मुंबई बातम्या

मुंबईत रविवारपासून जमावबंदी – Loksatta

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक, तसेच पुढील आठवड्यात येऊ घातलेली दिवाळी या बाबी विचारात घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी मुंबईत १६ ते ३० ऑक्टोबर या काळात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त संजय लाटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून याबाबत बुधवारी आदेश दिले. मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> Andheri election : उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल विझवण्याचं काम आम्ही करणार – रामदास आठवले

तसेच, परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तींची कोणतीही मिरवणूक काढू नये. कोणत्याही मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, बॅण्ड वाजविण्यास आणि फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, ३० ऑक्टोबरनंतर या आदेशाची मुदत संपली तरी, कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू केली जाऊ शकते. तसेच, ती सुरू ठेवली जाऊ शकते किंवा लागू केली जाऊ शकते. या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भात झालेला कोणताही दंड, शिक्षा, जप्ती हा आदेश कालबाह्य झाला नसल्याप्रमाणे लागू केली जाऊ शकते. असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> “संजय राऊत मला भेटतात तेव्हा दोनच प्रश्न विचारतात ते म्हणजे…”, भाऊ सुनिल राऊतांची भावनिक प्रतिक्रिया

विवाह समारंभ, अंत्यसंस्कार सभा आणि अंत्ययात्रा, तसेच कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटनांची कायदेशीर बैठका, सामाजिक मेळावे, आणि क्लब, सहकारी संस्था, इतर सोसायटया आणि संघटनांच्या सामान्य व्यवहारासाठी त्यांची बैठक, चित्रपटगृह, नाट्यगृह, शैक्षणिक संस्थामध्ये किंवा त्याच्या आसपास संमेलने, कारखाने, दुकाने आणि आस्थापनांमध्ये सामान्य व्यापार, व्यवसाय आणि आवाहनासाठी संमेलने, परवानगी घेतलेल्या मिरवणुका यांना जमावबंदीच्या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

अंधेरी पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर पोलीस सतर्क

शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह यावरुन ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये सुरू असलेला वाद विकोपाला गेला आहे. त्यातच मुंबईतील अंधेरी विधानसभेची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना दिलेल्या निवडणूक चिन्हानंतर दोन्ही गट पुन्हा एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. मुंबईसह राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

Source: https://www.loksatta.com/mumbai/section-144-to-impose-in-mumbai-from-sunday-to-maintain-law-and-order-mumbai-print-news-zws-70-3188098/