मुंबई बातम्या

मुंबई ते कोल्हापूर फक्त ४० मिनिटात; जाणून घ्या विमान तिकीटाचे दर, वेळ आणि सर्व काही – Maharashtra Times

कोल्हापूर : बहुप्रतिक्षित असणारा कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ आज मोठ्या थाटात पार पडला असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे चंद्रकांत पाटील यांची ऑनलाईन तर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, उद्योगपती संजय घोडावत, खासदार, आमदार आदी जण उपस्थिती होते. कोल्हापूर विमानतळावर हा सोहळा पार पडला असून ही सेवा संजय घोडावत यांच्या ‘स्टार एअरवेज’ कंपनीकडून सुरु करण्यात आली आहे.

वॉटर सल्यूट देत विमानाचे स्वागत

करोना काळात कोल्हापूर मुंबई विमानसेवा बंद करण्यात आली होती ती नंतर सुरुच झाली नाही. खरं तर कोल्हापूर मुंबई विमानसेवेला पर्यटक विद्यार्थी आणि भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता मात्र अचानक बंद झालेल्या विमानसेवेमुळे प्रवाशांचे हाल होत होते. कोल्हापूर – मुंबई अशी विमानसेवा सुरु व्हावी अशी अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी होती ती आज पूर्ण झाली. या सेवेमुळे प्रवाशांचा खूप वेळ वाचणार आहे. दरम्यान, स्टार एअरचे पहिले विमान मुंबईहून कोल्हापूरला दाखल झाले यावेळी परंपरेनुसार वॉटर सॅल्यूट देत विमानाचे आणि प्रवाशांचे स्वागत करण्यात आले.

Andheri Bypoll: अर्ज भरण्याच्या दिवशीच निवडणूक आयोगाची डेडलाईन, शिवसेना-शिंदे गटाकडे कागदपत्रं मागवली
अशी असणार विमान सेवा

मुंबई-कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ही आठवड्यातून तीन दिवस असणार आहे. आठवड्यातील मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी ही विमानसेवा असणार आहे. मुंबई विमानतळावरून हे विमान १०.३० वाजता उड्डाण करेल आणि ११.२० मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचेल. हा प्रवास अवघ्या ४० मिनिटाचा असणार आहे. तर कोल्हापुरातून सकाळी ११.५० वाजता उड्डाण करुन हे विमान मुंबईत १२.४५ वाजता पोहोचेल. कोल्हापूर ते मुंबईसाठी २ हजार ५७३ रुपये इतका तिकीट दर असणार आहे. या विमानसेवेमुळे कोल्हापूर- मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.

कोल्हापूर मुंबई विमान सेवा सुरू करण्याचे स्वप्न अखेर पूर्ण

संजय घोडावत ग्रुपचे ही विमानसेवा सुरु झाली असून याबाबत बोलताना संजय घोडावत म्हणाले कोल्हापूर मुंबई हे विमानसेवा सुरु करण्याचे माझे खूप दिवसापासूनचे स्वप्न होते. मात्र, कोल्हापूर विमानतळावर सोयीसुविधांचा अभाव असल्या कारणाने ही सेवा सुरू करण्यास अडथळे निर्माण होत होते. मात्र, आता ही सेवा सुरू झाली असून भविष्यात स्टार एयर मार्फत कोल्हापूरला आणखी वेगवेगळ्या शहरांशी जोडण्यात येणार असल्याचे संजय घोडावत यांनी म्हटले आहे.

वाढदिवसाला पंतला मिळाले खास गिफ्ट; MY Love म्हणत पाहा कोणी दिल्या शुभेच्छा

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur/mumbai-kolhapur-direct-flight-service-to-begin-from-today/articleshow/94637941.cms