मुंबई बातम्या

मुंबईच्या रस्त्यावर १० हजार बेवारस वाहने ; ४१५७ वाहने पालिकेने हटवली, सर्वाधिक वाहने ग्रँट रोड परिसरात – Loksatta

मुंबई : रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत असणारी वाहने जप्त करण्याच्या मोहीमेअंतर्गत आतापर्यंत १० हजाराहून अधिक गाड्या आढळून आल्या आहेत. मार्च ते सप्टेंबर या कालावधीत आढळलेल्या वाहनांपैकी ९४५४ गाड्यांवर नोटीसा चिकटवण्यात आल्या होत्या. यामध्ये ३५१९ वाहनांच्या मालकांनी पालिकेला प्रतिसाद दिला असून आपणहून गाड्यांची विल्हेवाट लावली आहे. पालिकेने ४१५७ गाड्या हटवल्या आहेत. सर्वात जास्त म्हणजे एक हजार वाहने ग्रँटरोड परिसरातील आहेत.

हेही वाचा >>> मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत दिव्यांचा लखलखाट ; सुशोभिकरणात रोषणाईवर भर

अनेकदा जुनी झालेली वाहने किंवा कोणत्याही गुन्ह्यात वापरलेली वाहने रस्त्याच्या कडेला सोडून दिली जातात. धूळ बसून, पावसामुळे गंजून या वाहनांची दूरवस्था झाली तरी वाहने तेथेच असतात. पावसाचे पाणी अशा वाहनांमध्ये साचल्यामुळे डासांची पैदास होतेच पण अशा वाहनांमुळे वाहतूकीलाही अडथळा होतो. त्यामुळे अशी वाहने पालिकेकडून हटवली जातात. मात्र करोना काळात ही जबाबदारी वाहतूक पोलीसांकडे देण्यात आली होती. करोनाचे निर्बंध हटवल्यानंतर मार्च महिन्यात ही जबाबदारी पुन्हा पालिकेकडे आली. तेव्हा पालिकेने व वाहतूक विभागाने मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवून बेवारस वाहने हटवली. गेल्या सहा महिन्यात पालिकेने सुमारे दहा हजारांहून अधिक गाड्या रस्त्यावरून हटवल्या आहेत.

हेही वाचा >>>“मी बाळासाहेब ठाकरेंविरोधात अब्रू नुकसानीचा खटला केला, कारण…”; छगन भुजबळांनी सांगितला ‘तो’ किस्सा

पालिकेने गाडीवर नोटीस चिकटवल्यानंतर ३५१९ गाड्यांच्या मालकांनी पालिकेला प्रतिसाद दिला तर ४१५७ गाड्या पालिकेने स्वतः हटवल्या आहेत. पालिकेने गाड्या हटवल्यानंतर २१६ मालकांनी पालिकेकडे पाठपुरावा करून आपल्या गाड्या सोडवल्या आहेत. उर्वरित साडेतीन हजाराहून अधिक गाड्या पालिकेच्या संबंधित विभागाच्या ताब्यात आहेत.

सर्वाधिक गाड्या या विभागातून

ग्रॅंटरोड ….             १००९

वांद्रे, खार …..        ७०८

कुर्ला …….             ७९५

भायखळा …..        ६७३

वडाळा, माटुंगा …..६११

Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-municipal-corporation-remove-4157-abandoned-vehicles-from-road-mumbai-print-news-zws-70-3190446/