मुंबई बातम्या

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सापडलं सोन्याचं घबाड, अधिकारीही झाले अवाक् – News18 लोकमत

मुंबई, 14 ऑक्टोंबर : मुंबई ATS कडून काल एका दहशतवाद्याला पकडण्यात आल्याने मुंबई पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर मुंबई कस्टम विभागाकडून मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई कस्टम विभागाकडून तब्बल 22 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. तर एका खास बेल्टमधून 5 कोटी 20 लाखांचे सोने लपवून नेत असताना कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम आणि सोने दुबईहून मुंबईत येत असल्याची माहिती मुंबई कस्टम विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावर कस्टमने विदेशी नागरिकाकडून 22 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले. 95 हजार दुबईचे चलन घेऊन परदेशी नागरिक मुंबईहून दुबईला जात होते. कस्टमच्या दुसऱ्या एका कारवाईत सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली दोन परदेशी नागरिकांना पकडण्यात आले. ते एका खास पट्ट्यात लपवून 5 कोटींचे सोने तस्करी करत होते.

हे ही वाचा : मुंबईहून ठाण्याकडे जाणारा मार्ग 4 दिवस राहणार बंद, या रस्त्यांवरून करू नका प्रवास!

मिळालेल्या माहितीनुसार, दुबईतून सोन्याची तस्करी होणार असल्याची मुंबई कस्टम विभागाला कुणकुण लागली होती. काल (दि.13) संध्याकाळी आलेल्या एका भारतीय प्रवाशाने आणलेले तब्बल 9 किलो 89 ग्रॅम सोने कस्टम विभागाने पकडले असून याची किंमत 5 कोटी 20 लाख रुपये इतकी आहे. या प्रवाशाने शर्टाच्या आतील बाजूला एक कापडाचा पट्टा करून त्यामध्ये हे सोने लपविले होते.

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये त्यांना या व्यक्तीकडे 15 सोन्याची बिस्कीटे सापडली. दोन सुदानी नागरिकांनी आपल्याकडे हे सोने दिले असल्याची माहिती या भारतीय व्यक्तीने कस्टम अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर, त्याच विमानातून आलेल्या या दोन्ही सुदानी नागरिकांना देखील अटक करण्यात आली. या तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

तर दुसऱ्या घटनेमध्ये, शारजातून चेन्नईमार्गे मुंबई गाठलेल्या एका व्यक्तीकडून 1 किलो 80 ग्रॅम सोने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. याची किंमत ९९ लाख रुपये इतकी आहे. हे सोने त्याने त्याच्या अंर्तवस्त्रामध्ये लपविले होते. तिसऱ्या जेहाद येथून आलेल्या दोन भारतीयांकडून अनुक्रमे 1068 ग्रॅम आणि 1186 ग्रॅम सोने पकडण्यात कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. या सोन्याची अनुक्रमे किंमत 56 लाख आणि 58 लाख रुपये इतकी आहे.

हे ही वाचा : अमित ठाकरेंना पाहण्यास आले अन् मोबाईल गायब झाले, चोराने कार्यकर्त्याचे पैसेही लांबवले

कस्टम विभागाच्या पथकाने 11 आणि 12 ऑक्टोंबरला मुंबई विमानतळावर विशेष शोध मोहीम राबवली आहे. यावेळी पथकाने एकूण 15 किलो सोने जप्त केले. त्याचे बाजारमूल्य अंदाजे 8 कोटी रुपये आहे. ही जप्ती चार वेगवेगळ्या प्रकरणात घडली आहे. याशिवाय अन्य दोन प्रकरणांत 22 लाख रुपयांचे विदेशी चलनही जप्त करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणात 7 जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai/mumbai-custom-department-big-action-gold-seized-mumbai-airport-sr-773344.html