा : ‘भाजपा-शिंदे गट आणि मनसेची युती होणार?’ आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान; म्हणाले “जर युतीबाबत…”

या आंदोलनामुळे सकाळपासून आगारांमधून बेस्ट बसगाड्या बाहेर पडू शकल्या नाहीत. त्यामुळे दिवाळीनिमित्त नातेवाई, आप्तेष्टांना भेटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. गेल्या काही महिन्यांपासून कंत्राटी चालक – वाहक विविध मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करीत आहेत. परिणामी, बेस्ट सेवा कोलमडत असून प्रवाशांचे हाल होत आहेत. बेस्ट उपक्रम वारंवार संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देत आहे. मात्र अद्याप ठोस अशी कारवाई झालेली नाही.

हेही वाचा : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी २५६ मतदान केंद्रे

बेस्ट प्रशासनाचे असहकार्य

चार आगारांमधील कर्मचाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे प्रवाशांना बस गाड्या उपलब्ध झाल्या नाहीत. यासंदर्भात बेस्टच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याशी संपर्क साधून बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली. थेट दुपारी १२ वाजता बेस्ट सेवा सुरळीत झाल्याचे जनसंपर्क विभागाकडून कळविण्यात आले. शनिवारीही झालेल्या आंदोलनाबाबतची माहिती जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली नाही.सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एक हजार ८३९ स्वमालकीच्या, तर एक हजार ८४० भाडेतत्त्वावरील बसगाड्या आहेत. यामध्ये साध्या, वातानुकूलित मोठ्या आकाराच्या आणि मिडी, मिनी बसचा समावेश आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMihQFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL2NvbnRyYWN0dWFsLWRyaXZlcnMtY29uZHVjdG9yLW9mLWJlc3Qtc3RyaWtlLWluLWZvdXItYmVzdC1idXMtc3RhbmQtbXVtYmFpLXByaW50LW5ld3MtdG1iLTAxLTMyMTA1NzUv0gEA?oc=5