बांधकाम क्षेत्रात मोठा वाटा असलेल्या पुणे आणि मुंबई शहराने कोरोनाच्या लाटेतून सावरत पुन्हा आपले स्थान मजबूत केले आहे.
Published on : 12 October 2022, 12:23 am
पुणे – बांधकाम क्षेत्रात मोठा वाटा असलेल्या पुणे आणि मुंबई शहराने कोरोनाच्या लाटेतून सावरत पुन्हा आपले स्थान मजबूत केले आहे. बांधकाम क्षेत्रासाठी महत्त्वाच्या असलेल्या देशातील आठ शहराच्या तुलनेत पुणे आणि मुंबईमध्ये यंदाच्या तिसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर २०२२) दरम्यान सर्वाधिक घरांची विक्री झाली आहे.
पुणे, मुंबई, बेंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली एनसीआर, हैदराबाद आणि कोलकता या आठ शहरातील एकूण विक्रीत ५३ टक्के वाटा हा मुंबई आणि पुण्याचा आहे. गेल्या वर्षी देखील या दोन शहरांत सर्वाधिक विक्री झाली होती. मागील वर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये देशात ५५ हजार ९१० सदनिकांची विक्री झाली होती. यंदा त्याच काळात ८३ हजार २२० सदनिका विकल्या गेल्या आहेत. टक्केवारीचा विचार केला असता, ही ४९ टक्के वार्षिक वाढ आहे. ऑनलाइन रिअल इस्टेट व्यासपीठ प्रॉपटायगर डॉटकॉमने सर्व्हे केल्यानंतर जाहीर केलेल्या निवासी बाजारपेठ ट्रेण्ड्सवरील त्रैमासिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. देशभरातील प्रकल्पांमधील सदनिकांच्या किमतीचा विचार केला असता, बहुतांश नवीन पुरवठ्याची किंमत एक ते तीन कोटी रुपयांपर्यंत होती. या किमतीच्या घरांचा वाटा ३२ टक्के होता. त्यानंतर ४५ ते ७५ लाख किंमत असलेल्या सदनिकांचा वाटा ३१ टक्के आहे.

देशात गेल्या तिमाहीत विक्री झालेल्या बहुतांश सदनिकांची किंमत ही ४५ ते ७५ लाखांच्या दरम्यान आहे. गेल्या तीन महिन्यांत एक लाख चार हजार ८२० सदनिका लॉन्च करण्यात आल्या आहेत. एकूण नवीन पुरवठ्याची गेल्या वर्षाशी तुलना केली असता त्यात ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ही वाढ तीन टक्क्यांची आहे.
बांधकाम क्षेत्र कोरोना आणि त्यानंतर झालेल्या परिणामांमधून पुन्हा सावरत असल्याचे अहवालातील डेटा ट्रेंड व माहितीमधून स्पष्टपणे दिसून येते. सणासुदीच्या काळात मालमत्ता गुंतवणुकीबद्दल ग्राहकांच्या सकारात्मक भावनांमध्ये सतत वाढ होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. गेल्या तिमाहीत घरांच्या मागणीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्यामुळे पुढच्या तिमाहीसाठी देखील उत्तम मागणी दिसून येईल.
– विकास वाधवान, मुख्य वित्त अधिकारी, हाउसिंग डॉटकॉम, प्रॉपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉम.
Web Title: Pune And Mumbai Again Top In Construction Sector
Source: https://www.esakal.com/pune/pune-and-mumbai-again-top-in-construction-sector-pjp78