मुंबई बातम्या

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ – Loksatta

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याबाबतची माहिती राज्य गुप्तहेर विभागाला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शिंदे यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात यावी, असे आदेश उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पोलिसांना दिले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांना वारंवार येणाऱ्या धमक्यांचा नेमका स्त्रोत शोधावा, असे आदेशही राज्यांचे पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त व राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती राज्य गुप्तहेर विभागाला मिळाली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचे वर्षा हे शासकीय निवासस्थान व ठाण्यातील निवासस्थान यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याला याबाबत विचारले असता राज्य महासंचालक, मुंबई पोलीस व राज्य गुप्तवार्ता विभागाला याबाबत आदेश देण्यात आल्याच्या वृत्ताला त्याने दुजोरा दिला.

हेही वाचा >>> मुंबई विमानतळावरील इंडिगो विमान बॉम्बद्वारे उडवण्याच्या धमकीचा ईमेल

राज्य गुप्तहेर विभागाला शनिवारी सायंकाळी याबाबतची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा आहे. त्यापेक्षाही अधिक पोलीस त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.यापूर्वीही शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी अनेकदा देण्यात आली आहे. एका निनावी दूरध्वनीच्या माध्यमातून यापूर्वी मुख्यमंत्र्यांना धमकी देण्यात आली होती. तसेच नक्षलवाद्यांकडूनही धमकी देण्यात आली आहे. आषाढी वारीच्या वेळीही मुख्यमंत्र्यांना अशाचप्रकारे धमकी देण्यात आली होती. शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना नक्षलवाद्यांविरोधी केलेल्या कारवाईत अनेक नक्षलवादी मारले गेले होते. त्यामुळे नक्षलवाद्यांकडून सूड उगवण्याच्या हेतूने ही धमकी देण्यात आल्याची माहिती गुप्तहेर विभागाने दिली आहे.

दरम्यान, याप्रकरणी उच्च अधिकाऱ्यांना तपास करण्यास सांगण्यात आले असून वर्षा निवासस्थान, मुख्यमंत्र्यांचे ठाण्यातील राहते घर येथील सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याबाबतचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच शिंदे गटाकडून घेण्यात येणा-या दसरा मेळाव्यात देखील त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-increased-security-of-chief-minister-eknath-shinde-mumbai-print-news-amy-95-3165857/