मुंबई बातम्या

मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट 2034 या परिषदेत मुंबईच्या विकासाची विस्तृत चर्चा – My Mahanagar

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह आसपासच्या मुंबई महानगर प्रदेशाच्या पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या ‘मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट 2034’ या विशेष परिषदेचे आयोजन मुंबईत करण्यात येत आहे. लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने वरळीच्या फोर सिझन हॉटेल येथे शनिवार, 15 ऑक्टोबर रोजी ही एकदिवसीय परिषद पार पडणार आहे. या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार असून समारोपाच्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थितांना संबोधित करतील. यावेळी पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजनांची श्वेतपत्रिका मुख्यमंत्र्यांना सादर केली जाणार आहे. तसेच परिषदेनंतर पायाभूत सुविधा क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या तज्ज्ञांचा सन्मानही मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष परिषदेत रस्ते विषयक नवीन तंत्रज्ञान, घनकचरा व्यवस्थापन, झोपडपट्टी मुक्त मुंबई – धारावी पुनर्विकास, शहरी दळणवळण, अतिवृष्टीमुळे साचणारे पाणी, रियल इस्टेट क्षेत्र अशा विविध क्षेत्रांतील समस्या आणि त्या सोडविण्यासाठी उपाययोजना याविषयी चर्चा केली जाणार आहे.तसेच स्टॅक (STAC) समितीच्या वतीनेही विशेष सादरीकरण केले जाणार आहे. या परिषदेला, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एम एम आर डी ए ), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( एम आय डी सी), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ( एस आर ए), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम एस आर डी सी) अशा मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाच्या शासकीय प्राधिकरणांचे सहकार्य लाभले असून राज्यातील ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि तज्ज्ञ मंडळी इथे आपले विचार मांडणार आहेत.

मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट 2034 या परिषदेच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा, या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासमोरील आव्हाने आणि यावर मात करण्यासाठी नेमक्या उपाययोजना याविषयीची विस्तृत चर्चा करण्याचा आमचा मानस आहे. या परिषदेत तज्ज्ञ मंडळींनी सुचविलेल्या उपाययोजना आणि त्यांनी मांडलेली मते यांची एक श्वेतपत्रिका माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना सुपूर्द करण्यात येईल. तसेच या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला जाईल.
– खासदार राहुल रमेश शेवाळे


हेही वाचाः मुंबईतील ‘या’ परिसरांत २४ तास पाणीपुरवठा बंद

ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड करा

Vaibhav Desai

गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड

Source: https://www.mymahanagar.com/maharashtra/mumbai-metropolitan-region-at-2034-conference-discussed-the-development-of-mumbai-in-detail/493993/