मुंबई बातम्या

जुन्या मुंबई-पुणे रस्त्याचे रुंदीकरण होणार; मात्र कार्यादेशानंतरच काम सुरू – Maharashtra Times

पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जागा संरक्षण मंत्रालयाकडून महानगरपालिकेला प्राप्त झाली आहे. त्यामुळे या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. आठ कंपन्यांनी यासाठी निविदा भरल्या आहेत. दरम्यान, या २.१ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी ८७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

या रस्त्याच्या कामासाठी अर्थसंकल्पात २० कोटी रुपये तरतूद उपलब्ध असून, पुढील दोन वर्षांच्या अंदाजपत्रकात ६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यास शुक्रवारी स्थायी समितीने मान्यता दिली. बोपोडी येथील हॅरिस ब्रिजपासून खडकी कँटोन्मेंटच्या हद्दीतील रेंजहिल्स चौकापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेने २०१६मध्ये निविदा प्रक्रिया राबविली होती. या रस्त्याच्या कडेला बोपोडी येथे राहाणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले; परंतु खडकी रेल्वे स्टेशनपासून रेंजहिल्स चौकापर्यंत रस्त्याच्या कडेची जागा संरक्षण विभागाकडून मिळत नव्हती. त्यामुळे रस्ता रुंदीकरण रखडले होते.

खडकी रेल्वे स्टेशनमुळे रस्त्याच्या विरुद्ध दिशेच्या जागेशिवाय रुंदीकरणासाठी पर्याय नव्हता. स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मेट्रो मार्गही याच रस्त्यावरून जाणार असल्याने भूसंपादनाअभावी मेट्रोचेही काम रखडले होते. त्यासाठीही संरक्षण विभागाच्या जागेची आवश्यकता होती.

या दोन्ही प्रकल्पांसाठी दहा एकर जागेची गरज असून, तत्कालीन महापालिका आयुक्त सौरव राव यांनी या जागेच्या बदल्यात येरवडा येथील महापालिकेची तेवढीच जागा संरक्षण विभागाला देण्याची तयारी दर्शविली होती. यावर मागील आठवड्यात संरक्षण विभागाने निर्णय घेऊन रस्ता रुंदीकरण व मेट्रोसाठीही जागा देण्यास मान्यता दिली. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासोबतच मेट्रोच्या कामातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. सात वर्षांपूर्वी या रस्त्याच्या कामाचा खर्च सुमारे ४५ कोटी रुपये होता; पण आता हा खर्च ८७.६५ कोटी इतका झाला आहे. चालू अंदाजपत्रकात २० कोटींची तरतूद आहे, पुढील दोन वर्षांसाठी ६७.६५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील.

कार्यादेशानंतरच काम सुरू

जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने निविदा मागविली होती. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या निविदेला मुदतवाढ देण्यात आली होती. आता या कामासाठी आठ कंपन्यांनी निविदा भरली आहे. अद्याप या निविदा उघडण्यात आलेल्या नाहीत. निविदा मान्य झाल्यानंतर कार्यादेश काढण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/old-mumbai-pune-road-will-be-widened/articleshow/94734824.cms